मंगळवार, ९ एप्रिल, २०१३

अडगळ


            अडगळीच्या खोलीत त्या दिवशी काचा-कवड्या, जुने पत्ते, सोंगट्या, सागरगोटे सापडले. आणि विचार आला ही अडगळीची खोली आहे की आठवणींची खोली आहे? काही अचानक भेटणाऱ्या आठवणी… तिथे नकोशा झालेल्या वस्तूंकडे पाहिलं की तिथल्या अंधाराचा आणि धुळीचा त्रास होतो, पण अशा आठवणी भेटल्या की तेच धुलीकण तिथल्या कवडश्यामध्ये फेर धरून नाचू लागतात… 

          प्रत्येकाच्याच घरात एक अडगळीची खोली असते. कधीतरी चार-सहा महिन्यातून आपल्याला त्यात प्रवेश करावाच लागतो. इच्छा असो वा नसो. घराचं ऐश्वर्य किंवा नीटनेटकेपणा जिथे दिसतो त्या खोल्या तर आपण सर्वांनाच दाखवतो. पण अडगळीची खोली ही सर्वांसाठी नसते. तिथे फक्त आपल्याला किंवा आपल्या अगदी विश्वासू लोकांनाच प्रवेश असतो… कोणती गोष्ट कोणत्या क्षणी अडगळ बनेल हे काही सांगता येत नाही. आपण आपल्या स्वार्थाप्रमाणे सोयीची आणि गैरसोयीची वस्तू ठरवणार…

          कित्येक न लागणाऱ्या आणि याची विल्हेवाट लावू म्हणून बाजूला काढून ठेवलेल्या वस्तू. आणि कित्येक प्रिय पण इतर कुठे ठेवायला जागा नाही किंवा अगदीच रोज लागत नाहीत म्हणून तिथे ठेवलेल्या वस्तू... कधी आठवणीत रमावसं वाटलं की इथे खोलीचं दार उघडून आत जाता येतं. आणि पसाऱ्याचा त्रास होऊ लागला तर सरळ दार बंद करून बाहेर येता येतं. प्रिय आणि अप्रिय गोष्टी एकमेकांत गुंफलेल्या असल्या तरी त्यांना सहज बाजूलाही काढता येतं. आणि अगदीच काही नाही तर गोड आठवणी अलगद बाजूला काढून ठेवून नको असणारी अडगळ आपल्याला विकून टाकता येते.

             मनाच्या अडगळीचं दारही असंच हवं तेव्हा बंद करता आलं असतं किंवा या अडगळीला विकून टाकता आलं असतं तर किती बरं झालं असतं… 

            

१२ टिप्पण्या:

  1. मनाच्या अडगळीतील आठवणी वाचायला आवडल्या असत्या :-). अडगळीला विकून टाकायची कल्पना आवडली. बोवारीण आणि लॉटरी अशा दोन्ही गोष्टी त्यामुळे डोळ्यासमोर तरळल्या.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद मोहनाताई...
    मनातल्या अडगळी बद्दल लिहिण्याचा प्रयत्न करेन नक्कीच :)
    बोवारीण आणि लॉटरी :D, तुम्हाला पर्यायसुद्धा सापडले

    उत्तर द्याहटवा
  3. खुपच छान लिहीले आहे.. हे वाचता वाचता मी माझ्या अडगळीमधे फेरफटका मारतोय असं वाटत होतं.

    उत्तर द्याहटवा
  4. प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद विजयजी...
    प्रत्येकाची काही ना काही अडगळ असतेच :)

    उत्तर द्याहटवा
  5. मनातली आणि घरातली अडगळ जाम हट्टीच. एक वेळ माळ्यावरची विकता येईल पण मनातली... :D

    छान!

    उत्तर द्याहटवा
  6. खरंय भाग्यश्रीताई... आणि मनातली अडगळ तर जरा जास्तच हट्टी...
    प्रतिक्रियेसाठी अनेक धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  7. मनाच्या अडगळीचं दारही असंच हवं तेव्हा बंद करता आलं असतं किंवा या अडगळीला विकून टाकता आलं असतं तर किती बरं झालं असतं…

    kay bolu??? adagal apalyala sodun janar tari kuthe aani kashi? Ti tar kayamchi rahivasi aahe na manachi?

    उत्तर द्याहटवा
  8. खरंय श्रद्धाजी... आपली अडगळ आपल्याला सोडून कुठे जाणार, कदाचित तीच आठवणी बनून सोबत करेल काही वर्षांनी...

    ब्लॉगवर तुमचं स्वागत... प्रतिक्रियेसाठी अनेक धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  9. khoop divasat kahi vachale nahi tuze. Wanted to send email but there is no option to send email, hence putting in comment.

    उत्तर द्याहटवा
  10. आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद मोहनाताई... लवकरच येईल काहीतरी… इतक्यात काही वाचायलाही जमलं नाहीये :(
    इमेल चा विजेट पण टाकेन आता...

    उत्तर द्याहटवा
  11. emailcha option thev na blogvar. aga tu comment keleli chukun delete zali, I was happy ki khoop divsani ugvalis mahnoon :-).

    उत्तर द्याहटवा