गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

ऋणानुबंध

            मध्यंतरी   एक सुंदर  वाक्य  वाचण्यात  आले  "ज्याच्याशी   आपला  जितका  ऋणानुबंध आहे  तितके  दिवसच   आपण   त्याच्याबरोबर  राहतो" आणि  मला  हे  वाक्य  मनापासून  पटले.

               काही लोकांशी आपण नेहमीच आत्मीयतेने वागतो, तर काहींशी जेवढ्यास तेवढे. शाळेतल्या काही मित्र-मैत्रिणी शाळा संपल्यानंतर संपर्कातही नसतात, जी   नसतात त्यांच्याशी ऋणानुबंध संपलेला असतो, आणि  जे त्यानंतरही आपलेच राहतात त्यांच्याशी ऋणानुबंध शिल्लक असतो.  तीच गोष्ट महाविद्यालयीन आणि कार्यालयीन  मित्रांची!  अशी कितीतरी माणसे आपल्याच स्मृतींमध्ये असतील जे आता संपर्कात नाहीत. काही संपर्कात असूनही फारसे बोलणे नाही,  शोधायला गेलो तर काही विशेष कारणही सापडणार नाही, पण आता आपण पूर्वीइतकेच  त्यांच्या जवळ नसतो हे मात्र खरं! असे नसेल तर सहवासात  दुरावा का येतो? प्रेमभंग का होतात? काही लोकांशी एकमेकांचे तोंडही न पाहण्या इतके  वितुष्ट का निर्माण होते?

                ऋणानुबंध दोन अर्थाने संपुष्टात येतात, ती व्यक्ती एकतर आपल्याबरोबर नसते किंवा ती व्यक्ती या जगातच नसते. काहींशी फार लळा नसताना ऋणानुबंध संपतात, तर काहींशी खूप जिव्हाळा असूनही ते संपू शकतात, काहींशी संपलेले बंध पुन्हा निर्माण होतात आणि कारणे नियती ठरवते!  आपण मात्र जुळलेले ऋणानुबंध जपण्याचा मनापासून  प्रयत्न  करायचा.......