शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

पनू...

प्रिय पनू,

साधारण अडीच दशकांपूर्वी उद्याच्या दिवशी काळोख्या रात्री अचानक जाग आली. आजूबाजूला पाहिलं तर घरात मी आणि आजी दोघीच होतो. आजी गाढ झोपलेली मग मी पण डोळे घट्ट मिटून घेतले आई-बाबा घरात का नाहीत याचा विचार करत. मग सकाळी आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो तर आईच्या शेजारी एक छानसं गोंडस बाळ झोपलेलं होतं. मला सगळ्यांनी सांगितलं की ती तुझी लहान बहीण आहे आणि तू तिची ताई आहेस. मला तुला पाहून खूप म्हणजे खूप आनंद झाला.

मी पहिलीत होते तेव्हा तू एक वर्षाची वगैरे होतीस. शाळेत जाताना तुझ्याशी खेळून जायचं आणि शाळेतून आल्यावरही पहिल्यांदा तू काय करत आहेस ते पाहायचं हाच माझा दिनक्रम होता. तू सगळ्यांचीच लाडकी होतीस. बाबांची जरा जास्तच. ते तुला बबडा, म्हमद्या वगैरे बऱ्याच काय काय नावांनी हाक मारायचे. पणजी आजी म्हणायची की हा खरंतर मुलगाच होता पण चुकून शेवटच्या क्षणी मुलगी झाली म्हणून तू मुलांसारखी वागतेस. 

छोटीशी होतीस तेव्हा सगळीकडे माझ्यामागे दुडूदुडू पळत यायचीस. मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळत असताना तू असायचीस लिंबूटिंबू म्हणून आणि मला आउट करवून द्यायचीस. कधी लपाछपी खेळताना लपलेलं असताना मध्येच तुला मला काहीतरी मोठ्याने सांगायचं असायचं तर कधी शिवणापाणी खेळताना तू धडपडली की मला लगेच तुला उचलून घ्यायचं असायचं. कधी तुला साडी नेसवायची म्हणून मी साडीचा तुझ्या अंगावर बोंगा करून ठेवायचे तर कधी तुझे केस विंचरायचे म्हणून त्यात अजून गुंता करून ठेवायचे.

दुपारच्या वेळी आई आपल्याला शेजारी घेऊन झोपायची. आपल्याला तर काही झोप आलेली नसायची. मग आई तिची झोपमोड होतेय म्हणून आपल्याला ओरडायची. ती जितकं ओरडेल तितकं आपल्याला अजून कायकाय सुचून हसू यायचं मग आपण फ्रॉकचा बोळा करून तोंडात कोंबून आवाज न करता हसायचो ते आठवतं का तुला? मला लहान झाले म्हणून तू घातलेले माझे कपडे तुलाच जास्त छान दिसतात असं मला वाटायचं आणि आता आपलं माप एकच आहे आणि अजूनही माझे कपडे तुलाच जास्त छान दिसतात असं मला वाटतं. तुझे मशरूमकट वाले मान हलवली की उडणारे दाट केस मला खूप आवडायचे. आणि तुझं गोड हसू आणि काळेभोर डोळेसुद्धा!

तुला सगळे चिडवायचे की तुला वैदिणीकडून अर्ध्या भाकरीवर घेतलंय, म्हणून ताई सगळ्यांची लाडकी आहे आणि तू नाहीस. एकदा सुया-बिब्बे विकणारी बाई बाहेर ओरडत चालली होती तर तुला इतका आनंद झाला आणि तू पळतच घरात येउन सांगू लागलीस की आई ते बघ माझी आई चाललीये. खूप हसलो होतो आम्ही तेव्हा. बाहेर कोणताही फेरीवाला चालला की तू घरात येउन आपल्याला ते घ्यायचय का म्हणून विचारायचीस. एकदा असंच आपल्याला सुकट-बोंबील घ्यायचय का म्हणून विचारत आली होतीस. आणि सगळ्यांनी नाकाला हात लावला होता. "फुलों का तारो का" हे तुझं आवडतं गाणं, त्यातल्या "सारी उमर हमें संग रहना है" मुळे ताईचं  लग्न ठरत नाहीये असं आई गमतीने म्हणायची.

एका दिवाळीत फुलबाज्या उडवताना एक पेटती फुलबाजी तू तुझ्या पायाजवळ टाकलीस आणि तुझ्या फ्रॉकने पेट घेतला. आपण दोघीच होतो तिथे आणि क्षणभर मला समजेनाच काय करावं. मग पटकन तुला बाजूला ओढून मी आरडाओरड करायला सुरुवात केली आणि बाबांनी येउन फ्रॉकला लागलेली आग विझवली. खूप घाबरले होते मी तेव्हा, तुला काही झालं असतं तर… तरीपण तुझा उद्योगीपणा चालूच राहिला पुढेही!

मी ताई आहे म्हणून मला इगो आहे मोठं असल्याचा. त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला की सरळ सांगण्याऐवजी मी चिडचिड करत बसते. पण तू कधीही मनावर न घेता काय झालं ते शोधून काढतेस. खूप मनमिळाऊ, समजूतदार आणि परिपक्व विचारांची आहेस तू. लहान असूनही कधीकधी माझी मोठी बहीण होतेस. माझ्या मैत्रिणीदेखील सगळ्या माझ्यापेक्षा तुझ्याच जास्त जवळच्या आहेत. आणि आपल्याला एकमेकींची सगळी सिक्रेट्स माहिती आहेत.

माझं लग्न झाल्यापासून थोडं दूर गेलोय आपण. पण मनाने एकमेकांशी  बांधल्या गेलेल्या आपण कधी दूर आहोत असं मला मुळीच वाटत नाही. "बहीण" हे जगातलं मला सगळ्यात जास्त उमगलेलं, सगळ्यात जास्त प्रेम मिळालेलं आणि मी सगळ्यात जास्त अनुभवलेलं नातं आहे. तुझ्या असण्याने या नात्याला पुरेपूर न्याय मिळाला असं मला वाटतं. कोणाहीपेक्षा जास्त तू मला जवळची आहेस आणि नेहमीच राहशील. खूप काही लिहायचं राहिलं असेल, ते आता पुन्हा कधीतरी… औक्षवंत हो आणि नेहमी सुखी राहा… १२-१२ ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

तुझी ताई…

छायाचित्र आंतरजालावरून



गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

पाच वर्ष


पाच वर्षांपूर्वी याच दिवशी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. पाच वर्षांत खरंतर पन्नास पोस्टस देखील झाल्या नाहीयेत. म्हणायला पाच वर्ष फार मोठा आकडा वाटतोय पण असं वाटतं की काल-परवाच तर लिहायला सुरुवात केली मी. लिहिलं ते मनापासून लिहिलं. लिहिण्यापेक्षा वाचनच मला जास्त आवडतं, पण पूर्वी कधीतरी लिहिलेल्या ४-५ कविता डायरीत होत्या म्हणून ब्लॉगवर त्या टाकायला सुरुवात केली. नाहीतर निबंधलेखन सोडलं तर लिहिण्याशी तसा कधी संबंध आलाच नाही.

दिसामाजी काहीतरी ते लिहावे पण इथे दोन-दोन महिन्यानंतरही लिहिलं जात नाही माझ्याकडून. मध्ये दीड वर्षाचा मोठ्ठा ब्रेकही घेऊन झाला. तसं तर फार कोणी अपेक्षेने वाट पहावी असंही काही नाहीये इथे. इथे लिहिण्याचा पाच वर्षांमध्ये मला मिळालेला फायदा म्हणजे जेव्हाही मला अस्वस्थ वाटेल तेव्हा लिहिलं-वाचलं की बरं वाटायचं. बरेच नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले. खूप छान छान ब्लॉग्स वाचायला मिळाले. सगळ्यांकडून प्रोत्साहन मिळालं. आणि रुटीन सोडून काहीतरी केल्याचं समाधान मिळत गेलं. 

अजूनही खदखदत असतंच बरंच काही मनात, पण सगळ्याच गोष्टी नाही उतरवता येत हव्या तशा! तरीही जमेल तसं प्रामाणिक लिहिण्याचा प्रयत्न करायचाय. तुमची सगळ्यांची अशीच साथ असूद्यात… 





बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

सिनेमा-सिनेमा


"मुंबई-पुणे-मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली" दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि दोन्ही बघायचेच होते. तसा प्रेम-रतन…. देखील त्याच दिवशी झाला पण पहायच्या यादीत तो दूर-दूर पर्यंत नाही. अगदी television वर येईल तेव्हाही… 

आधी आवडलेल्या चित्रपटाबद्दल बोलूयात अर्थात कट्यार! चित्रपट त्यातल्या सगळ्याच गोष्टींसाठी आवडला. संगीत, अभिनय, दिग्दर्शन, कलाकारांची निवड, सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न या सगळ्यासाठीच चित्रपट आवडला. सुबोध भावेचा हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न असेल असं मुळीच वाटत नाही. तल्लीन होऊन चित्रपट पाहणे म्हणजे काय याचा अनुभव हा चित्रपट पाहताना घेतला. कोणीही प्रत्यक्ष समोर गात नसताना, कोणतंही live संगीत नसतानादेखील आपण नकळत तल्लीन होऊन जातो. असंच बालगंधर्वच्या वेळी देखील झालं होतं. 

सर्वच गाणी/पदे अप्रतिम! थोड्याफार उणीवा नक्कीच आहेत. जसं की सदाशिवचा सांगीतिक संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचत नाही. घराण्याच्या अभिमानाचं महत्त्व लक्षात येत नाही पण चित्रपटगृह सोडताना आपली प्रतिक्रिया असते वाह, काय सुंदर कलाकृती होती. अर्थात ज्यांना या प्रकारच्या संगीतात अजिबातच रुची नाही त्यांना चित्रपट कंटाळवाणा होऊ शकतो. पण मी तर बुवा पुन्हा एकदा आणि चित्रपटगृहात जाऊनही पुन्हा एकदा पहायला नक्कीच तयार आहे. तुम्हीही नक्की पहा! आणि हो,  महागुरू सचिन यांचं खास अभिनंदन ;) . एकदम भारी चित्रपट… 

आता मुंबई-पुणे-मुंबई २. मनापासून पटण्यासारख्या फार थोड्या गोष्टी चित्रपटात होत्या. एकतर दुसराच सीन वोडकाचा पाहून तिथूनच चित्रपटाशी disconnect व्हायला सुरुवात झाली. हल्ली ही फार common गोष्ट असेलही, पण एखादी मुलगी आधुनिक आहे, तिच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि ती professionally यशस्वी आहे हे ठसवण्यासाठी तिने दारू कशाला प्यायली पाहिजे? तिचा smartness तिच्या विचारांमधून समजायला हवा जो  मुंबई-पुणे-१ मध्ये दिसला होता. चित्रपटात अशा गोष्टी दाखवून लोकांना प्रोत्साहन द्यावं का हा वादाचा मुद्दा आहे. चित्रपट मनोरंजन करण्यासाठी असतात आणि लोकांना शहाणपण शिकवण्यासाठी नाही असाही मतप्रवाह आहे आणि चित्रपटांना सामाजिक भान असायला हवं असं मानणारा देखील एक वर्ग आहे, मी अर्थातच दुसऱ्या वर्गात (कुठल्या जमान्यात राहतेस तू असं म्हणायचं असेल तर खुशाल म्हणा!). 

गौरी (मुक्ता बर्वे) उगीचच confused दाखवली आणि त्याचा अतिरेक केलाय. शेवटी शेवटी तर तिच्याशी सहमत होण्यापेक्षा तिच्यावर हसूच येतं. खऱ्या आयुष्यात कोणाच्या बाबतीत same situation आली तर कोणीही कदाचित अर्णवची निवड करेल. पण केवळ आपल्या चित्रपटाचा नायक गौतम असल्याने त्याची निवड तिने केली असं वाटलं. चित्रपटात जाहिराती घुसडण्यासाठी गौतमचं profession बेमालूमपणे बदललं. आणि पिक्चरच्या तिकिटात आम्हांला जाहिरातीही पहाव्या लागल्या. एकंदर एकाही पात्राशी स्वत:ला relate करता आलं नाही. फक्त प्रशांत दामलेंमुळे जरा काहीतरी जान आली.

तमाशा देखील बघायचाय. मला ज्या प्रकारचे सिनेमे आवडतात त्या प्रकारचे सिनेमे न आवडणाऱ्याना हा चित्रपट आवडला नाही म्हणजे मला नक्कीच आवडेल (हुश्श). आपल्या type चा वाटतोय तमाशा, बघू लवकरच!

छायाचित्र आंतरजालावरून


गुरुवार, ३ सप्टेंबर, २०१५

पाऊस...


या वर्षी पुण्यात पाऊस पडलाच नाही. एखादा आठवडा ऑफिसला जाताना पावसाळा आहे असं वाटलं बस्स इतकंच. काहीजण म्हणतात त्यांना पाऊस खूप आवडतो, तर काहीजण म्हणतात पाऊस आजिबात आवडत नाही. ज्यांना आवडत नाही त्यांचं समजू शकतो आपण, पण ज्यांना आवडतो म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे त्यांना फक्त पहिल्यांदा पाऊस पडला की आवडतो, की महिनाभर सलग पडला तरी आवडतो? मग ऑफिसला जाता-येताना पडला तरी आवडतो की फक्त फिरायला गेल्यावर पडला तर आवडतो? नुसती भुरभूर असेल तर आवडतो की मुसळधारसुद्धा आवडतो? दिवसा पडलेला आवडतो की रात्री पडला तर आवडतो? विजा चमकत असतील तर आवडतो की ढगांचा गडगडाट होत असेल तरीही आवडतो? आपण स्वत: चारचाकीत बसून फक्त बाहेर पडलेला आवडतो की चिखलातून चालायला लागलं तरीही आवडतो? एकटच असताना देखील आवडतो की सोबत कोणी खास असेल तर आवडतो?

मग सहज विचार केला मला पाऊस आवडतो की नाही आवडत? आधी उत्तर आलं की आपण पाऊस पडायला लागलाय म्हणून कुठेही, कसेही असलो तरी पावसात जाऊन नाचायला सुरुवात नाही करत, म्हणजे आपल्याला पाऊस नसावा आवडत. पण मग असंच काहीतरी देखील वाटतंच की पाऊस पडत असेल तर! मार्च-एप्रिल-मे च्या रखरखीत उन्हानंतर पहिला पाऊस पडला की मलाही वाटतंच की तो सुगंध भरून घ्यावा आपल्यात! फिरायला गेल्यावर पावसात भिजलं की छान वाटतंच; पण एरवीही ऑफिसातून येताना कधी भिजायला झालं तर वैताग न येता फ्रेश वाटतंच की. हां आता घरी असं भिजून गेलं की चहा हवा असतो ही गोष्ट वेगळी.

लहानपणी पाऊस पडायला लागल्यावर विरळ थेंब पडत असताना सुगंधाकडे नाक लावून बसायचं. सुगंध यायला लागला की पाय कधी अंगणाकडे वळायचे ते समजायचंच नाही. भिजून कधी समाधान तर व्हायचंच नाही पण आईने हाक मारली की नाईलाजाने घरात परत जावं लागायचं. नंतर मग कितीतरी वेळ खिडकीतून त्याला नुसतंच बघत बसायचं, त्यानंतर त्याचा आवाज कानात साठवायला सुरुवात करायची. कसलीतरी एक तल्लीनता जाणवायची. पावसाचे थेंब कोणत्या आकाराचे आहेत, रेषा किती अंतरावर आहेत. त्या किती तिरक्या आहेत आणि कोणत्या बाजूला तिरक्या आहेत. एक थेंब खाली पडला की तो खालच्या साचलेल्या पाण्यात किती मोठा गोल तयार करतो हे सगळं मला तासंतास बघत बसायला आवडायचं. पाऊस आणि मी आम्ही एकमेकांशी सोडून दुसऱ्या कोणीच माझ्याशी बोलू नये असं वाटायचं!

आताही वाटतंच हे सगळं असंच अनुभवावं म्हणून. पण नाही होत तसं. परवा घरी जाताना थोडे थोडे पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. त्याने लगेच ब्यागेतून रेनकोट काढून तो घालायला सुरुवात केली. त्याला म्हटलं तुला एवढ्याशा पावसात भिजलेलं पण नाही चालत? घर तर जवळच आलंय. तर तो म्हणाला की, पावसात भिजलेलं चालेल मला पण खास भिजायला गेलो असू तरच. असं ऑफिसमधून घरी जाताना फॉर्मल कपडे घातलेले असताना नाही आवडत भिजायला. मी काही माझं ज्याकेट ब्यागेतून काढलं नाही, नाही वाटलं घालावं असं! म्हणजे मला पाऊस आवडतो बहुधा…  पाऊस, I'm missing u….


आंतरजालावरून साभार


सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

पाकीट...



गिफ्ट म्हणून 'वस्तू द्यायची' की 'पैसेच द्यावेत' हा तसा नेहमीच सतावणारा प्रश्न. समोरच्याची आवड-निवड ठाऊक असेल आणि आपला choice त्याला आवडत असेल तर वस्तू घ्यायला छान वाटतं. खरं तर दर वेळेस वेगळं आणि उपयुक्त असं काय घ्यावं हाही प्रश्न असतोच, पण काही लोकांना दुसऱ्याचा choice आजिबात म्हणजे आजिबातच आवडत नाही.  त्यांना स्यमंतक जरी आणून दिला तरी म्हणतील निळा का आणला? डाळींबी कित्ती छान दिसला असता. असो!

माझे भाऊ मला कधी वस्तू देतात तर कधी पाकीट. आपल्याला तर बाबा काहीही दिलेलं आवडतं.
choice वगैरे पण फार भानगड नाही म्हणून त्यांनाही कधी टेन्शन येत नाही. 
तर 'तो' सुद्धा दर राखी पौर्णिमेला त्याच्या बहिणींना पाकीटात पैसे घालूनच देतो. तसेच या वेळीही देणार होता. नेहमीप्रमाणेच ती आधीच तयार न ठेवता अगदी ऐन वेळी भरणार होता. 
पाकिटांचा विषय निघाला म्हणून मी त्याला म्हटलं, या वेळी मलाही हवंय पाकीट.
तर तो म्हणे, अगं काही नाही अगदी साधंच आहे पाकीट, एकदम पांढरं, आपली बँकेची वगैरे कागदपत्रं ज्यात येतात ना तसं.  
असे कसे असतात हे नवरे लोक? त्याला खरंच समजलं नाही का, की म्हणजे मलाही पैसे हवेत असं म्हणायचंय? आता इतकं सरळ बोलायला कसं शिकायचं?  



गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

सवय...

