शनिवार, ११ जुलै, २०२६

घर


आपण लहानपणापासून एखाद्या घरामध्ये राहत असतो. काहींना नोकरीतल्या बदल्यांमुळे सारखं घर बदलावं लागतं, त्यांना वेगवेगळ्या घरांमध्ये राहावं लागतं. आपले काही नातेवाईक किंवा मित्रमंडळी अशी असतात की त्यांचं घर आपल्याला खूप आवडत असतं. आपणही नेहमी आपलं घर कसही असो, त्यातही ते छान नीटनेटकं कसं ठेवता येईल या प्रयत्नात असतो. काही लोकांची गोष्ट वेगळी असते. त्यांना भटकण्यातून एवढा वेळच मिळत नाही की घराचा काही विचार करावा. कधीही येऊन चार घास खाऊन झोपण्याची सोय झाली म्हणजे काम झालं.

आजकाल सोशल मीडियामुळे लोकं छान छान इंटेरिअर करून त्याचे व्हिडीओ आणि रील्स सोमीवर टाकत असतात. ते पाहून काही घरं पाहून खूप छान वाटतं, काही कल्पनांची नक्कल करावीशी वाटते. काही इतकी चकचकीत असतात की हे घर आहे की हॉटेल असाही प्रश्न पडतो. काही इतकी किचकट नक्षीकामाची असतात की हे घर हे लोकं स्वच्छ आणि आहे तसं कसं ठेवत असतील हाच प्रश्न पडतो.

कोणतेही घर हा त्या घरातील कर्त्या व्यक्तींचा आरसा असतो. काही घरे पाहून आपल्याला असं वाटतेही की माझं घर इतकं छान असतं तर किती मजा आली असती. पण खरं तर झोपडीमध्ये रहा किंवा राजमहालामध्ये, घर हे घरातल्या माणसांनीच बनतं. आयुष्यात कधी ना कधी आपल्याला नव्या किंवा वेगळ्या घरामध्ये घर बदलण्याचे प्रसंग येतात. पण घरातील माणसे तीच असतील तर आपण फक्त वेगळ्या जागेत जातो आणि घराची स्पंदने मात्र तीच राहतात. शेवटी कुठेही राहीलो तरी घरातल्यांशी आपली नाती तीच राहणार असतात. त्याने मनात उमटणारे भाव तेच राहणार असतात. 

मला खरं तर भरलं घर खूप आवडतं, काही जणांकडे असं बघायला मिळतं की, सणावाराला भरपूर माणसे एकत्र जमतात, निदान गणपतीसाठी तरी सगळे एकत्र येतात. ते पाहून असं वाटतं आपल्याकडे एवढी माणसं असती तर किती मजा आली असती. पण बाबांकडे माझे आजोबा एकटेच एकुलता एक मुलगा, आणि आईकडेही माझी आजी एकटीच एकुलती एक. मागच्या पिढीपासूनच त्यांना भावंडेच नाहीत. मग पुढल्या पिढीतही मला एकच काका, एक मामा आणि एक मावशी. गोतावळा जमवायचा तरी कुठून. 

पण भरल्या घरातही सर्वांनाच एकमेकांशी चांगली नाती जपता येतातच असं नाही. हेवेदावेही दिसतात. अनेक वेगवेगळ्या स्वभावांमध्ये हे होणारच. जर घराचे काही नियम करून ते  पाळायचं ठरवलं आणि ते सगळ्यांकडूनच पाळले गेले तरच ते घर माणसांनी भरून आणि टिकून राहील. तरीही प्रत्येक कुटुंब वेगळं राहत असेल आणि वेळप्रसंगीच एकत्र येत असतील तर हल्ली तेवढं नक्कीच जमवून घेतात सगळे, तेवढ्यातच समाधान आहे.   

वास्तू नेहमी तथास्तु म्हणते असं म्हणतात, त्यामुळे सगळ्यांची घरं भरलेली राहोत आणि सर्वांना त्यांच्या घरी आनंदी राहण्याची स्पंदने मिळोत हीच देवाकडे प्रार्थना.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा