मंगळवार, २१ जुलै, २०२६

भीती


जगातल्या कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही असा माणूस अस्तित्वात असणं शक्य नाही. हा आता दाखवत नसतील काहीजण पण कसली ना कसली भीती तर प्रत्येकालाच असते. कोणाला पाण्याची, कोणाला उंचीची, कोणाला विदयुत उपकरणांची, कोणाला गर्दीची, कोणाला गाडी चालवण्याची, कोणाला एकटेपणाची! खरं तर हे खूपच ढोबळ प्रकार झाले. अमका फोबिया तमका फोबिया असं आपण ऐकत असतो. पण खरंच प्रत्येक प्रकारच्या भीतीला एखाद्या फोबियाचं नाव देणं इतकं अशक्य आहे की ती यादी अगणित संख्यांची होईल.

लोकांना अंघोळीची सुद्धा भीती असू शकते, एखाद्या रंगाची भीती असू शकते, कोणाशी बोलण्याची, इतरांमध्ये मिसळण्याची, नोकरीसाठी मुलाखती देण्याची, अंधाराची, अमानवीय शक्तींची आणि कशाकशाची नाही. भीती वाटत असेल तर माणूस त्या गोष्टीचा विचार करूनही इतका घाबरतो की प्रयत्न करून पाहणे तर फारच लांब राहिलं. कोणत्याही एखाद्या बाबतीत आत्मविश्वास कमी असला की त्याची भीती वाटू लागते.

कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला इतकी अनभिज्ञ असते की त्यामुळे काय वाढून ठेवले असेल म्हणून भीती वाटते, तर कधी एखादी गोष्ट बऱ्याचदा प्रयत्न करूनही जमली नाही म्हणून त्याची भीती निर्माण होते. कधीकधी एखाद्या गोष्टीची नुसतीच इतरांना भीती वाटते म्हणून आपल्यालाही भीती वाटते. काही प्रकारच्या भीती अगदीच अनाकलनीय असतात, एखाद्याला अमकी भीती का आहे हे ती व्यक्ती स्वतःदेखील सांगू शकत नाही, कदाचित ती भीती गुणसूत्रांमधून किंवा पालकांचं , घरातल्या इतरांचं वागणं पाहून येत असावी.

कातरवेळी माणसाचं मन बऱ्याचदा उदास, खिन्न होते, किंवा प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर आठवण येते. किंवा जुन्या आठवणी मनात उचंबळून येऊन मनाचीही कातर अवस्था होते. एकटं एकांतात असू तर संधिप्रकाश अजूनच उदासीन करून जातो. संध्याछाया भिवविती मना अशी अवस्था बहुतेक जणांची असते. एकतर दिवस संपून रात्र सुरु होणार आहे याची ही चाहूल असते. पूर्ण उजेड आणि पूर्ण अंधार या दोहोंच्या मधली ही वेळ असते.

या भीतीचं मूळ मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेपासून आलं आहे. जंगलांमध्ये राहताना संध्याकाळी अंधार झाल्यावर शिकार करणाऱ्या श्वापदांची भीती वाढत असे. ही अंधारात हिंस्र किंवा विषारी प्राण्यांची वाढलेली भीती, आणि यातून एखादा हिंस्र प्राणी मागे लागला तर जीव मुठीत घेऊन पलायन करणे, यांमुळे आजही संधिप्रकाश पसरला की प्रत्येक मानवाला हुरहूर दाटून येते. आजही अंधाराची भीती वाटते, आणि आजही दिवसा रम्य भासणार निसर्ग, समुद्र, पर्वत, नद्या, जंगले रात्री भयाण वाटतात. त्यामुळे संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे, शुभंकरोति म्हणणे या गोष्टी करून आपण मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो.

तर तुम्हाला कोणत्या एखाद्या किंवा अनेक गोष्टींची अशी भीती होती किंवा आहे, आणि त्यावर तुम्ही मात केलीत की करण्याचा प्रयत्न चालू आहे. किंवा असं आहे की ही भीती राहू देत अशीच मला याचं काहीच करायचं नाही. भीतीवर जिद्दीने मात करणारी माणसेच आयुष्यात काही मिळवू शकतात. आजकाल ते काहीतरी म्हणतात ना 'डर के आगे जीत है'. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा