पूर्वी दुकानांवर पाटी असायची, अजूनही असते, 'आज रोख उद्या उधार'. उद्या कधी उगवतच नाही म्हणतात, पण आज रात्रीच्या बारानंतरच हा उद्या उगवणार असतो. आणि या उद्याच्या आशेवर आपण सगळे जगत असतो. रात्रीच्या गर्भातून पहाट उगवते म्हणतात. पण उद्याचं तसं नसतं. उद्या मी हे करेन उद्या मी ते करेन असं आपण खूप काय काय ठरवतो. उद्या हा शब्दच किती आशावादी आहे. आज एखादं काम नीट नाही झालं तर उद्या नक्की होईल असं वाटतं. एखादा मनुष्य वाईट परिस्थितीमधून जात असेल तर आज ना उद्या सगळं ठीक होईल असं म्हणतात. आज ना, म्हणजे जे आज ठीक नाही ते, उद्या नक्की ठीक होईल.
हा उद्या आपण पाहणार आहोत की नाही हे आपल्यालाही माहिती नसतं. पण मनात एकदम खात्री असते की उद्या तर उगवणारच! म्हणून रोज सकाळी काल ज्याला आपण उद्या म्हणालो होतो तो आजचा दिवस दाखवल्याबद्दल देवाचे आभारही मानतो. उद्या एखादी परीक्षा असेल तर त्याचा ताण आजवरच असतो. एखाद्या गोष्टीबाबत चालढकल करायची असली की आपण उद्या करू उद्या करू असं म्हणून टाळत असतो. पण काहीकाही गोष्टी अशा असतात की कोणत्या तरी उद्याला त्या कराव्याच लागतात.
उद्या हा भविष्यार्थी शब्द कोणीच नाकारात्मकतेने वापरत नाही, पण उद्याची चिंता मात्र सगळ्यांनाच असते. एखादी महत्त्वाची मीटिंग नीट होईल का, एखादी नोकरीची मुलाखत नीट पार पडेल का, एखादा व्यवसाय असेल तर उद्याही नफा होईल का, हातावर पोट असेल तर उद्याची भाकरी मिळेल का अशी या आशावादी उद्याची काळजीही सर्वांनाच असते. पण या काळजीतही तोच आशावाद आहे की उद्या तर मी बघणारच!
एका वयापर्यंत आपण उद्या काय होईल, भविष्य कसं असेल या उत्सुकतेमध्ये जगतो, तर थोडं जास्त ज्येष्ठ झालो की उद्या काय होईल पेक्षा काल काय झालं यामध्ये मन जास्त रमते. या काल आणि उद्या मध्ये जो आज असतो त्याला मात्र दोघांचंही ओझं वागवावं लागतं. पण त्यालाही काल कसा गेला होता यापेक्षा उद्या छानच असेल हे ओझं वागवायला नक्कीच आवडत असणार. तरीही या बेभरवशाच्या उद्याला असं म्हणावसं वाटतं.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा