Monday, July 9, 2012

जातीभेद...

              काल सत्यमेव जयते पूर्ण पाहिला नाही पण जातीभेदावर आधारित होता. त्यातला धर्माधिकारींचा भाग तेवढा पूर्ण  पाहिला. नंतर त्यावर विचार केल्यावर वाटलं, भारतातून जातीभेद नष्ट होणे खरंच शक्य आहे का? माझं स्वत:चं मला मिळालेलं उत्तर आहे नाही, भारतातून जातीभेद नष्ट होणे शक्य नाही. फारतर हल्ली आपण एखाद्याला जातीवाचक शिवीगाळ करत नाही, मित्रांमध्ये असताना किंवा मैत्री करताना "जात" कधी आड येत नाही. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर टोकाचे जातीभेद सध्या फारसे कुठे दिसत नाहीत. काही अपवाद असतात, पण निदान पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी शाळेत, कार्यालयात सर्व जाती-धर्मांचे लोक मैत्रीपूर्वक एकत्र दिसतात. पण याचा अर्थ असा होतो का की आपल्या देशातून जातीभेद नष्ट झाले आहेत?
               
              जात नष्ट होईल अशी परिस्थितीच आपल्या देशात नाही तर ती नष्ट कशी होईल? मुलाला शाळेत प्रवेश घेताना फॉर्म भरायचा तर त्यावर जात-पोटजात असते. ती पुढे दर वर्षी प्रगती-पुस्तकावरही मिरवली जाते. वर्गात दर वर्षी "ओपन" कोण, "ओबीसी" कोण, "एसटी", "एनटी" कोण? हे जाहीररीत्या विचारले जाते. कोणतेही सरकारी कागदपत्र असो, त्यावर "जात" अनिवार्य असते. जोपर्यंत सरकारकडून रिझर्वेशन पद्धत बंद होणार नाही, आणि सरकारी वा कोणत्याही "फॉर्म"वर जात विचारणे बंद होणार नाही, तोपर्यंत या देशातून जात नष्ट होणार नाही. सर्वांना जर समान दर्जा हवा तर रिझर्वेशन सुद्धा आर्थिक निकषांवर हवे. अन्यथा  ज्यांची ना टक्केवारी चांगली, ना आर्थिक परिस्थिती खराब अशा कोणाला योग्यता नसताना प्रवेश मिळतो, पण "ओपन" या एका कारणामुळे उच्च जातीयाला तो मिळत नाही, तेव्हा तेढ निर्माण होणे सहाजिक आहे.

                कौटुंबिक स्तरावर पाहायचे झाले तर जात म्हणजे लग्न जमवताना सर्वात महत्त्वाचा निकष असतो. कितीही उच्च विचार असले, इतरांबद्दल कळवळा असला तरी अपत्याचे लग्न जमवताना मात्र येथे जातीचे पाहिजे. कोणी स्वत:चा जोडीदार स्वत: निवडला असेल तरी घरून पहिला प्रश्न येतो "आपल्यातली"/"आपल्यातला" आहे का? याचे मुख्य कारण असे मानले की प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या असतात, तरी प्रश्न असा उरतो की आपल्याकडे मुळात प्रत्येकासाठी वेगळ्या चालीरीती का आहेत? आणि दुसरा प्रश्न, हल्ली अशा काही चालीरीती उरल्या आहेत का? आणि समजा एखाद्याला दुसऱ्याच्या चालीरीती माहिती नसतील, तर त्या शिकायला असा कितीसा वेळ लागणार आहे?

                  अशा प्रकारे जातीव्यवस्था ना सरकारी पातळीवर संपुष्टात येऊ शकते ना वैयक्तिक पातळीवर. वेद सांगतात वर्ण कर्माने ठरतो, जन्माने नव्हे. पण हे लक्षात न घेता जात जन्मानेच ठरवली जाते, कर्माने नव्हे. आपल्या देशाची आणि धर्माची शोकांतिका म्हणजे आपले ग्रंथ काय सांगतात यापेक्षा प्रचलित काय आहे तेच ग्राह्य धरले जाते, आणि कर्माने जात मानण्यापेक्षा जन्माने मानणे हाही अगदी हाडामासात मुरलेला प्रचलित प्रकार आहे, जो सध्या तरी नष्ट होणे संभव दिसत नाही.

16 comments:

 1. जोपर्यंत सरकारकडून रिझर्वेशन पद्धत बंद होणार नाही, आणि सरकारी वा कोणत्याही "फोर्म"वर जात विचारणे बंद होणार नाही, तोपर्यंत या देशातून जात नष्ट होणार नाही >> अगदी अगदी

  ReplyDelete
 2. धन्यवाद अभिषेक, एकीकडे जातीभेद नको म्हणायचे आणि ज्यांच्याकडे सत्ता, पैसा तेच लोक जातीचे राजकारण करणार. कोणी हिणवण्यासाठी जात नको पण सवलतींसाठी हवी... असाच दुटप्पीपणा चालू राहणार इथे...

  ReplyDelete
 3. रिझर्वेशन आर्थिक निकषांवर हवे...याला मी पूर्णपणे सहमत आहे...!!! आणि जातपात... जोपर्यंत माझी, तुमची, आणि सर्व लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तरी हे अशक्यच आहे... धर्माच्या नावाने मिरवणारे आपण धर्मामध्ये न सांगितलेल्या गोष्टी सहज करतो...

  ReplyDelete
 4. यात बदल होतो आहे हे नक्की .. पण राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे आपण कालचक्र मागे खेचत चाललो आहोत की काय अशी शंका मनात येतेच!

  ReplyDelete
 5. युरोप-अमेरिकेत देखील जातिभेद दबून राहिले आहेत, नष्ट झालेले नाहीत. फार तर त्या जातीना नवीन लेबले लावलेली आहेत.

  ReplyDelete
 6. खरंय... श्रेष्ठत्व नाकारणे फार अवघड असते. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोवर काहीही बदलणार नाही....
  धन्यवाद सचिन...

  ReplyDelete
 7. धन्यवाद साविताताई...
  बदल खरंच स्वागतार्ह आहे. आणि राजकीय दूरदृष्टी म्हणायचं तर तिथे फक्त स्वार्थ आहे. एखादा नेता द्रष्टा असलाच तरी त्याला पुरेसा पाठींबा मिळतच नाही. सध्या आपण ना धड मागास वृत्तीचे आहोत ना पूर्णपणे पुरोगामी....

  ReplyDelete
 8. धन्यवाद Anonymous ...
  खरंय, मध्ये मोहनाताईंची एक कथा(http://mohanaprabhudesai.blogspot.in/2012/05/blog-post_20.html) वाचण्यात आली. त्यानंतर आमिश समाजाबद्दल थोडं जास्त वाचलं, आणि तिथे वर्णभेदाशिवाय असेही भेदाभेद आहेत हे वाचून फार आश्चर्य वाटलं. माणूस म्हणून प्रत्येकाची मानसिकता शेवटी सारखीच...

  ReplyDelete
 9. इंद्रधनू लेख खरच अप्रतीम आहे.माझी लेक आणि मी दोघींनी वाचला. ती लहान आहे अजून पण तिला देखील तुझे म्हणणे अगदी शंभर टक्के पटले.
  जातपात पूर्णपणे नष्ट होणे महाकठीण आहे. तो सुवर्ण दिन येणे पाहणे कदाचित दुर्लभ आहे...मुळात सगळीकडे जातीयतेचा दाखला विचारला जातो हे सत्य आहे. ती जन्माने चिकटली अगदी प्रत्येक कागदपत्रावर दिसते आहे.
  सुधारित विचारांच्या वळणांवर आपण जरी दुर्लक्ष्य केले तरी त्याची जाणीव आपणाला पावलोपावली करून दिली जाते....

  ReplyDelete
 10. सध्या आपण ना धड मागास वृत्तीचे आहोत ना पूर्णपणे पुरोगामी....

  ReplyDelete
 11. धन्यवाद श्रियाताई,
  आणि तुमच्या लेकीचेसुद्धा आभार :)
  अगदी खरंय... एखाद्याला जन्मापासून मरेपर्यंत त्याची जातच माहिती नाही अशी सुशिक्षित व्यक्ती सापडणे शक्यच नाही. बऱ्याच जणांकडून आडनावातूनदेखील जात शोधण्याचादेखील प्रयत्न केला जातो. कित्येकदा प्रत्येकाला त्याच्या जातीचा अभिमानदेखील असतो. आणि तुम्ही म्हणालात तसं हे सगळं संपेल तो सुवर्ण दिन येणे पाहणे कदाचित दुर्लभ आहे :(

  ReplyDelete
 12. प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद नकुल... :)

  ReplyDelete
 13. /मोहनाताईंची एक कथा(http://mohanaprabhudesai.blogspot.in/2012/05/blog-post_20.html) वाचण्यात आली. त्यानंतर आमिश समाजाबद्दल थोडं जास्त वाचलं, आणि तिथे वर्णभेदाशिवाय असेही भेदाभेद आहेत हे वाचून फार आश्चर्य वाटलं. माणूस म्हणून प्रत्येकाची मानसिकता शेवटी सारखीच.../

  अगदी खरं. मनुष्यस्वभाव कुठेही सारखाच शेवटी. इथे आल्यानंतर आणखी एका गोष्टीची सखेद गंमत वाटत आली आहे. खूप जणं हल्ली आपलं आडनाव सांगत नाहीत. तसं झालं की ऐकणारे त्यातच अडकून पडतात, आडनाव काय असेल या विचारात व्यग्र होतात. जात शोधण्याचाच हा एक प्रयत्न, नाही का?

  ReplyDelete
 14. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मोहनाताई :)
  बरोबर आहे तुमचं, बऱ्याच जणांना समोरच्याचे आडनाव समजले नाही तर चैन पडत नाही. काही जण तर सरळ आडनाव विचारतात, आणि यावरही कडी म्हणजे काही जण तर जातही विचारतात. आणि अजूनही काही जण "त्यांच्या त्यांच्यात" ग्रुप करून राहणारे सुद्धा असतात.

  ReplyDelete
 15. थोडासा गुंतागुंतीचा टॉपिक आहे.. जातीव्यवस्थेची निर्मिती नक्की कशी झाली हे कुणालाच सांगता येणार नसलं तरी कदाचित पुरातन काळामध्ये समाजाचं संतुलन राखायला हे सुरू झालं असावं.. पण कालांतरानं ज्ञातींचं रूपांतर जातींमध्ये झाल्यावर मग सुंदोपसुंदी सुरू झाली असावी. असा माझा कयास, मी काही जाणकार नव्हे. पण भल्याथोरल्या पसरलेल्या आपल्यासारख्या खंडप्राय देशात ह्या गोष्टी अस्तित्वात राहणारच हे मान्य करणं उत्तम. कारण अमेरिकेसारख्या देशातही जो वंशाचा मुद्दा सर्वचजण मान्य करून चालतात, तद्वतच आपल्यातलं हे प्रकरण आहे.
  बाकी, उपाय काय, हे मात्र समाजाभिसरणातूनच निश्चित होईल.

  ReplyDelete
 16. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद विद्याधरजी,

  हो विषय गुंतागुंतीचा आहे खरा, जोवर विज्ञान प्रगत नव्हते, आणि सवयींवर प्रादेशिकतेचा पगडा होता, तोपर्यंत वेगळ्या चालीरीती असणे मान्यही होते. पण आता फारशी तशी परिस्थिती राहिली नाही. जिथे शक्य आहे तिथे तरी सर्वांनी एकोप्याने राहायला हवे. याउलट हे शक्य करणे सोडून राजकारण्यांकडून/उच्च्जातीयांकडून सुद्धा हल्ली ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशी जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न होताना दिसतो... तुमचा कयास योग्यच आहे, आणि ती सुंदोपसुंदी अजूनही वाढतेच आहे. आणि देशाचं म्हणायचं तर अनेकतेमध्ये एकता असेल तोपर्यंत ठीक आहे, पण राजकारणी ही एकता फार काळ टिकून देतील असं वाटत नाही :(

  ReplyDelete