खूप दिवसांनी लिहिल्यावर तसंही ते विस्कळीतच असणार आहे. त्यापेक्षा म्हटलं विस्कळीतच काहीतरी लिहावं. सकाळी उठायचं, थोडंफार काम करायचं, ऑफिसला जायचं, तिथंही थोडंफार काम करायचं, घरी यायचं, जेवायचं, झोपायचं. हिवाळा सुरु झाल्यापासून रोज ठरवायचं उद्यापासून व्यायाम करू पण एक दिवसही लवकर उठायचं नाही. या वीकेंडला करू पुढच्या वीकेंडला करू म्हणून पडून राहिलेल्या कामांची यादी वाढतच चाललेली.
आतापर्यंत काही मिळवलं नाही, इथून पुढे आयुष्यात काय करायचंय माहिती नाही. काही ठरवलंच तर कष्ट करायची तयारी नाही. मी एक आळशी गोळा किंवा दगड म्हणू फारतर. दगडाला कुठे माहिती असतं त्याला कुठे जायचंय. कोणी शेंदूर फासला तर देवळात जाउन बसतो कोणी लाथाडला तर तिकडे जाउन पडतो. माझं ध्येय काय मला माहिती नाही. माझ्या धर्मातील समजुतीप्रमाणे देवाने कोणालाच पृथ्वीवर उगीचच पाठवलेलं नाही, प्रत्येकाची इथे काहीतरी भूमिका आहे. मग त्याने मला कशाला पाठवलंय तेच मला सापडत नाही.
मानवच म्हणायचं झालं तर मी एक यंत्रमानव, मन नावाचं रसायन उगीचच त्यात ओतलेला. नको असलेल्या संगतीमध्ये तोंडदेखलं हसायचं, formality म्हणून विचारपूस करायची आणि हव्या असलेल्या जिवलगांना वेळ देता येत नाही, भेटता येत नाही. नको असलेली ओझी फेकून देता येत नाहीत या मनामुळे. आमचा समाज काय म्हणेल हेच का आमचे संस्कार, लाख लफडी या मनामुळे. काय होतं थोडं बेफिकीर व्हायला या मनाला, आयुष्य म्हणजेच एक ओझं बनवून टाकलंय पठ्ठ्याने, झेपेल की नाही याचा जराही विचार न करता. चक्रव्यूह भेदता येतील की नाही याचा विचार न करता त्यामध्ये उतरणारं आणि मग बाहेर येण्यासाठी केविलवाणी धडपड करणारं मन.
खूप वाटतं करण्यासारखं बरंच काही आहे. छान वाटतं, एखादं पुस्तक वाचून संपवलं की, टेकडीवरून फेरफटका मारून आलं की, एखादी छोटीशी पिकनिक करून आलं की, सुंदरसा सिनेमा पाहीला की. म्हटलं तर तसं सुरक्षित आयुष्य. पण त्यानंतर पुन्हा मनात एक न भरून येणारी पोकळी, एक रिकामी जागा, माहिती नाही कशासाठी, कोणासाठी…
छान लिहिता आहात. लिहित रहा.
उत्तर द्याहटवाछान लिहील आहे !!
उत्तर द्याहटवा……….
पण
"विस्कळीत पोकळी "
हे नाव कदाचीत जास्त
बर असेल
कारण आपली नेहमीची कामं हि एखाद्या पोकळी सारखीच असतात, आणि ती कामं विस्कळीत झाली कि आपण दुसर काही करूच शकत नाही .
आणि त्यातूनही एखाद्याने काही करून दाखवलं तर , एखाद्या ब्ल्याकहोल मधून प्रवास केल्या सारखे वाटते.
हा आणि आजून एक, खूप लिहित जा … :)
खूप धन्यवाद विजयजी :)
उत्तर द्याहटवामंदार :)
उत्तर द्याहटवाएक तर मनापासून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप आभार..
तू म्हणतोयेस ते पटलं "विस्कळीत पोकळी", blackhole अगदी योग्य उपमा...
तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे खूप छान वाटतं, नक्कीच लिहित जाईन.
खूपच छान लिहिलंय... अगदी माझ्या मनातल... मनातील गोष्टी शोधून शोधून बाहेर काढल्या सारख वाटल... पण मनातील या गोष्टी इतक्या सहजतेने फ़क़्त तुम्हीच मांडू शकता... मनाला स्पर्शून गेल... मस्तच... धन्यवाद... :-)
उत्तर द्याहटवाखूप धन्यवाद सचिन… :)
उत्तर द्याहटवातुम्ही वगैरे नको, तू म्हटलेलं जास्त आवडेल…