गुरुवार, ३ सप्टेंबर, २०१५

पाऊस...


या वर्षी पुण्यात पाऊस पडलाच नाही. एखादा आठवडा ऑफिसला जाताना पावसाळा आहे असं वाटलं बस्स इतकंच. काहीजण म्हणतात त्यांना पाऊस खूप आवडतो, तर काहीजण म्हणतात पाऊस आजिबात आवडत नाही. ज्यांना आवडत नाही त्यांचं समजू शकतो आपण, पण ज्यांना आवडतो म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे त्यांना फक्त पहिल्यांदा पाऊस पडला की आवडतो, की महिनाभर सलग पडला तरी आवडतो? मग ऑफिसला जाता-येताना पडला तरी आवडतो की फक्त फिरायला गेल्यावर पडला तर आवडतो? नुसती भुरभूर असेल तर आवडतो की मुसळधारसुद्धा आवडतो? दिवसा पडलेला आवडतो की रात्री पडला तर आवडतो? विजा चमकत असतील तर आवडतो की ढगांचा गडगडाट होत असेल तरीही आवडतो? आपण स्वत: चारचाकीत बसून फक्त बाहेर पडलेला आवडतो की चिखलातून चालायला लागलं तरीही आवडतो? एकटच असताना देखील आवडतो की सोबत कोणी खास असेल तर आवडतो?

मग सहज विचार केला मला पाऊस आवडतो की नाही आवडत? आधी उत्तर आलं की आपण पाऊस पडायला लागलाय म्हणून कुठेही, कसेही असलो तरी पावसात जाऊन नाचायला सुरुवात नाही करत, म्हणजे आपल्याला पाऊस नसावा आवडत. पण मग असंच काहीतरी देखील वाटतंच की पाऊस पडत असेल तर! मार्च-एप्रिल-मे च्या रखरखीत उन्हानंतर पहिला पाऊस पडला की मलाही वाटतंच की तो सुगंध भरून घ्यावा आपल्यात! फिरायला गेल्यावर पावसात भिजलं की छान वाटतंच; पण एरवीही ऑफिसातून येताना कधी भिजायला झालं तर वैताग न येता फ्रेश वाटतंच की. हां आता घरी असं भिजून गेलं की चहा हवा असतो ही गोष्ट वेगळी.

लहानपणी पाऊस पडायला लागल्यावर विरळ थेंब पडत असताना सुगंधाकडे नाक लावून बसायचं. सुगंध यायला लागला की पाय कधी अंगणाकडे वळायचे ते समजायचंच नाही. भिजून कधी समाधान तर व्हायचंच नाही पण आईने हाक मारली की नाईलाजाने घरात परत जावं लागायचं. नंतर मग कितीतरी वेळ खिडकीतून त्याला नुसतंच बघत बसायचं, त्यानंतर त्याचा आवाज कानात साठवायला सुरुवात करायची. कसलीतरी एक तल्लीनता जाणवायची. पावसाचे थेंब कोणत्या आकाराचे आहेत, रेषा किती अंतरावर आहेत. त्या किती तिरक्या आहेत आणि कोणत्या बाजूला तिरक्या आहेत. एक थेंब खाली पडला की तो खालच्या साचलेल्या पाण्यात किती मोठा गोल तयार करतो हे सगळं मला तासंतास बघत बसायला आवडायचं. पाऊस आणि मी आम्ही एकमेकांशी सोडून दुसऱ्या कोणीच माझ्याशी बोलू नये असं वाटायचं!

आताही वाटतंच हे सगळं असंच अनुभवावं म्हणून. पण नाही होत तसं. परवा घरी जाताना थोडे थोडे पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. त्याने लगेच ब्यागेतून रेनकोट काढून तो घालायला सुरुवात केली. त्याला म्हटलं तुला एवढ्याशा पावसात भिजलेलं पण नाही चालत? घर तर जवळच आलंय. तर तो म्हणाला की, पावसात भिजलेलं चालेल मला पण खास भिजायला गेलो असू तरच. असं ऑफिसमधून घरी जाताना फॉर्मल कपडे घातलेले असताना नाही आवडत भिजायला. मी काही माझं ज्याकेट ब्यागेतून काढलं नाही, नाही वाटलं घालावं असं! म्हणजे मला पाऊस आवडतो बहुधा…  पाऊस, I'm missing u….


आंतरजालावरून साभार