Image Courtesy: Internet |
काल चक्क स्वप्नात
महाराज आले,
अन चौफेर नजर फिरवून
मग म्हणाले...
सह्याद्री तर अजूनही तोच,
या देशाची हद्द
कुठे गेली पण आज इथल्या
गड्यातली जिद्द
पहा तिकडे चौको-चौकी
सज्ज जयंतीचे मांडव
मनातुनी परी सर्व कोरडे,
ईर्ष्या घालतसे तांडव
आमचे नाव म्हणजे राहिले आहे
निव्वळ राजकारण
पैशासाठी सेनापती ठेवती
देशासही तारण...
आमच्या मिरवणुकीत नाचे
ही मद्यधुंद तरुणाई
कुठे आहे तानाजींची उर्मी
अन बाजींची नवलाई?
आमच्या नावे इथे
या संघटना मिरविती
ग्रंथ इथले तुडविती हे,
जनास अन भिवविती
आम्ही जोपासले अठरापगड इथे,
नांदले गुण्या-गोविंदाने
आज काही म्हणती 'शिवबा आमचा',
का गर्जती ही विधाने?
बहुत दु:खेदेखील इथे
दिसते आहे एक आस..
इथला सामान्यच पुन्हा घडवेल
महाराष्ट्राचा इतिहास...
जगदंब जगदंब, श्रींच्या मनी
आज पुन्हा तीच इच्छा येवो,
अन सच्च्या मराठी मनाचे आज
इथे 'स्वराज्य' होवो...