महिला दिनाच्या शुभेच्छा येतात त्यातून अजून जाणवतं की आपण कोणीतरी दुय्यम आहोत म्हणून या शुभेच्छा आपल्याला दिल्या जात आहेत. समाजातला जो घटक स्वत:ला दुय्यम मानतो त्याच्यासाठी असे दिवस बनवायची वेळ येते. निदान भारतीय महिलांवर तरी ती यायला नको होती. "प्राणी दिवस" , "पर्यावरण दिवस" असेल तर आपण समजू शकतो, कारण मानव स्वत:ला श्रेष्ठ प्राणी मानतो.
जोपर्यंत तुम्हाला इतरांच्या मदतीची गरज असेल, जोपर्यंत तुम्ही शोषित असाल तोपर्यंत सक्षम होण्यासाठी तुम्हाला तुमचं महत्त्व इतरांनी पटवून देणं ठीक आहे. आजही काही महिलांना त्याची गरज आहे, पण माझ्यासारख्या काहींना नक्कीच नाही. तुम्ही सक्षम आहात की नाही हा प्रश्न नसतो, तुम्ही स्वत:ला सक्षम मानता की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे.
महिला म्हटलं की ती "working lady" असते किंवा "housewife" तरी असते. गृहिणी असणं ही खरं तर फार मोठी जबाबदारी आहे. जोपर्यंत स्त्रिया गृहिणी होत्या तोपर्यंत समाजस्वास्थ्य इतकं बिघडलेलं नव्हतं. या "गृहिणी"पणाला योग्य ते "ग्लॅमर" मिळालं असतं तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही स्त्रीने पुरुषांप्रमाणे वागण्याचा हव्यास धरला नसता. स्त्री घरात लक्ष देते, घरासाठी जे काही करते ते पुरुष बाहेरून कमवून आणतो यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे याची जाणीव सगळ्यांनीच ठेवली असती तर आज भारतात "महिला दिन" साजरे करण्याची वेळ आली नसती.
तुम्ही अविवाहित आहात, विवाहित आहात, घटस्फोटित आहात की विधवा आहात? तुम्ही गृहिणी आहात की कमावण्यासाठी बाहेर पडता? तुम्ही नोकरी सांभाळून घर सांभाळता की घर सांभाळून काही कमावण्यास हातभार लावता? तुम्ही कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम आहात की तुम्ही घराच्या बॉस आहात या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही जे करता त्यात सुखी-समाधानी आहात का हे जास्त महत्त्वाचं आहे ना?
ज्या दिवशी महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्या लागणार नाहीत त्या दिवशी महिला खरोखर सक्षम झाल्या आहेत असं म्हणता येईल.