तुमचा आवडता ऋतू कोणता असा प्रश्न कधी ना कधी कोणीतरी विचारलाच असेल ना तुम्हाला?
माझा नावडता ऋतू नक्कीच उन्हाळा आहे, आणि आवडता पावसाळा!
थोडं लहान असताना पावसाळ्यात काही-बाही लिहायला वगैरे सुचायचं, उन्हाळ्याच्या लाहीनंतर सगळीकडे वातावरण प्रसन्न झाल्यामुळे असेल कदाचित पण मनही प्रसन्न व्हायचं.
तसं पण पावसाळा आला की कुत्र्याच्या छत्र्या आणि बेडकांची ओरड चालू होतेच नाही का!
पावसाळी ट्रेक्स असायचे, गेल्या वर्षीपर्यंत कितीही भिजलं तरी सर्दी-खोकला-ताप वगैरे हे काय असतं माहिती नव्हतं.
या वर्षी मात्र पावसाळ्याने की पावसाने (विचार करणारा ईमोजी) अगदी उबग आणलाय.
मे महिन्यात जे सुरु झालाय ते जायचं काही नावच नाही.
ऐन गौरी-गणपतीमध्ये हे धो-धो चालूच. थोडी रिमझिम असतेच दर वर्षी, पण यंदासारखा अगदी निरुत्साही वाटावं असा आठवत नाही कधी झालेला.
एक तर अजून गम्मतच झाली, ऑगस्ट मध्ये कोकणात ट्रिप काढलेली, १५ ऑगस्ट आणि सप्ताहांत जोडून येत होते. मग काय यावं फिरून म्हटलं. आणि राखीपौर्णिमा होऊन गेलेली त्यामुळे तर पाऊस जास्त नसेल असा अंदाज घेऊन बुकिंग केलं होतं. पण १५ ऑगस्टला तिकडे पोहोचताच प्रॉपर्टीवाल्यांनी सांगितलं की गेले पाच दिवस सतत पाऊस चालू आहे. एकतर कोकणातला पाऊस आणि वातावरण तर असं की प्रॉपर्टीच्या बाहेर पडायची इच्छा होईना. त्यात त्यांनी अजून एक बॉम्ब टाकला १६ ऑगस्टला दहीहंडी होती, तर प्रॉपर्टीमध्ये जेवण मिळणार नव्हतं, कामाला कोणी माणसंच येणार नाहीत म्हणे. म्हणजे पावसाने बाहेर जाता येईना आणि आत थांबून जेवणही नाही मिळणार. हे खरं तर त्या लोकांनी बुकिंग घेतानाच सांगितलं पाहिजे ना. कोकणाबद्दल ही गोष्ट एवढी गुपित कशी काय राहिली देव जाणे. मग काय १६ ऑगस्टलाच तिकडून काढता पाय घेतला आणि आलो पुण्यात परत!
तर असा हा २ ० २ ५ चा पावसाळा!
खरं सांगू का, आत्ता या वर्षीपर्यंत माझा आवडता ऋतू पावसाळाच होता! हो "होता"च :D