गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

साचा

एखादी वस्तू नेहमी त्याच आकाराची आणि त्याच नक्षीची बनवायची असली की त्याचा साचा बनवणं जास्त सयुक्तिक ठरतं. असा साचा तयार असला की सगळी मेहनत वाचते आणि हवी ती वस्तू पटकन तयार होते. अशा एकसारख्या वस्तू आपल्या समोर असल्या की आपल्याला लगेच ओळखू येतं की या एकाच साच्यातल्या आहेत आणि मग त्या साच्याचा आकाराचा अंदाज आपल्या डोळ्यांसमोर येतो. आपल्या मनातही असेच कित्येक अदृश्य साचे बनवून तयार असतात. आपल्या समोर एखादी अनोळखी व्यक्ती आली की आपल्याकडच्या कोणत्या साच्यात ती व्यक्ती अचूक बसतेय याचा आपल्याकडून नकळत विचार केला जातो. 

समजा ती व्यक्ती स्त्री असेल तर तिने कसे कपडे घातले आहेत, कोणते दागिने घातले आहेत, कशी केशरचना केली आहे याकडे आपलं लक्ष जातं. जर या सगळ्या गोष्टी एकदमच साध्या किंवा आपल्या दृष्टीने जुनाट असतील तर आपला साचा म्हणतो, ही रूढी परंपरांना चिकटून राहणारी असावी, हिला इंग्रजी बोलता येत नसावं, ही उदारमतवादी नसावी वगैरे वगैरे. आणि याऐवजी याउलट पेहरावातली स्त्री आपल्यासमोर आली तर आपला साचा म्हणतो ही गृहकृत्यदक्ष नसावी, हिला घरातल्यांची काही काळजीच नसेल, ही स्वार्थी आणि स्वतःपुरतंच पाहणारी असेल, कदाचित उद्धटही असेल, तिला अहंगंड असेल आणि बरंच काही!

एखादी व्यक्ती अतिशय शुद्ध आणि प्रमाण भाषा किंवा फाडफाड इंग्रजी बोलत असेल तर नकळत आपण तिला ज्ञानी आणि सभ्य ठरवून टाकतो आणि तसं नसेल तर एखाद्याच्या बुद्धिमत्तेची कदर होतही नाही. एखाद्याला त्याच्या जाती-धर्मावरून तर एखाद्याच्या प्रांतावरूनही आपण ठरवून टाकतो की ही व्यक्ती अशी असेल म्हणून. असेच कित्येक साचे आपण लोकांच्या वागण्याबोलण्यावरूनही बनवत असतो. सगळ्यांनी एकमेकांना कोणत्याही साच्यात न घालता एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात याची इतरांना ओळख व्हावी, म्हणूनच तर शाळा वगैरे अशा संस्थांमध्ये गणवेश असतात. 

पण असं किती वेळा झालं असेल ना की एखाद्याला पाहून त्या व्यक्तीबद्दल आपण मत बनवलं आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती अगदीच वेगळी निघाली? आपल्यालाही हे माहितीच असतं की या सगळ्या गोष्टींवरून एखाद्याबद्दल मत बनवणं चुकीचं आहे, पण एखादं कोणीतरी अनोळखी पुन्हा कुठेतरी ओळखीचं होण्यासाठी आपल्याला दिसतं आणि परत आपण कोणतातरी साचा वर काढून त्याला त्यात बसवतो, आणि चांगला परिचय झाला की पुन्हा एकदा अजून एक साचा गळून पडतो. 

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..