शुक्रवार, ३ जुलै, २०२६

क्षण

वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या होत्या. सुट्ट्यांमधला नेहमीचा कार्यक्रम म्हणजे आजोळी जाणे. तिकडे मस्तपैकी आठ-दहा दिवस मुक्काम ठोकणे. रोज सकाळी उठा, आवरा शाळेचं वेळापत्रकाप्रमाणे दप्तर भरा, मग बसची वाट बघा. दिवसभर तासांवर तास आणि मधल्या सुट्ट्या संपवून परत घरी येऊन थोडा खेळ, थोडा गृहपाठ, जेवण, झोपणं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळा. या सगळ्या धावपळीतून एकदाच्या सुट्ट्या सुरु होऊन गावी गेलं की मग आयुष्यच थांबल्यासारखं वाटायचं. पण तेव्हा माहिती नव्हतं की हे आयुष्य थांबल्यासारखं नाही, तर खरं जगल्यासारखं आहे. 

रोज काही ना काही नवीन बघणं आणि नवीन जगणं. गावी लोडशेडींग तर नित्याचंच. दिवे कधी आले आणि कधी गेले हे समजायचं देखील नाही. खरं तर आजीआजोबांचा दिनक्रमच असा असायचा की दिवे आहेत वा नाहीत काही फरकच पडायचा नाही. एकतर उन्हाळ्यातला मोठा दिवस, पहाटेच उजाडायचं ते अगदी संध्याकाळी सातपर्यंतदेखील काळोख झालेला नसायचा. त्यात तिकडे संध्याकाळी सात-साडेसातलाच रात्रीची जेवणं करून घेण्याची पद्धत. मग बरोबर साडेआठ-नऊ पर्यंत डोळे झाकले जायचे आणि पहाटे पहाटेच जाग यायची. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे सगळं आपल्या गावी किंवा आजोळी अनुभवलंच असेल, खरं तर नवीन काहीच नाही यामध्ये.

पण काही असे खास क्षण आहेत, जे पुन्हा मिळावेत म्हणून जीव चातक झालाय. गावी आम्ही मुलं सगळी अंगणातच झोपायचो. एकदा अशीच मध्यरात्री कशाने माहिती नाही जाग आली. सामसूम तर खूप लवकरच होत असे पण नाही म्हणायला रातकिड्यांचे आवाज तेवढे किरकिरत होते चांगलेच. आणि असंच कुशीवर वळताना वर आकाशात नजर गेली. आणि मन स्तब्ध झालं एकदम, इतका लखलखता चांदणथवा मी आयुष्यात कधी पाहिला नव्हता. जिकडे नजर जाईल तिकडे लहानमोठ्या चांदण्यांचे असंख्य थवे. लहानमोठे काही पुंजके, काही एकदम एकमेकांना बिलगून बसल्यासारखे, काही लंबगोलाकार आकारात एकमेकांशी हितगुज करत असल्यासारखे किती पाहू आणि कुठे पाहू असं झालेलं. अमावस्येची रात्र असावी बहुतेक. चंद्र नसल्याने काळ्या पटलावर चांदण्या जास्तच लखलखत होत्या. अशी रोषणाई मी कधीच पाहिली नव्हती, चित्रातदेखील नाही, आणि प्रत्यक्षात त्या नंतर देखील नाही. आणि आधी जे आवाज रातकिड्यांचे म्हणून ऐकले ते आता त्या चांदण्यांचेच असल्यासारखे भासू लागले. ते नयनरम्य आकाश डोळ्यात सामावून घेत, पहाट होत आली आणि एक एक लहान लहान थवे नाहीसे होऊ लागले तेव्हाच पुन्हा डोळा लागला.

एकदा सुट्टयांमध्ये गावी असंच थोड्या गावाबाहेरच्या राममंदिरामध्ये गेलो होतो. मुलंमुलंच गेलो असल्याने वेळेचं भानच राहिलं नाही, नाहीतर आजी बरोबर असली की बरोबर तिन्हीसांजा होण्याच्या आत घरी पोहोचू असं आम्हाला पिटाळत असे. आणि सूर्य जरा दिसेनासाच झालाय असं लक्षात आल्यावर आम्ही झपझप घरी जायला निघालो. आणि थोडं टेकडीपलीकडे लक्ष गेलं तर काय, पूर्वेला टेकडीमागे हे एवढा मोठ्या भाकरीसारखा चंद्राचा गोल दिसत होता. तसा अजून सूर्य जाऊन अंधारही झाला नव्हता आणि हे चंद्राचं गुलाबी लोभसवाणं रूप समोर दिसत होतं. अमावस्येच्या रात्री जे आभाळभर चांदणं पाहीलं होतं ते सगळंच्या सगळं जणू या पौर्णिमेच्या चंद्रामध्ये एकवटलं होतं. त्याकडे पाहत पाहतच घरी पोहोचलो. तो तसा पौर्णिमेचा चंद्र ठरवून क्षितिजावर गेलं तरी आजवर कधी दिसला असं वाटलंच नाही.

गावाच्या आठवणी या दोन दिवसांनी, एक अमावस्या आणि एक पौर्णिमा यांनी अविस्मरणीय झाल्या आहेत. इतकंच का, पण तसंच दृश्य दिसलं ना तरी तो विलक्षण अनुभव परत कधी मिळाला असं वाटलंच नाही कधी. अवचित मिळणाऱ्या सुखाची सर ठरवून मिळवलेल्या सुखामध्ये नसते ना. असा असतो एक एक क्षण की तोच क्षण पुन्हा कधीच मिळत नाही.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा