Saturday, 18 April 2015

हट्ट...

दर वर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्याची चाहूल लागली आणि दिवाळी चार-आठ दिवसांवर आली होती. वातावरणात सगळीकडे आनंद, उत्साह भरून राहिलेला दिसत होता. कोणाच्या घरी रंगरंगोटी, कोणाच्या घरी भांडी घासून पुसून ठेवणे तर कोणाकडे फराळाचे पदार्थ बनवण्याची कामं चालली होती. शाळांना दिवाळीची सुटी लागली होती. फटाके वाजवायला अजून सुरुवात झाली नसली तरी मधूनच पानपट्ट्या, एखादी लवंगी, टिकल्या, नागगोळ्या यांची रेलचेल चालू होती.

तिलाही दिवाळी खूप आवडायची. वय असेल सहा-सात वर्ष. आईने घासलेली भांडी सुकत ठेव, आजीने केलेल्या करंज्या, शंकरपाळ्या गरम गरम खाऊन बघ. कधी आजी प्रेमाने देणार तर कधी म्हणणार, 
"थोड्याच आहेत गं, आताच फार नको खाऊस". 
कोणी फटाके उडवत असेल तर त्यांच्याकडे कोणकोणते फटाके आहेत ते जाउन बघ हे सगळं करायला तिला फार गंमत वाटे. आणि काहीच नाही तर शाळेला सुटी म्हणून इकडून तिकडे बागड. दिवाळीच्या सुटीत बाबा पाठांतर करून घ्यायचे ते तिला फार आवडायचं. 
"या वेळी मला नवीन ड्रेस हवाय हं" हे सुटी लागताच ती बाबांना सांगायला विसरली नव्हती. बाबाही सवईप्रमाणे "घेऊ हा या वेळी नवीन कपडे" असं म्हणाले. 

असंच एक दिवस सकाळी मित्र-मैत्रिणींसोबत खेळताना एक मैत्रीण म्हणाली, 
"या वेळी मी निळ्या रंगाचा फ्रॉक घेतलाय सोनेरी किनार असलेला, आईला रोज घालायला मागते पण आईने सांगितलंय की उद्या लक्ष्मीपूजन आहे, तो ड्रेस उद्या घालायचा. मी मस्त निळा फ्रॉक घालून फटाके उडवणार उद्या!"
असंच मग प्रत्येक जण आपापल्या कपडे आणि फटाक्यांचं कौतुक सांगू लागलं आणि हिची बेचैनी वाढत चालली. घरी आल्यावर ती आईला म्हणाली "आई, मला पण उद्या नवीन ड्रेस हवाय. या वर्षी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे."
"बाबांना सांग हो आल्यावर." - आई 

ती खिडकीला डोळे लावून बाबांची वाट पाहत बसली. आतून तिच्या आवडत्या चकल्यांचा खमंग वास येउनही तिची नजर खिडकीपासून ढळली नाही. आईने कसंबसं जेवायला नेलं पण दर दोन घासांनंतर बाहेर सायकलचा आवाज आला की तिची मान दरवाज्याच्या बाजूला कलायची बाबा आहेत का ते पाहायला. दिवाळीच्या वेळी बाबांना घरी यायला जास्तच उशीर व्हायचा हे ठाऊक असूनही ती परत खिडकीपाशी जाउन बसली. चिमुकल्या डोळ्यांमध्ये झोप दाटून आली होती पण तरीही निग्रहाने डोळे उघडे ठेवून ती एकटक बाहेर बघत होती. आणि दुरून सायकलची ओळखीची घंटी वाजली. ती उत्साहाने पळतच बाहेर गेली आणि बाबांना जाऊन बिलगली. 
"बाबा, मला नवीन कपडे! या वर्षी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे.",
"आणूयात आपण उद्या, उद्या सुटी आहे मला." बाबा.
"खरंच?"
"हो अगदी खरं."
"मला मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस घ्यायचाय. मो-र-पं-खी"
"तुला हवा तसा ड्रेस घेऊ आपण."
दोन वर्षांनी तिला दिवाळीला नवीन ड्रेस मिळणार होता, तो पण आजी, आजोबा, मामा, मावशी यांनी दिलेला नव्हे, तर स्वत: बाबांबरोबर जाउन घेतलेला. उड्या मारतच ती आईने अंथरलेल्या बिछान्यात जाउन झोपली. 

सकाळी ती उठली तेव्हा बाबा घरात नव्हते. दुपारी २-३ च्या सुमारास बाबा घरी आले. ती पुन्हा, "बाबा, ड्रेस!" 
"हो आवर तुझं, आपण जाऊ ड्रेस आणायला."
आईने तिचं आवरून दिलं. बाबा आणि ती ड्रेस आणायला निघाले. जाताजाता जितके मित्रमैत्रिणी दिसतील त्यांना "मी ड्रेस आणायला चाल्लीये" हे सांगायला ती विसरली नाही.
एका आलिशान बंगल्यासमोर सायकल थांबली. बाहेर कोणत्यातरी माणसाबरोबर काहीतरी बोलून बाबांना आणि तिला आत जायला परवानगी मिळाली. 
"शेठ, चार महिने झाले काम करून देऊन, पैसे मूर्ती बसवून झाली की देईन म्हणाला होता तुम्ही."
"आरे हा रे, चार महिना झाला, वाटत पन नाय."
"मुलीला नवीन कपडे घ्यायचे होते, पैसे मिळाले असते तर… "
"ही तुझी छोकरी काय, गोड आहे पोरगी. वासू, एक बर्फी ठेव पोरीच्या हातावर." 
वासू बर्फीचा पुडा घेऊन आल्यावर एक बर्फी तिच्या आणि एक बाबांच्या हातावर ठेवली जाते. दोघेही बर्फी खाऊन घेतात, बराच वेळ शांतता. शेठ कसलीतरी पुस्तक की वही पाहत आहेत. त्यांची तंद्री मोडू नये याचा अंदाज घेत बाप पुन्हा एकदा,
"शेठजी…. "
"आरे तू थांबलाय अजून, मी पाहिलाच नाय. संध्याकाळ होत आली हाय, लक्ष्मीपूजनचे दिवशी कसा लक्ष्मीजीला बाहेर काढू? सकाळी आला असतास तरी दिले असते पैसे तुला."
एक निराश, हताश बाप लक्ष्मी जिथे लोळण घेते ते ठिकाण पाहून बाहेर पडतो. असंच तीन-चार उंबरे झिजवून होतात. प्रत्येक उंबऱ्याबाहेर पडताना बाबांना काहीतरी होतंय आणि तिला ते नकोय इतकंच समजतं तिला!

खूप फिरून आणि बाबांकडे पाहून तिचाही उत्साह एव्हाना उतरणीला लागतो. असंच एका रस्त्याने जाताना बाबांच्या ओळखीचा एक माणूस बाबांना भेटतो. बाबा काकांना "नमस्ते" म्हणायला सांगतात, ती म्हणते. दोघांचं बोलणं होतं आणि काकांबरोबर दोघे चालू लागतात. थोडं चालून जातात आणि पाहते तर काका चक्क कपड्यांच्या दुकानात! बाबा तिला ड्रेसचा रंग परत विचारतात. ती सांगते "मोरपंखी" पण त्यामध्ये कालच्यासारखा ठसका नसतो, तिचा चेहराही उतरलेला. तिला हवा अगदी त्याच रंगाचा ड्रेस मिळतो तिला, पण आता तिच्या मनाने केलेला हट्ट वेगळाच असतो. तो हा की, पुन्हा कधीच आपल्यामुळे आपल्या बाबांचा चेहरा आज दिसला तसा दिसता कामा नये ….. 

10 comments:

 1. लहान मुलीचं भावविश्व, हट्ट, निरागसता, समजंसपणा सारं खूप छान रेखाटलं आहे. खूप आवडली गोष्ट.

  ReplyDelete
 2. खूप धन्यवाद मोहनाताई, तुमच्यासह सर्वच उत्तम कथालेखन असलेल्या ब्लॉग्समधून शिकत आहे :)

  ReplyDelete
 3. अप्रतिम. आपण आपला ब्लॉग रिमझिम पाऊसला जोडावा हि विनंती.

  ReplyDelete
 4. खूप धन्यवाद विजयजी :)

  ReplyDelete
 5. मोहनाशी सहमत. या कथेला शब्दांचा छान साज चढवला आहेस.

  ReplyDelete
 6. अनेक आभार अपर्णाताई :)

  ReplyDelete
 7. खूप आवडली गोष्ट!

  ReplyDelete
 8. खूप खूप धन्यवाद साविताताई :-)

  ReplyDelete
 9. मनाला चटका लावणारं रेखाटन.

  ReplyDelete
 10. प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद matichi mulagi,
  ब्लॉगवर तुमचं हार्दीक स्वागत :)

  ReplyDelete