खूप दिवसांनी लिहिल्यावर तसंही ते विस्कळीतच असणार आहे. त्यापेक्षा म्हटलं विस्कळीतच काहीतरी लिहावं. सकाळी उठायचं, थोडंफार काम करायचं, ऑफिसला जायचं, तिथंही थोडंफार काम करायचं, घरी यायचं, जेवायचं, झोपायचं. हिवाळा सुरु झाल्यापासून रोज ठरवायचं उद्यापासून व्यायाम करू पण एक दिवसही लवकर उठायचं नाही. या वीकेंडला करू पुढच्या वीकेंडला करू म्हणून पडून राहिलेल्या कामांची यादी वाढतच चाललेली.
आतापर्यंत काही मिळवलं नाही, इथून पुढे आयुष्यात काय करायचंय माहिती नाही. काही ठरवलंच तर कष्ट करायची तयारी नाही. मी एक आळशी गोळा किंवा दगड म्हणू फारतर. दगडाला कुठे माहिती असतं त्याला कुठे जायचंय. कोणी शेंदूर फासला तर देवळात जाउन बसतो कोणी लाथाडला तर तिकडे जाउन पडतो. माझं ध्येय काय मला माहिती नाही. माझ्या धर्मातील समजुतीप्रमाणे देवाने कोणालाच पृथ्वीवर उगीचच पाठवलेलं नाही, प्रत्येकाची इथे काहीतरी भूमिका आहे. मग त्याने मला कशाला पाठवलंय तेच मला सापडत नाही.
मानवच म्हणायचं झालं तर मी एक यंत्रमानव, मन नावाचं रसायन उगीचच त्यात ओतलेला. नको असलेल्या संगतीमध्ये तोंडदेखलं हसायचं, formality म्हणून विचारपूस करायची आणि हव्या असलेल्या जिवलगांना वेळ देता येत नाही, भेटता येत नाही. नको असलेली ओझी फेकून देता येत नाहीत या मनामुळे. आमचा समाज काय म्हणेल हेच का आमचे संस्कार, लाख लफडी या मनामुळे. काय होतं थोडं बेफिकीर व्हायला या मनाला, आयुष्य म्हणजेच एक ओझं बनवून टाकलंय पठ्ठ्याने, झेपेल की नाही याचा जराही विचार न करता. चक्रव्यूह भेदता येतील की नाही याचा विचार न करता त्यामध्ये उतरणारं आणि मग बाहेर येण्यासाठी केविलवाणी धडपड करणारं मन.
खूप वाटतं करण्यासारखं बरंच काही आहे. छान वाटतं, एखादं पुस्तक वाचून संपवलं की, टेकडीवरून फेरफटका मारून आलं की, एखादी छोटीशी पिकनिक करून आलं की, सुंदरसा सिनेमा पाहीला की. म्हटलं तर तसं सुरक्षित आयुष्य. पण त्यानंतर पुन्हा मनात एक न भरून येणारी पोकळी, एक रिकामी जागा, माहिती नाही कशासाठी, कोणासाठी…