मी पाणी खूप कमी पिते असं सगळे मला सांगतात. खरं तर लहानपणी व्यवस्थित पाणी प्यायलं जायचं. पण माझी एक मैत्रीण होती शाळेतली. ती आणि मी रोज शाळेत एकत्र चालत जायचो. तिने एकदा बोलता बोलता सांगितलं की ती खूप पाणी प्यायची म्हणून तिच्या पाठीमध्ये पाणी झालं आणि मग ऑपरेशन करून ते काढून टाकावं लागलं तेव्हा चार तांबे पाणी निघालं. आता तेव्हा इतकं कळायचं वय नव्हतं की जास्त पाणी प्यायल्याने पाठीत पाणी वगैरे होत नाही, काहीतरी आजार झाला तरच होतं. पण ते ऐकल्यापासून माझंच पाणी पिणं कमी होऊन गेलं आणि आता ती सवयच बनून गेली.

असंच पुन्हा शाळेत असतानाच कोणाच्यातरी गप्पांमध्ये असं ऐकलं की, एक शाळकरी मुलगा होता. शाळेत जाताना त्याने शाळेचे बूट घातले तर त्यात विषारी पाल होती. त्याच्या ते लक्षात आलं नाही. आणि त्या पालीचं विष त्याच्या शरीरात भिनून त्याचा मृत्यू झाला. हे ऐकलं आणि दुसऱ्याच दिवसापासून मला माझे बूट ३-४ वेळा सगळीकडून झटकून घेऊन मगच घालायची सवय लागली. ही सवयदेखील आजतागायत कायम आहे. 

कधीतरी एकदा चहा प्यायला आणि चहाची सवय होऊन गेली. व्यायाम मात्र हजारदा सुरु केला आणि हजारदा सुटला पण त्याची सवय काही व्हायला तयार नाही. वाईट सवय लागणं सोपं आणि सुटणं अवघड तर चांगली सवय लागणं अवघड आणि सोडणं सोपं असतं. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे काही उगीचच लागलेल्या सवयी असतात, ज्या सुटता सुटत नाहीत. सवयीचं रुपांतर व्यसनात झालं की मग मात्र ते सोडवणं खरंच अवघड होऊन बसतं, आणि बाकी व्यसनं तरी सोडवता येतील पण एखाद्या माणसाचं व्यसन लागलेलं कसं सोडवायचं… 


बुधवार, २२ जुलै, २०१५

बायोडेटा...


नाव: ऋचा दिलीप महामुनी
जन्मतारीख/वेळ: ---
आईचे नाव: ---
वडिलांचे नाव: ---
जात: ---
उपजात: ----
गोत्र: ---
रास: ---
शिक्षण: ---
नोकरी: IT  Professional
पगार: ६५,०००/- p.m
.
.
.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------


ऋचाला आज ऑफिसमधून लवकर घरी जायचं होतं. आज पुन्हा एका नवीन 'स्थळा'ला भेट द्यायची होती. फोनाफोनी होऊन 'बघायचा' कार्यक्रम ऋचाच्याच घरी ठरला होता. कसंतरी काम संपवून एक बस आणि पुढे रिक्षा करत धावतपळत तिने घर गाठलं. ठरलेल्या वेळेच्या जेमतेम १५-२० मिनिटं आधी ती घरी पोहोचली. घर आवरायची वगैरे तयारी दादांनी आणि निमिषाने करून ठेवलेली आणि नाश्त्याची आईने! पोहोचल्याबरोबर पटकन ती तयार झाली. संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि दादांचा फोन वाजला. पाहुणे जवळच्या चौकात आले होते, आता तिथे त्यांना घरापर्यंत आणण्यासाठी जायचं होतं. दादा त्यांना घेऊन येण्यासाठी गेले आणि पाचेक मिनिटात आलेच घरी.

"या, या, बसा. पाणी घ्या." दादांनी पाण्याचे ग्लास पुढे केले. 

मुलगा, त्याची आई आणि बाबा स्थानापन्न झाले.
म्हणायची पद्धत म्हणून मुलगा म्हणायचं. नाहीतर वय वर्षे ३४ असलेला इसम मुलगा या गटात आजिबातच बसणारा नव्हता. आई दादा आणि त्या दोघांचं जुजबी बोलणं झाल्यावर निमिषा  ऋचासाठी बाहेर येण्याचा निरोप घेऊन किचन मध्ये आली.
"बराय का?" ऋचाने विचारलं.
"बराय, फोटोत आहे तसाच आहे, फक्त फोटो पासपोर्ट साईझ होता म्हणून पोट नव्हतं दिसत त्यात!". निमिषा उत्तरली. 
ऋचा नाश्ता घेऊन बाहेर आली. सगळ्यांना एक एक डिश देऊन ती परत आत गेली.
"कसा वाटला?" - निमिषा. 
"बराय" - ऋचा. "मी तरी कुठे अप्सरा लागून गेलीये, आणि आता २८ च्या पुढे माझंच वय गेल्यावर काय अपेक्षा ठेवायच्या?"
चहा घेऊन ऋचा परत बाहेर आली.
Hobbies काय आहेत, किती वर्ष नोकरी करते, पगार किती आहे, कामाची पद्धत काय आहे, सुटी कधी असते असं नेहमीचं बोलणं झालं. बोलायला सगळे मोकळेढाकळे वाटले. बोलून झाल्यावर मि. सत्येन पारखी आणि त्याच्या आई वडिलांनी सर्वांचा निरोप घेतला. २-४ दिवसांत आमचा निर्णय कळवू म्हणाले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

"ताई, काय करणारेस त्या सत्येन पारखीचं?" - निमिषा
"काय करू? मला तसाही फार choice राहिला नाहीये, माझ्यानंतर परत तुझं लग्न व्हायचंय अजून."
"हम्म, पण म्हणून कोणालाही हो म्हणशील?"
"नाही गं, बराच आहे की सत्येन. Database Admin ची पोस्ट आहे, साठ हजार रुपये पगार आहे, पुण्यासारख्या ठिकाणी स्वत:चा flat, चारचाकी गाडी आहे. अजून काय हवं? आता वयात आहे सहा वर्षांचा फरक पण कुठेतरी Compromise तर करावंच लागणार ना." - ऋचा
"अगं पण तुला click झाला का तो? मला नाही वाटलं तसं."
"वेडी आहेस, लहान आहेस अजून तू. असं कोणी कोणाला click वगैरे होत नसतं. ते फक्त प्रेमात पडलेल्यांना होतं. किंवा मग ज्या मुलीच्या घरी श्रीमंती असेल आणि ती दिसायला सुंदर वगैरे असेल तर मग मुलं पण तशीच येतात सांगून. मला माहितीये माझ्या बाबतीत clicking वगैरे काही होणार नाहीये."
"मला फार काही कळत नाही ताई, पण स्वत:च्या अगदीच मनाविरुद्ध निर्णय घेऊ नकोस इतकंच सांगेन." - निमिषाला अजून अनुभव नव्हता काहीच पण काळजी स्पष्ट दिसली तिच्या डोळ्यांत.
"तू नको काळजी करूस, होईल ठीक सगळं."
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

संध्याकाळच्या वेळी दादांचा फोन खणाणला.
"नमस्कार, मी मिसेस पारखी."
"हो नमस्कार, बोला ताई."
"आम्ही आमच्या गुरुजींकडे ऋचा आणि सत्येनची पत्रिका दाखवून आलो, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पत्रिका उत्तम जमतेय हो. आमच्याकडून होकार आहे."
"अरे वा वा, फारच छान, अहो पण ऋचाशी आमचं तसं काही बोलणं झालं नाही अजून, ती घरी आली की घेतो मी बोलून तिच्याशी. सॉरी हं, पण तिलाही सध्या ऑफिसमध्ये workload जास्त असल्याने राहून गेलं बोलायचं" - इति दादा.
"अहो काहीच हरकत नाही, मुलांनाही हवा तितका वेळ द्यायला पाहीजे नं विचार करायला, आपल्या वेळेसारखं नाही राहिलं हो हल्ली!" - मिसेस पारखी
"बरं बरं, उद्या दुपारपर्यंत मी कळवेनच तुम्हाला काय असेल ते."
"अगदी, ठेवू मग फोन, अच्छा!"
"अच्छा!"
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

ऋचा आणि सत्येनचं एकदा बाहेर भेटणं झालं. दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणी होत एक बैठकीचा दिवस ठरला. शनिवार-रविवार पारखींना जमणार नसल्याने पुन्हा अधला मधलाच दिवस ठरला. सत्येनला येणं शक्य नव्हतं. ऋचाला मात्र थोडं लवकर यावं लागणार होतं. ठरल्याप्रमाणे ऋचा तिच्या वेळेत घरी आली. पाहते तर घरी तिच्याकडचे सोडून कोणीच नाही. आईने सांगितलं की बैठक झाली. साधारण एक-दीड महिन्याने साखरपुडा आणि सहा महिन्यांनी लग्न असं ठरलंय. देण्याघेण्याचं ते लोक आत्ता तरी आम्हाला काही नको म्हणालेत. सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला पण एक शंका वाटतेय की त्यांच्याकडून मुलाचे आई-वडिल सोडून दुसरा एकही नातेवाईक आला नाही. ऋचाने या सगळ्यावर फार विचार केला नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

"हाय, रस्ता सापडायला काही त्रास झाला नाही ना." - ऋचा
"छे, मुळीच नाही. अगदीच सोपा होता रस्ता यायला." - सत्येन
आज पुन्हा एकदा दोघे बाहेर भेटत होते. ऋचाच्या ऑफिसजवळच्याच restaurant मध्ये भेट ठरली होती. रात्री ८-८.३० ची वेळ होती, तरी दोघांचं south Indian वर भागवू असं ठरलं. इकडच्या तिकडच्या गप्पा होता होता सत्येनने तिला तिचा कोणी खास मित्र आहे का म्हणून विचारलं. तसं कोणी नव्हतंच. ऋचानेही मग तोच प्रश्न त्याला केला.
"हो तशी आहे, मोनिका तिचं नाव, तिचं लग्न झालेलं आहे. पण जेव्हा आयुष्यात काही वेगळं घडतं किंवा एखाद्या सल्ल्याची गरज पडते तेव्हा तेव्हा मी तिच्याशी बोलतो." - सत्येन म्हणाला.
"इतकंच असेल तर हरकत नाही." ऋचाला तितकी मैत्री फार आक्षेपार्ह वाटली नाही.
"बाय द वे, माझा पत्रिका वगैरे गोष्टींवर विश्वास आहे. मला स्वत:ला थोडंफार समजतं आणि सध्या एका गुरुजींकडे शिकतो सुद्धा आहे."
"अरे वा, फारच छान, पण माझा नाहीये तितकासा विश्वास या सगळ्यावर. म्हणजे शास्त्र म्हणून आहे. पण जन्मवेळच चुकली किंवा ज्यांना पत्रिका दाखवतोय त्यांचा अभ्यास तितका नसला तर काहीच अर्थ नाही या सगळ्याला" ऋचाने तिचं मत व्यक्त केलं.
"असो, पण तुला मात्र मी तुझी पत्रिका पाहूनच होकार दिला. तुझ्या पत्रिकेवरून असं दिसतं की तुझा स्वभाव खूप चांगला आहे." - सत्येन
आज दोघेही एकमेकांशी जरा खुलून बोलले होते.
सत्येनने त्याची चारचाकी आणली होती आणि जाता जाता तो ऋचाला तिच्या घरी सोडवणार होता. सत्येनने बिल भरलं आणि दोघे निघाले. तिथून घर तसं तासाभराच्या तरी अंतरावर होतं. पहिली दहा मिनिटं तरी शांततेतच गेली. ती गोष्ट बोलावी की नाही याचाच ऋचा विचार करत होती. काय विचार झाला ते तिला समजलं नाही पण तोंडातून शब्द बाहेर पडू लागले.
"माझ्या घरी माझी बहीण आणि मी दोघीच आहोत. आमचं घर थोडंफार माझ्या आर्थिक support वर अवलंबून असेल. म्हणजे दर महिन्यालाच असं नाही पण कधी काही emergency असेल तेव्हा. मी त्यावेळी माझ्या घरच्यांना मदत करू शकते ना ?" - ऋचा काय बोलली ते अजिबात विचार न करता बोलली पण मनातलं होतं सगळं आणि सत्येनच्या प्रतिक्रियेची ती वाट पाहू लागली.
"ठीक आहे, चालेल." - सत्येन
ऋचाला हायसं वाटलं.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

"माफ करा, अचानक बोलावलं तुम्हाला, पण काही गोष्टी बोलायच्या होत्या." - सत्येनचे बाबा
"हो बोला ना, काही साखरपुड्याची तारीख वगैरे पाहिलीत का तुम्ही?" - दादा
"ते पाहूच हो, महिन्याला पंधरा वीस मुहूर्त चालू आहेत सध्या. तुमची मुलगी परवा म्हणत होती ती लग्नानंतरदेखील तुमच्याकडे बघणार म्हणून."
"अहो.... " - दादा, त्यांना मध्येच तोडत पुन्हा पारखी - "आमच्या मुलीचं लग्न होऊन तीन वर्षं झाली, पण फक्त एकदा येऊन गेली इथे ती. एकदा लग्न झाल्यावर माहेराशी संबंध आम्हाला चालणार नाहीत. आम्हीही आतापर्यंत फक्त दोन वेळा जाऊन आलो तिच्याकडे. आतादेखील पाहिलंत ना, इतकं भावाच्या लग्नाचं ठरत आलंय पण ती दिसली तुम्हाला एकदा तरी? तुमची मुलगी म्हणत होती नंतरदेखील ती तुम्हाला आधार देणार, ते आम्हाला पटलं नाही. एकदा लग्न झालं की तिच्यावर पूर्ण हक्क सासरकडच्यांचा आहे."
"तुम्हाला काय म्हणायचंय ते समजलं, निघतो आम्ही." - दादा
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

ऋचाने तिचा biodata आज update केला.

नाव: ऋचा दिलीप महामुनी
जन्मतारीख/वेळ: ---
आईचे नाव: ---
वडिलांचे नाव: ---
जात: ---
उपजात: ----
गोत्र: ---
रास: ---
शिक्षण: ---
नोकरी: IT  Professional
पगार: ५०,०००/- p.m.
.
.
.


मंगळवार, २ जून, २०१५

नाव...

एका सरळ रेषेत तिचा प्रवास चालला होता.
शांत डोहात.
स्वत:ला सावरत.
तिच्यावर अवलंबून असलेल्यांना सांभाळत.
वातावरणाशी झुंजत.

सगळं करता सरळ रेषेची कधी वळणं व्हायला लागली तिला समजलंच नाही.
बरंच अंतर काटून सहज मागे पाहिल्यावर पाण्यावर उमटलेली सगळी वळणं स्पष्ट दिसू लागली.
सुरुवात केलेला किनारा कधीच नजरेच्या टप्प्याआड गेला होता.
शेवटाचा किनारा कोणता हे ठाऊकच नव्हतं.

आता एकतर फक्त पुढे जाणं किंवा भरकटत राहणं इतकंच राहिलं होतं हाती.
कित्येक वादळांना तोंड देऊन त्राण संपलं.
प्रवाहाने जसं नेलं तशी ती वाहवत गेली, कोणताही निर्णय न घेता.
पुढे पुन्हा नवीन भोवरा गिळून टाकायला तयार होता.
पुन्हा हेलकावे सुरु.

या वेळी बुडायचंच होतं.
डावीकडे झुकलं तरी आणि उजवीकडे झुकलं तरी.
पण आता कुणीकडे हा निर्णय तीच घेणार होती.
कारण फक्त समाधान हवं होतं, स्वत:च्या मर्जीने बुडाल्याचं!!

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

हट्ट...

दर वर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्याची चाहूल लागली आणि दिवाळी चार-आठ दिवसांवर आली होती. वातावरणात सगळीकडे आनंद, उत्साह भरून राहिलेला दिसत होता. कोणाच्या घरी रंगरंगोटी, कोणाच्या घरी भांडी घासून पुसून ठेवणे तर कोणाकडे फराळाचे पदार्थ बनवण्याची कामं चालली होती. शाळांना दिवाळीची सुटी लागली होती. फटाके वाजवायला अजून सुरुवात झाली नसली तरी मधूनच पानपट्ट्या, एखादी लवंगी, टिकल्या, नागगोळ्या यांची रेलचेल चालू होती.

तिलाही दिवाळी खूप आवडायची. वय असेल सहा-सात वर्ष. आईने घासलेली भांडी सुकत ठेव, आजीने केलेल्या करंज्या, शंकरपाळ्या गरम गरम खाऊन बघ. कधी आजी प्रेमाने देणार तर कधी म्हणणार, 
"थोड्याच आहेत गं, आताच फार नको खाऊस". 
कोणी फटाके उडवत असेल तर त्यांच्याकडे कोणकोणते फटाके आहेत ते जाउन बघ हे सगळं करायला तिला फार गंमत वाटे. आणि काहीच नाही तर शाळेला सुटी म्हणून इकडून तिकडे बागड. दिवाळीच्या सुटीत बाबा पाठांतर करून घ्यायचे ते तिला फार आवडायचं. 
"या वेळी मला नवीन ड्रेस हवाय हं" हे सुटी लागताच ती बाबांना सांगायला विसरली नव्हती. बाबाही सवईप्रमाणे "घेऊ हा या वेळी नवीन कपडे" असं म्हणाले. 

असंच एक दिवस सकाळी मित्र-मैत्रिणींसोबत खेळताना एक मैत्रीण म्हणाली, 
"या वेळी मी निळ्या रंगाचा फ्रॉक घेतलाय सोनेरी किनार असलेला, आईला रोज घालायला मागते पण आईने सांगितलंय की उद्या लक्ष्मीपूजन आहे, तो ड्रेस उद्या घालायचा. मी मस्त निळा फ्रॉक घालून फटाके उडवणार उद्या!"
असंच मग प्रत्येक जण आपापल्या कपडे आणि फटाक्यांचं कौतुक सांगू लागलं आणि हिची बेचैनी वाढत चालली. घरी आल्यावर ती आईला म्हणाली "आई, मला पण उद्या नवीन ड्रेस हवाय. या वर्षी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे."
"बाबांना सांग हो आल्यावर." - आई 

ती खिडकीला डोळे लावून बाबांची वाट पाहत बसली. आतून तिच्या आवडत्या चकल्यांचा खमंग वास येउनही तिची नजर खिडकीपासून ढळली नाही. आईने कसंबसं जेवायला नेलं पण दर दोन घासांनंतर बाहेर सायकलचा आवाज आला की तिची मान दरवाज्याच्या बाजूला कलायची बाबा आहेत का ते पाहायला. दिवाळीच्या वेळी बाबांना घरी यायला जास्तच उशीर व्हायचा हे ठाऊक असूनही ती परत खिडकीपाशी जाउन बसली. चिमुकल्या डोळ्यांमध्ये झोप दाटून आली होती पण तरीही निग्रहाने डोळे उघडे ठेवून ती एकटक बाहेर बघत होती. आणि दुरून सायकलची ओळखीची घंटी वाजली. ती उत्साहाने पळतच बाहेर गेली आणि बाबांना जाऊन बिलगली. 
"बाबा, मला नवीन कपडे! या वर्षी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे.",
"आणूयात आपण उद्या, उद्या सुटी आहे मला." बाबा.
"खरंच?"
"हो अगदी खरं."
"मला मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस घ्यायचाय. मो-र-पं-खी"
"तुला हवा तसा ड्रेस घेऊ आपण."
दोन वर्षांनी तिला दिवाळीला नवीन ड्रेस मिळणार होता, तो पण आजी, आजोबा, मामा, मावशी यांनी दिलेला नव्हे, तर स्वत: बाबांबरोबर जाउन घेतलेला. उड्या मारतच ती आईने अंथरलेल्या बिछान्यात जाउन झोपली. 

सकाळी ती उठली तेव्हा बाबा घरात नव्हते. दुपारी २-३ च्या सुमारास बाबा घरी आले. ती पुन्हा, "बाबा, ड्रेस!" 
"हो आवर तुझं, आपण जाऊ ड्रेस आणायला."
आईने तिचं आवरून दिलं. बाबा आणि ती ड्रेस आणायला निघाले. जाताजाता जितके मित्रमैत्रिणी दिसतील त्यांना "मी ड्रेस आणायला चाल्लीये" हे सांगायला ती विसरली नाही.
एका आलिशान बंगल्यासमोर सायकल थांबली. बाहेर कोणत्यातरी माणसाबरोबर काहीतरी बोलून बाबांना आणि तिला आत जायला परवानगी मिळाली. 
"शेठ, चार महिने झाले काम करून देऊन, पैसे मूर्ती बसवून झाली की देईन म्हणाला होता तुम्ही."
"आरे हा रे, चार महिना झाला, वाटत पन नाय."
"मुलीला नवीन कपडे घ्यायचे होते, पैसे मिळाले असते तर… "
"ही तुझी छोकरी काय, गोड आहे पोरगी. वासू, एक बर्फी ठेव पोरीच्या हातावर." 
वासू बर्फीचा पुडा घेऊन आल्यावर एक बर्फी तिच्या आणि एक बाबांच्या हातावर ठेवली जाते. दोघेही बर्फी खाऊन घेतात, बराच वेळ शांतता. शेठ कसलीतरी पुस्तक की वही पाहत आहेत. त्यांची तंद्री मोडू नये याचा अंदाज घेत बाप पुन्हा एकदा,
"शेठजी…. "
"आरे तू थांबलाय अजून, मी पाहिलाच नाय. संध्याकाळ होत आली हाय, लक्ष्मीपूजनचे दिवशी कसा लक्ष्मीजीला बाहेर काढू? सकाळी आला असतास तरी दिले असते पैसे तुला."
एक निराश, हताश बाप लक्ष्मी जिथे लोळण घेते ते ठिकाण पाहून बाहेर पडतो. असंच तीन-चार उंबरे झिजवून होतात. प्रत्येक उंबऱ्याबाहेर पडताना बाबांना काहीतरी होतंय आणि तिला ते नकोय इतकंच समजतं तिला!

खूप फिरून आणि बाबांकडे पाहून तिचाही उत्साह एव्हाना उतरणीला लागतो. असंच एका रस्त्याने जाताना बाबांच्या ओळखीचा एक माणूस बाबांना भेटतो. बाबा काकांना "नमस्ते" म्हणायला सांगतात, ती म्हणते. दोघांचं बोलणं होतं आणि काकांबरोबर दोघे चालू लागतात. थोडं चालून जातात आणि पाहते तर काका चक्क कपड्यांच्या दुकानात! बाबा तिला ड्रेसचा रंग परत विचारतात. ती सांगते "मोरपंखी" पण त्यामध्ये कालच्यासारखा ठसका नसतो, तिचा चेहराही उतरलेला. तिला हवा अगदी त्याच रंगाचा ड्रेस मिळतो तिला, पण आता तिच्या मनाने केलेला हट्ट वेगळाच असतो. तो हा की, पुन्हा कधीच आपल्यामुळे आपल्या बाबांचा चेहरा आज दिसला तसा दिसता कामा नये ….. 

बुधवार, १८ मार्च, २०१५

लघुकोन

ज्यांचं आरोग्य चांगलं आहे अशा निरोगी व्यक्तीला अंथरुणावर पडल्यानंतर दहा मिनिटात झोप यायला पाहीजे असं म्हणतात. मला मात्र अंथरुणावर पडलं की स्वत:शी किती बोलू अन किती नको असं होऊन जातं. दिवसभर तर अनेक कामांमध्ये कसा वेळ जातो कळत नाही, मग स्वत:शी बोलायचं तरी कधी? फार ठरवून किंवा गहन असं काही बोललं जात नाही पण खूप जास्त विचार करून झाल्याशिवाय अंतर्मनातून झोपण्याची परवानगीच मिळत नाही. 

उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर कामांची priority काय असावी, अमूक एक task वेळेत पूर्ण होईल ना, बरेच दिवस झाले ब्लॉगवर काही पोस्ट नाही केलं पण लिहू तरी काय. हल्ली तर काही विषयही सुचत नाही. "बेला के फूल" ऐकावं का थोडा वेळ? नको परत छान झोप यायला लागली तर रेडीओ बंद करण्यासाठी जागं राहायचं टेन्शन! उद्या काहीही करून व्यायाम करायचाच आहे. फार दुर्लक्ष होतंय तब्येतीकडे. अंक मोजायला सुरु करावेत म्हणजे पटकन झोप येईल. एक-दोन-तीन-चार--------तीस-एकतीस

फोर-व्हीलरचा क्लास लावायला एक महिन्यानंतरची appointment मिळालीये learning licence साठी. जमेल का मला चालवायला? चालवलीच तर महिन्याचा पेट्रोलचा खर्च साधारण किती येईल? औरंगजेब वाचून पूर्ण करायचंय पण आज डोळे फारच दुखत होते. इतिहासाला खरंच काही अर्थ असतो का? इतिहास जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो म्हणतात. आज माझ्यासमोर ज्या राजकीय, सामाजिक घटना घडतात त्यादेखील इतक्या बदलून माझ्यापर्यंत पोहोचतात मग इतिहासातलं कोण बघायला गेलंय? असो जास्त विचार नाही करायचा. एक-दोन-तीन-चार--------तीस-एकतीस-बत्तीस-------त्र्याहत्तर-चौऱ्याहत्तर-पंच्याहत्तर

गुरुवारी दादा-पोता match आहे अशा प्रकारचा मेसेज आलाय एक. पण बांग्लादेश सुद्धा काही कमी नाही. ही match जिंकून नंतर पाकिस्तानशी match झाली आणि ती हरलो तर??? नको नको एकतर दोन्ही matches जिंका किंवा बांग्लादेश बरोबरच हरा. काय होईल काय माहीती पण कळेलच की येत्या आठवड्यात! एक-दोन-तीन-चार--------चव्वेचाळीस-पंचेचाळीस-सेहेचाळीस-------एकसष्ठ-बासष्ठ 

मनाच्या केंद्रबिंदूपासून एक एक कोन तयार होत जातो विचारांचा, वीस बावीस अंशापासून सुरुवात होऊन ३६० अंशांकडे हळू हळू सरकत विचारांचे असंख्य कोन तयार होतात. आणि शेवटी मग एक दोन अंशांचा लघुकोन तयार होतो तुझ्या विचारांचा. आणि मग वर्तुळ पूर्ण होतं. एक-दोन-तीन-चार--------वीस-बावीस-----एक्क्यावन्न -बारवन्न-त्रेसष्ठपन्न-चोमपन्न-पंचरपन्न-छत्तरपन्न ---------------------------------------------------------

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५

ऑफिस आणि गाणं


"ओSSSSSS  अह्म्ह्म्ह्म्ह्म्ह्म् अह्म्ह्म्ह्म मन क्यों बहकाSSS रीS बहका, मन क्यों बहका री बहका, आधी रात को… 
बेला महका होS, बेला महका री महका,…  टुणुणूक टुणुणूक टुणुणूक टुणुणूक"
मी टेबलवरचा फोन रिसीव केला. पाच एक मिनिट बोलणं झालं, फोन ठेवला. 

Windows media player -> double click "man_kyun_behka"

"ओSSSSSS  अह्म्ह्म्ह्म्ह्म्ह्म् अह्म्ह्म्ह्म मन क्यों बहकाSSS री S बहका, मन क्यों बहका री बहका, आधी रात को… 
बेला महका हो S, बेला महका री महका,…   कुहुंग"
आउटलूकवर मेल आला होता. मेल पाहिला, related गोष्टी शोधून मेलला reply केला. 

परत Windows media player -> double click "man_kyun_behka"

"ओSSSSSS  अह्म्ह्म्ह्म्ह्म्ह्म् अह्म्ह्म्ह्म मन क्यों बहकाSSS रीS बहका, मन क्यों बहका री बहका, आधी रात को… 
बेला महका होS, बेला महका री महका,…  आधी Excuse me madam,"
या पेपरवरचे तुमचे सगळे डीटेल्स बरोबर आहेत का ते चेक करा. केलं चेक. 

परत Windows media player -> double click "man_kyun_behka"

"ओSSSSSS  अह्म्ह्म्ह्म्ह्म्ह्म् अह्म्ह्म्ह्म मन क्यों बहकाSSS रीS बहका, मन क्यों बहका री बहका, आधी रात को… 
बेला महका होS,  SSSSSSSSSSSSSSSSSSSSSS "
पुढे काय गाणं वाजलं ऐकलंच नाही, कोडमध्ये critical काहीतरी सापडलं होतं ते resolve केलं. हुश्श म्हटलं. आणि 

परत Windows media player -> double click "man_kyun_behka"
"ओSSSSSS  अह्म्ह्म्ह्म्ह्म्ह्म् अह्म्ह्म्ह्म मन क्यों बहकाSSS रीS बहका, मन क्यों बहका री बहका, आधी रात को… 
बेला महका होS, बेला महका री महका,… आधी राS त को"

हाच तो दुसऱ्या वाक्यातला आशा भोसलेंनी गायलेला "राS त को" ऐकायचा होता कधीपासूनचा… 

सोमवार, १२ जानेवारी, २०१५

विस्कळीत...

             खूप दिवसांनी लिहिल्यावर तसंही ते विस्कळीतच असणार आहे. त्यापेक्षा म्हटलं विस्कळीतच काहीतरी लिहावं. सकाळी उठायचं, थोडंफार काम करायचं, ऑफिसला जायचं, तिथंही थोडंफार काम करायचं, घरी यायचं, जेवायचं, झोपायचं. हिवाळा सुरु झाल्यापासून रोज ठरवायचं उद्यापासून व्यायाम करू पण एक दिवसही लवकर उठायचं नाही. या वीकेंडला करू पुढच्या वीकेंडला करू म्हणून पडून राहिलेल्या कामांची यादी वाढतच चाललेली. 

                  आतापर्यंत काही मिळवलं नाही, इथून पुढे आयुष्यात काय करायचंय माहिती नाही. काही ठरवलंच तर कष्ट करायची तयारी नाही. मी एक आळशी गोळा किंवा दगड म्हणू फारतर. दगडाला कुठे माहिती असतं त्याला कुठे जायचंय. कोणी शेंदूर फासला तर देवळात जाउन बसतो कोणी लाथाडला तर तिकडे जाउन पडतो. माझं ध्येय काय मला माहिती नाही. माझ्या धर्मातील समजुतीप्रमाणे देवाने कोणालाच पृथ्वीवर उगीचच पाठवलेलं नाही, प्रत्येकाची इथे काहीतरी भूमिका आहे. मग त्याने मला कशाला पाठवलंय तेच मला सापडत नाही.
                  
                मानवच म्हणायचं झालं तर मी एक यंत्रमानव, मन नावाचं रसायन उगीचच त्यात ओतलेला. नको असलेल्या संगतीमध्ये तोंडदेखलं हसायचं, formality म्हणून विचारपूस करायची आणि हव्या असलेल्या जिवलगांना वेळ देता येत नाही, भेटता येत नाही. नको असलेली ओझी फेकून देता येत नाहीत या मनामुळे. आमचा समाज काय म्हणेल हेच का आमचे संस्कार, लाख लफडी या मनामुळे. काय होतं थोडं बेफिकीर व्हायला या मनाला, आयुष्य म्हणजेच एक ओझं बनवून टाकलंय पठ्ठ्याने, झेपेल की नाही याचा जराही विचार न करता. चक्रव्यूह भेदता येतील की नाही याचा विचार न करता त्यामध्ये उतरणारं आणि मग बाहेर येण्यासाठी केविलवाणी धडपड करणारं मन.

                 खूप वाटतं करण्यासारखं बरंच काही आहे. छान वाटतं, एखादं पुस्तक वाचून संपवलं की, टेकडीवरून फेरफटका मारून आलं की, एखादी छोटीशी पिकनिक करून आलं की, सुंदरसा सिनेमा पाहीला की. म्हटलं तर तसं सुरक्षित आयुष्य. पण त्यानंतर पुन्हा मनात एक न भरून येणारी पोकळी, एक रिकामी जागा, माहिती नाही कशासाठी, कोणासाठी…