गुरुवार, २३ जुलै, २०२६

चक्रव्यूह


चक्रव्यूह हा एक सापळा होता. त्यामध्ये एकदा योद्धा ते तोडण्यासाठी आत गेला की बाहेर येण्याचा मार्ग त्याला सापडत नसे कारण चक्रव्यूहाची रचना योद्धा आत गेल्यानंतरही गोल गोल फिरत राही. मग लक्षात ठेवणे अवघड असे की बाहेर पडण्याचा मार्ग कोणता. कधीकधी वाटतं आपलं आयुष्यदेखील असंच चक्रव्यूह आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याशी लढणारे योद्धे नसतात या चक्रव्युहामध्ये, पण आपण आपलं दैनंदिन जीवन जगणं हाच एक  चक्रव्यूह आहे. कधीकधी एखाद्या प्रसंगातून असं वाटतं आपण कधी बाहेर पडणार. मग बऱ्याच प्रयत्नांनी आणि सहनशीलतेने आपण त्यातून बाहेर आलो की समजतं हा तर चक्रव्यूहाचा एक छोटासा भाग होता ज्यातून आपण बाहेर आलो, खरं चक्रव्यूह तर भेदलंच नाही अजून.


कधी कोणाची न आवडणारी साथसंगत असेल, कधी रोजचं ऑफिसचं रुटीन असेल, कधी मागे लागलेलं; गळ्यात पडलेलं एखादं काम असेल, किंवा कधी आपणच हौसेने मागून घेतलेली एखादी जबाबदारी असेल, कधीतरी असा काळ येतोच की मला यातून मुक्त करा. मला हे नाही करायचं. मला बदल हवाय. मग बदल म्हणून कधी आपण हिंडून-फिरून येतो, पण ती चक्रव्यूहातून मिळालेली छोटीशी सूट असते. त्यानंतर पुन्हा आपलं रुटीनसोबत युद्ध चालू होतं.

कधी आपल्या एकदम जवळचं एखादं माणूस असतं ज्याच्या वागण्याने आपण एकदम वैतागलेले असतो, पण त्याला सोडून द्यावं इतकीही वाईट परिस्थिती नसते किंवा असंच सोडून देऊ शकत नाही. मग ते अजून एक चक्रव्यूह असते, हे कधी बदलेल, याचं वागणं कधी सुधारेल. समजा तसं झालं तर पुढे दुसरं काहीतरी अजून वाढून ठेवलेलं असतं. असं काहीतरी की ज्याचा आपल्याला कंटाळा येऊन आपण म्हणतो की सगळं सोडून कुठेतरी पळून जावं असं वाटतं.

काहींचं आयुष्य आपल्याला समोर दिसत असते की त्यांना काय काय संकटांना सामोरे जावे लागते. पण आपलं चक्रव्यूह मात्र कोणालाच दिसत नसतं. कारण ती मनाची एक अवस्था असते फक्त. खरंच फार मोठं संकट वगैरे आलं तर छान लढतो आपण त्याच्याशी. पण रोजची न सांगता येणारी मरगळ, रुटीनचा कंटाळा हा खरं संकट नसतोच पण ते एक चक्रव्यूह नक्कीच असतं ज्यात आपण पुरते अडकलेले असतो. चक्र शब्द आलाय म्हणजेच समजून जायचं की या फेऱ्यांमध्ये आपण पुन्हा पुन्हा अडकणार.

आजूबाजूची माणसं बदलली, जागा बदलली किंवा नोकरी बदलली म्हणून आपण चक्रव्यूहातून बाहेर येणार नसतो, चक्रव्यूह फिरून आपण फक्त त्याच्या दुसऱ्या एखाद्या परिघात पोहोचणार असतो. प्रत्येक मनुष्याला देवाने त्याच्या जन्मासोबतच एका अभेद्य अशा चक्रव्यूहाची भेट देऊन पाठवलेलं असतं. आणि शेवटपर्यंत ज्याचं त्याला ते चक्रव्यूह भेदत लढत राहायचं असतं.   

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा