शनिवार, १८ जुलै, २०२६

वाढदिवस


कोणालाही आपला वाढदिवस म्हणजे मोठा आनंदाचा दिवस असतो. एक काळ असायचा, ज्या काळात मुलांना शाळेत घालण्याच्या वेळेस सगळ्या मुलांची जन्मतारीख ही एक जूनच असायची. कधीकधी जनसालही लक्षात नसे. डोक्यावरून हात पलीकडच्या कानाला लागला की मूल शाळेत घालण्याच्या वयाचे झालेले असे.
आजी-पणजीच्या काळात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, होळीच्या आदल्या दिवशी, गौरीपूजनाच्या दिवशी असे त्यांचे जन्मदिवस लक्षात ठेवलेले असायचे. आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे कोणताही महिना त्यामध्ये एक तरी उल्लेखनीय सण किंवा घटना असल्याशिवाय जात नाही. त्यामुळे त्यांची पद्धतही चांगलीच म्हणायची.

आताचा एक काळ आहे की पालक बाळाची जन्मतारीख-वार-महिना  जन्मवेळ मिलिसेकंदासहित नोंद करून ठेवतात. अशा वेळी वाढदिवसाचे महत्त्व वाढले नसेल तरच नवल. माझ्या लहानपणी काही ठराविक वर्षांचे होईपर्यंत हौस म्हणून लहान मुलांचे वाढदिवस केले जात. त्यातही फार मोठा सोहळा वगैरे नसे. घराजवळचीच थोडीफार बच्चेकंपनी बोलावून त्यांना केक-चॉकलेट आणि थोडा खाऊ दिला जाई. त्या दिवशी उत्सवमूर्ती असल्याने असेल कदाचित, वाढदिवस म्हणजे काहीतरी खास असं  लहानपणापासून मनावर बिंबलं जातं.

पण माझ्यासारखे काहीजण असतात ज्यांना आपला वाढदिवस म्हणजे विशेष काही न वाटता इतर दिवसांप्रमाणे एक सामान्य दिवस वाटतो. काही माणसे पाहण्यात आहेत की कितीही वय झालं तरी अमक्यातमक्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून रुसून बसतात. मला तर याच्या अगदी उलट वाटतं. कोणी शुभेच्छा नाही देऊ शकले तर विशेष काय आहे त्यात एवढे. इतरांसाठी तर तोसुद्धा इतर अनेक दिवसांसारखाच आणखी एक दिवस असतो. मार्केटिंगसाठी आपल्याला सेवा पुरवणाऱ्या काही संस्था आपल्याला इमेल किंवा मेसेजवर शुभेच्छा पाठवतात.

कोणाच्या शुभेच्छा आलेल्या आवडत नाहीत असं नाही, एखाद्याने आपण इतके महत्त्वाचे नसतानाही आठवून फोन किंवा मेसेज केला तर नक्कीच छान वाटते. पंतप्रधानांची एक साईट आहे. बहुतेक तिकडे रजिस्टर केलं असेल तर तिथूनही शुभेच्छांचं एक पत्र इमेलवर प्राप्त होते. पंतप्रधान या पदावर व्यक्ती कोणीही असो पद देशातील सर्वांत मोठ्या पदांपैकी एक आहे. आणि एखाद्याला वैयक्तिकरित्या ओळखत नसताना त्यांचा द्वेष वा जवळचे समजणारे आपण कोण. तर हे पत्र ऑटोमेटेड आहे हे पूर्णपणे माहीती असूनही ते मिळाल्याचाही आनंद होतो. पण खूप थाटमाट करावा आणि भरपूर लोकांना बोलावून आपलं कौतुक करून घ्यावं इतका महत्त्वाचा हा दिवस मला नक्कीच वाटत नाही.

बरेच जण वाढदिवशी अनाथाश्रमांना दान करणे, धार्मिक दानधर्म करणे, वृक्षारोपण करणे, सामाजिक उपक्रम राबवणे वगैरे चांगल्या प्रकारे आपला दिवस व्यतित करतात. खूप गोतावळा न आवडणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना उत्सवमूर्ती व्हायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. आणि अगदी काहीच न करणे हादेखील पर्याय आहेच.      

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा