सध्या पितृपक्ष चालू आहे, भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष. कोणाचा यावर विश्वास असतो तर कोणाचा नाही. ज्या तिथीला आपल्या पूर्वजांनी इहलोक सोडला, त्या तिथीला त्यांच्यासाठी श्राद्ध विधी करतात. तसं तर या नैवेद्यामध्ये भरपूर पदार्थ केले जातात. आणि ते कसेही केले तरी चविष्टच होतात. पण लोकांमध्ये या नैवेद्याबाबत बरीच मतमतांतरे आहेत.
कोणी म्हणते की हे जेवण दुःखाचे असते त्यामुळे आपण ते इतर वेळी ताव मारून, 'वा काय छान झालंय' असं म्हणून खातो तसं खाऊ नये, तर कोणी म्हणते हे जेवण पितरे येऊन जेवून जातात आणि समाधानी होऊन आपल्याला आशीर्वाद देतात तर आपणही जेवताना समाधानी, आनंदी असावे.
जसे जेवणाबद्दल तसेच इतर काही गोष्टींबद्दलही असेच उलटसुलट समज आहेत. कोणी म्हणते या काळात शुभ कार्य करू नये. सोने, घर, वाहन इत्यादी खरेदी करू नये, थोडक्यात आनंददायी काहीही करू नये. नवीन काही सुरु करू नये. तेच कोणी म्हणते की या काळात नवीन सुरुवात किंवा खरेदी केल्याने पूर्वजांनाही आनंदच वाटेल आणि ते आशीर्वादच देतील, तर देवाबरोबरच पूर्वजांचेही आपल्याला आशीर्वाद मिळतील.
तसं तर हे नंतरचे सगळे विधी आपण करूच, पण जिवंतपणी कोणाचीही काळजी घेणे जास्त महत्वाचं आहे ना. नाहीतर असंही पाहिलं आहे की घरातील एखादी व्यक्ती जराजर्जर होऊन मरण पावल्यानंतर घरातल्यांकडे त्यांचा सध्याचा फोटो सुद्धा नसतो, तो कोणाकडे मिळतो तर त्यांची शुश्रूषा करण्यासाठी ठेवलेल्या व्यक्तीकडे! आई - बापांना मरण येते वृद्धाश्रमामध्ये! ते काय आपल्या वंशजांना आशीर्वाद देणार?
जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतातच. तसंच हे आपलेच पूर्वज, तर त्यांचे स्वभाव आपल्यालाच माहिती असणार ना. "आमच्या वेळी असं नव्हतं" ही एक प्रसिद्ध उक्ती आहे. काही लोक असे असतात की माझं बालपण असं गेलं, आम्ही असे राहिलो तर तुम्हीही तसेच रहा. तर कोणाचं असं असतं की आमच्या वेळी असं नव्हतं पण तुम्हाला मिळतंय ना मग तुम्ही त्याचा आनंद घ्या. आपल्या १ -२ पिढ्या आधीच्या लोकांमध्ये जिवंतपणीच मोठ्यांचा इतका धाक असायचा की पितरांचा धाक नक्कीच असणार! पण आपण गेल्यावर आपली पित्रे घातली जातील (?) तेव्हा नक्कीच आपले वंशज अशा धाकामध्ये नसणार.
आपले पूर्वज यापैकी कोणत्याही प्रकारातले असले तरी आपण आदरपूर्वक त्यांचं स्मरण करणं आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं त्यांना नक्कीच आवडत असेल. समजा हे सगळं खोटंच असेल, पण त्या निमित्ताने होणारा दानधर्म कोणाला तरी नक्कीच उपकारक ठरत असेल. पितृपक्षात तुळस, आंबा, पिंपळ इत्यादी काही झाडे लावावीत म्हणतात, ते देखील आपल्याला उपकारकच नाही का! नैवेद्य वगैरे काहीच जमत नसेल तर दानधर्म करणं आणि ते होते म्हणून आपण आहोत ही कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्या आठवणींमध्ये थोडा काळ रमणं आपल्याच मनाला मोठं समाधान देऊन जाणारं आहे ना.
Khup sundar vichar
उत्तर द्याहटवाधन्यवाद हसरी
हटवा