प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत कुशल, निपुण असतो. काहीजण अनेक कलागुणांमध्ये कुशल असतात. कधीकधी काही विशिष्ट शिक्षण घेतल्याने काही कौशल्ये प्राप्त होतात, कधीकधी काही जणांमध्ये उपजत काही कौशल्ये असतात तर कधी शिक्षण आणि अभ्यासाने काही कौशल्ये आत्मसात करता येतात. पण जगात काही जण असेही असतात की त्यांच्यामध्ये काहीच कौशल्य नाही, किंवा काही असेही असतात की अतिशय साध्या वाटणाऱ्या एखाद्याला सहज जमतील अशा गोष्टीही त्यांना कौशल्य वाटतात.
प्रत्येक कौशल्य पैसे मिळवण्यासाठीच असावे असे काही नाही, काही कौशल्ये आपण मनाच्या समाधानासाठी देखील शिकतो किंवा उपजत असेल तर त्यामध्ये गोडी वाढवतो. मात्र आपल्यामध्ये असणाऱ्या कौशल्याविषयी अनभिज्ञ असणे, किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याची कदर नसणे हे मात्र खरोखर दुर्दैवी आहे. काही स्वतः अनभिज्ञ असणाऱ्या लोकांना त्यांच्या आजूबाजूला अशी माणसे मिळतात की त्यांना त्याबद्दल जाणीव करून देतील. आपल्या आजूबाजूला असे पारखी लोकं मिळणेही भाग्याचेच आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत सहज वाटणाऱ्या गोष्टी, आधीच्या पिढीतले लोक सहज करत होते अशा काही गोष्टीही हल्ली कौशल्य झाल्या आहेत. उत्तम स्वयंपाक, छान रांगोळ्या, कलाकुसर, भरतकाम, विणकाम, शिवणकाम हे पूर्वीच्या स्त्रियांना सहज जमत असे, एवढेच का त्या गोष्टी इतक्या सहज मानल्या जायच्या की हे कौशल्य आहे असं करणाऱ्यांनाही माहिती नसे आणि पाहणाऱ्यांनाही. याउलट एखाद्या स्त्रीमध्ये ही कौशल्ये नसतील किंवा काही कमी असतील तर तिला स्त्री म्हणून कमी हुशार समजले जाई.
त्याच स्त्रिया आजच्या पिढीकडे पाहत असतील आणि छोट्या छोट्या गोष्टींचे क्लासेस पाहून आणि वरीलपैकी एखादी गोष्ट जरी छान जमत असेल तर होणारे वारेमाप कौतुक बघून निश्चितच त्यांना हेवा वाटत असेल. मुळात भारतीय समाजात काही गोष्टी म्हणजे कौशल्ये आहेत हेच खूप उशिरा रुजले. आपण सहज मानतो त्या गोष्टी म्हणजे कौशल्ये असू शकतात हेच आपण पाश्चिमात्यांकडून शिकलो आहोत, त्यामुळे कौशल्यांचे मार्केटिंग तर दूरच राहीले.
व्यक्ती जितकी निम्न स्तरातील असेल, मध्यमवर्गीय असेल, तितकी आजही तिच्यामध्ये जास्त कौशल्ये असतात त्याउलट उच्चवर्गीय लोकांमध्ये सगळं आयतं मिळत गेल्याने असेल, कमी कौशल्ये असतात. किंवा जी गोष्ट मध्यमवर्गीयाला सहज वाटत असेल ते उच्चवर्गीयाला कौशल्य वाटू शकते. हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे, कदाचित चुकीचेही असेल. आणि उच्चवर्गीयाला स्वतः कौशल्ये आत्मसात करण्यापेक्षा मोबदला देऊन ज्याच्याकडे कौशल्ये आहेत त्यांच्याकडून हवे ते साध्य करता येणार असेल तर तसेही त्याला स्वतःला ती कौशल्ये शिकण्याचे कारणच नाही.
काही वर्षांपूर्वी आपल्या घरी एखादा सुतार काम करत असे त्यामध्ये जे बारकावे तो बघत असे, तसे काम आज आपल्याला खूप पिच्छा पुरवल्याशिवाय करून मिळत नाही. पूर्वी एखाद्या गोष्टीला मोबदला देऊन जशी कामे करून मिळत तशी कोणत्याच क्षेत्रात आज करून मिळत नाहीत. कामातला प्रामाणिकपणा कधीच लोप पावला आहे. मोबदला देऊन काम करून घेण्यामध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष दिले नाही तर निकृष्ट दर्जाचे काम पदरी पाडून घ्यावे लागते. किंवा मग त्यासाठी जास्त मोबदला मोजावा लागतो. चांगली कामे करणारी माणसे मिळणे अवघड होत चालले आहे.
जेव्हा आपण मानवजातीच्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा असे जाणवते की काही वर्षांपूर्वीचा मानव आजच्या माणसापेक्षा जास्त कुशल होता. काही अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या हजारो वर्षांपूर्वी माणसाने सहज करून ठेवल्या त्या आज तंत्रज्ञान वापरूनही शक्य नाहीत. कौशल्य विकसित करणे आणि ते वापरून अजरामर कलाकृती करून ठेवणे यासाठी लागणारा संयम आता माणसामध्ये राहिलेला नाही. जगाने इतका वेग पकडला आहे की कौशल्य शिकायचं तेही पैसे मिळवण्यासाठीच. अन्यथा तो वेळेचा अपव्यय ठरतो. त्यामुळे अशी इच्छा आहे की कधीतरी जगाचा वेग कमी व्हावा आणि प्रत्येकालाच आपल्या कौशल्यामध्ये मनापासून रमण्याची संधी मिळावी.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा