गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

असंच...


                मुसळधार पाऊस कोसळतोय बाहेर. माझं गाणी ऐकता ऐकता काम चालू होतं. पण पाऊस ऐकायचा होता म्हणून गाणी बंद केली. पावसाचा मस्त सरसर सरसर लहान मोठा होत जाणारा आवाज.... मधेच गडगडणारे ढग आणि कडाडणाऱ्या विजा... अंधारलेला आसमंत आणि परिसर... वाटलं आता आपली पाऊसगाणी ऐकावीत.... पण कानाला इअरफोन लावला तर पावसाचा आवाज गुडूप आणि नाही लावावा तर एकेका अशा गाण्याची आठवण येतेय की ते अशा पावसात ऐकायलाच हवं... पण काय करणार हापिसात आहे ना मी.... कान पावसासाठी ठेवून मोठ्याने गाणी लावू शकत नाहीये :(  त्यातल्या त्यात इअरफोन एकाच कानाला लावून दुसऱ्या कानाने पाऊस ऐकते आहे. बरं झालं देवा दोन कान दिलेस ते.....

             खिडकी उघडताच एसीच्या हवेपेक्षा खूपच आल्हाददायक गार हवेचा झोत आत आला. बाहेर नजर टाकली तर वाऱ्याच्या शिळेला साद देत झाडं चिंब भिजत त्यावर डोलत होती, पारव्यांचे थवे मस्त भिजून इथल्या इमारतीच्या आश्रयाला आलेले; ते ही जोडीजोडीनेच, आधीच पावसानेच साचलेल्या पाण्यात थेंबांचं नक्षीकाम चाललेलं... एका थेंबाने पडून स्वत:भोवती रिंगण तयार केलं लगेच शेजारी दुसरा थेंब आला, त्याने स्वत:चं वेगळं रिंगण तयार केलं पण दोन रिंगणं पाहता पाहता कधी एकमेकांत मिसळून गेली समजलंही नाही... रस्ते नद्या झालेले, चहाच्या नद्या.... चहा...? हो चहा तर हवाच अशा मस्त पावसात... लगेच चहाही आला... थोड्या तडजोडीने का होईना सगळंच तर झालं मनासारखं... कमी राहिली ती एकच... सोबतीला फक्त तू हवा होतास...
            

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१२

गोडबोले बाई


            "पाय अस्वच्छ होऊ नयेत म्हणून जितका जपतोस तसंच मन अस्वच्छ होऊ नये म्हणूनही जप हो बाळ, मनाला नेहमी निर्मळ ठेव!" हे चौथीत असताना निबंध लिहिताना श्यामच्या आईच्या तोंडी घातलेलं वाक्य. बाईंनी ते वाचलं आणि ते वाचून त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून गेले. त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं ते फक्त कौतुक. बाई म्हणाल्या "अगं एवढीशी चौथीतली मुलगी तू, तुला हे 'जप हो बाळ' सुचलं तरी कसं?" मला खरंच माहिती नाही कसं सुचलं तेव्हा. बाई जसं बोलायच्या जशा वागायच्या त्याचीच तर कॉपी करायचो आम्ही. आमच्या सर्वांच्या लाडक्या गोडबोले बाई. 

            घर बदलल्याने चौथीत लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या "शारदा विद्या मंदिर" मध्ये प्रवेश घेतला. बाबांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाव दिलं आणि गोडबोले बाईंच्या हाताखाली शिकण्याचं भाग्य लाभलं. सकाळी ७ ते १२ शाळा असायची. नंतर १ पर्यंत शिष्यवृत्तीचा तास असायचा आणि हा तास झाला की बाई आम्हा निवडक सहा जणांना त्यांच्या घरी घेऊन जायच्या. आपटे रस्ता ते सदाशिव पेठ पुढे बाई आणि मागे आम्ही सहा जण. जाताना अधूनमधून ऊन लागायचं तर मधूनच झाडांची सावलीही लाभायची. उन्हातून चालायला लागलो की आम्ही सगळे ढेपाळून जायचो. मग बाई म्हणायच्या उन्हातून नेहमी भरभर चालायचं म्हणजे ते जाणवत नाही, आणि सावली आली की सावकाश चालायचं. तेव्हा या वाक्याचा अर्थ फक्त चालण्यापुरताच लक्षात आला होता...

            बाईंनी एकदा कुठल्याशा वक्तृत्व स्पर्धेत माझं नाव दिलं होतं. लोकमान्य टिळकांवर भाषण लिहून दिलं होतं आणि  ते पाठ करायला सांगितलं होतं. ते पाठ झाल्यावर मी आईला ते म्हणून दाखवलं. बरं दिवसातून एकदा किंवा दोनदा म्हणून दाखवावं; तर मी सारखंच दर दहा मिनिटांनी ऐकण्यासाठी आईच्या मागे लागे. आई एकदा वैतागली आणि म्हणाली, "झालंय आता छान पाठ, आता शाळेत एकदा म्हणतेस ते पुरे आहे". तर मी आईला म्हणाले, "अगं असं कसं बाईंच्या भरवशाच्या म्हशीला टोणगा होईल ना". आईने हे ऐकलं आणि हसतच सुटली. बाई एकदा म्हणी शिकवत होत्या. म्हण होती "भरवशाच्या म्हशीला टोणगा". बाईंनी उदाहरण दिलं , "समजा मला तुम्हाला कुठल्या स्पर्धेत पाठवायचं असेल, आणि मी ठरवलं की चला कोणी नाही बक्षीस मिळवलं तरी प्राची मिळवेलच बरं का... आणि ऐन स्पर्धेच्या दिवशी प्राची पुढे स्टेजवर गेली आणि तिला अगदी पहिलंही वाक्य आठवलं नाही तर झाला ना माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा..." तेव्हा 'भरवशाच्या', 'टोणगा' म्हणजे नक्की काय हे ही माहिती नव्हतं पण म्हण आणि अर्थ अगदी लक्षात राहिले.

            पाढे, वर्ग, अवघड गणितं हे सगळं बाईंच्या गणितातल्या युक्त्यांमुळे अगदीच सोपं होऊन गेलं. आणि ते आजतागायत उपयोगी पडतंय. "लॉजिक" म्हणजे काय, किंवा लॉजिकली विचार कसा करावा हे बाईंनी शिकवलं. कॉलेजमध्ये असताना कँपसला जेव्हा इतरांना "apti" चा अभ्यास किंवा तयारी करताना बघायचे तेव्हा फार आश्चर्य वाटायचं. असं वाटायचं की हे एकतर चौथीला scholarship ला बसले नसावेत किंवा यांना शिकवायला गोडबोले बाई तरी नसाव्यात.

            आमच्या सहा जणांपैकी मी तशी अभ्यासात साधारणच होते. एकदा बाईंच्या घरी मुख्याध्यापिका आल्या होत्या, त्यांनी बाईंना विचारलं हीच सहा मुलं का? बाईंनी प्रत्येकाबद्दल एक गुणविशेष सांगितला, त्यात दोघांना हे खूप हुशार आहेत असं सांगितलं, एकाचं गणित खूप चांगलं आहे असं सांगितलं, आणि माझ्याबद्दल सांगितलं होतं की ही मुलगी खूप जिद्दीची आहे. त्या एका वाक्यामुळे आजही काही चढउतार आले की मला प्रेरणा मिळते. त्या वर्षात आमच्या सहाजणांपैकी फक्त धनंजयला शिष्यवृत्ती मिळाली. मला नेहमी गणित आणि बुद्धिमत्तेपेक्षा मराठी अवघड जायचं आणि मराठीमुळेच शिष्यवृत्ती हुकली. तेव्हा फार मनात आलं होतं बाईंना विचारावं की तुमच्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला ना म्हणून, पण नाही विचारलं.

            शिष्यवृत्ती नाही मिळाली पण खडतर परिस्थितीत आजपर्यंत जे काही मिळालं ते फक्त गोडबोले बाईंमुळे. बाईंच्या बद्दल जितकं लिहीन तितकं कमीच आहे, आजही कित्येक छोट्यामोठ्या प्रसंगात त्यांची आठवण येते, की गोडबोले बाईंनी असं सांगितलं होतं. बाबा सांगत होते बाईंच्या वाड्याच्या जागी आता मोठी इमारत झालीये. वाईट वाटलं तेव्हा, आम्ही जिथे अभ्यासाला बसायचो ती खोली, तहान लागली की आत पाणी आणायला जायला आम्ही घाबरायचो ते स्वयंपाक घर, जिथे आम्ही रोज नंबर लावून आतून तांब्याभर पाणी आणायचो. ज्या दिवशी ज्याचा नंबर असेल तो एकदम शूर. बाईंचे "सर" गुरुवारी घरी असायचे, त्यांच्या दाढीमुळे आणि ते आमच्याशी कधी बोलत नसल्याने आम्ही त्यांनाही खूप घाबरायचो. बाईंनी प्रेमाने खाऊ घातलेले स्वत: बनवलेले पदार्थ, त्यातही कवठाच्या काचवड्या बाई एकदम भारी बनवत. सगळं आठवलं तेव्हा. शिक्षक म्हणण्यापेक्षा त्यांना गुरु म्हणणेच जास्त योग्य ठरेल. बाईंना भेटण्याची फार इच्छा होते आहे. पण हे सगळं मी त्यांना समोर नाही सांगू शकणार. बाईंना शतश: प्रणाम! शिक्षक असावेत तर असेच.....

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१२

जादुगार...

"इनमिनाती बबलाबू 
कर दे रुमाल को पंछी तू..."

"हा हा हा... हे पहा कबुतर...."

आणि असं म्हणून त्याने ते कबुतर आकाशात सोडून दिलं. 

एकामागून एक तोंडात बोटं घालायला लावणाऱ्या जादू समोर साकार होत होत्या. आणि समोर बसलेली लहान-मोठी मुलं तर सोडाच, पण मोठी माणसंही अचंबित झाल्यासारखी पाहत होती. एकेका जादुनंतर टाळ्यांचा कडकडाट आणि भाबड्या डोळ्यांमधून ओसंडणारा आश्चर्यमिश्रीत आनंद.

कार्यक्रम संपला. मुलांसाठी तर सगळं वातावरण भारल्यासारखंच झालं होतं. व्यवस्थापकांनी जाहीर केलं की आता कार्यक्रम संपला, आता जादुगार काका थोड्या वेळाने इथून निघतील. तरीही कोणाला त्यांना भेटायचं असेल तर ऑफिसमध्ये या. 

"खरंच तू आमच्यासाठी आलास फार बरं वाटलं" व्यवस्थापक म्हणाले, यावर जादूगाराचं उत्तर.. "अरे मित्रासाठी आणि मुलांसाठी इतकंही नाही करणार मी?" असं बोलत बोलत ते ऑफिसकडे वळाले.

-------------------------------------------------------------------------------

"दीदी, जादुगार काका काहीही करू शकतात का गं?" बबलीने विचारलं.

"हो गं बबली, आपण आता पाहिलं ना, त्यांनी कायकाय जादू केल्या. मला तर वाटतंय की ते काहीही करू शकतात. अगदी होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं  होतं...." बबलीच्या त्या दीदीने आपल्याला फार समजल्यासारखं तिला सांगितलं.

"होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं  होतं?" बबलीने पुन्हा विचारलं.

"नाहीतर काय. हवं तर ऑफिसमध्ये भेटून विचार त्यांना..."

"हो, मी मुळी जाणारच आहे त्यांना भेटायला. मला फार आवडले जादुगार काका"

आणि बबली दीदीचा हात सोडून ऑफिसकडे उड्या मारत पळाली.

ऑफिसमध्ये जादुगार काकांची निघण्याची लगबग चालू होती. बबली जरा घाबरतच त्यांच्याकडे गेली.

थोडा वेळ त्यांच्याकडे पहातच राहीली. जादुगार काकांचं तिच्याकडे लक्ष गेलं. पिशवी आवरतच ते बबलीला म्हणाले
"बोल बाळ..."

"जादुगार काका जादुगार काका, तुम्ही काहीही जादू करू शकता?" बबलीने विचारले.

आता काय उत्तर द्यावं ते त्यांना कळेना. पण लहान मुलाची निरागसता राखण्यासाठी ते म्हणाले
"हो बाळ, तुला अजून दुसरी जादू पहायची असेल तर मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा करून दाखवीन हं..."

"काका, पुढच्या वेळेस नको, मला आत्ता करून दाखवाल?" बबलीने धिटाईनं विचारलं.

"आत्ता? बरं तुला काय जादू पहायची ते सांग पाहू..."

"मला इथे येऊन थोडेच दिवस झाले, सगळे म्हणतात माझ्या आई-बाबांना अपघात झाला म्हणून ते देवाघरी गेले, त्यांना देवाच्या घरून परत आमच्या घरी आणाल?......"

गुरुवार, १९ जुलै, २०१२

महागाई वाढते आहे? (कविता)

छायाचित्र आंतरजालावरून
महागलेय जेवण,
महागलेय जीवन,
पण स्वस्तही इथे बरंच काही आहे
कोण म्हणतं महागाई वाढते आहे?

                                               स्वस्त इथे खून,
                                               स्वस्त लोकांचे जीव
                                               आणि स्त्रीभ्रूणही इथे कचऱ्यात आहेत,
                                               कोण म्हणतं महागाई वाढते आहे?

स्वस्त आता अत्याचार,
स्वस्त झालीये लुटालूट,
बलात्कारालाही बघे इथे आहेत
कोण म्हणतं महागाई वाढते आहे?

                                               स्वस्त आहे भ्रष्टाचार,
                                               पुढारी तो लाचार,
                                               घोटाळे तर न मोजणेच इष्ट आहे
                                               कोण म्हणतं महागाई वाढते आहे?

                              लाखोंची डोनेशनं, करोडोंची लाच
                              दारू नि बायांचा नंगानाच
                              नैतिकता मात्र महागते आहे....
                              तिथेच तर महागाई वाढते आहे....



शुक्रवार, १३ जुलै, २०१२

अपूर्ण...

               आज सगळी महत्त्वाची कामं बाजूला ठेवून पहिलं ते गाणं पुन्हा डाउनलोड केलं. आणि आता अगदी स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटतंय. झालं असं की एक गाणं अचानक ऐकण्यात आलं आणि आवडलं. नेहमीच्या सवयीप्रमाणे एखादं गाणं नवीननवीन ऐकण्यात आलं असेल तर निदान आठवडाभर तरी माझ्याकडून त्या गाण्याचा फडशाच असतो.
                 
                तर ते गाणं मी दोन-तीन दिवसांपासून दिवसातून वेळ मिळेल तेव्हा अधूनमधून ऐकत होते पण यु-ट्यूब वर. मग वाटलं हे आपल्याकडे असायला हवं. म्हणून एमपी3 कन्वर्टर वरून ते मिळवलं. आता मला हवं तेव्हा ते मी ऐकू शकत होते. पण गम्मत अशी झाली होती की गाणं कन्वर्ट होताना अगदी शेवटच्या कडव्यातलं  शेवटचं वाक्य पूर्ण आलंच नव्हतं. अगदी शेवटचाच शब्द राहिला होता.

              एक-दोन वेळा मी ते तसंच ऐकलं. मुळात  गाणं लावताना माझ्या लक्षातच राहायचं नाही की हे अर्धवट आहे. पण गाणं संपताना तो शेवटचा शब्द ऐकू यायचा नाही, आणि जो काही मूड तयार झालेला असायचा तो सगळा एकदम फस्स होऊन जायचा. अगदीच रसभंग! म्हणजे गाणं ऐकल्याचा आनंद मिळण्याऐवजी मी ते का ऐकलं याचं दु:ख! आज परत शेवटची ओळ अर्धवट राहिली आणि पहिलं मी ते गाणं पुन्हा डाउनलोड केलं.

               एक गाणं अर्धवट; नाही अर्धवटही नाही, फक्त ते पूर्णत्वाला नाही गेलं तर इतकी घालमेल, मग देव न करो पण जर एखादं नातं अर्धवट राहिलं तर....

छायाचित्र आंतरजालावरून 


सोमवार, ९ जुलै, २०१२

जातीभेद...

              काल सत्यमेव जयते पूर्ण पाहिला नाही पण जातीभेदावर आधारित होता. त्यातला धर्माधिकारींचा भाग तेवढा पूर्ण  पाहिला. नंतर त्यावर विचार केल्यावर वाटलं, भारतातून जातीभेद नष्ट होणे खरंच शक्य आहे का? माझं स्वत:चं मला मिळालेलं उत्तर आहे नाही, भारतातून जातीभेद नष्ट होणे शक्य नाही. फारतर हल्ली आपण एखाद्याला जातीवाचक शिवीगाळ करत नाही, मित्रांमध्ये असताना किंवा मैत्री करताना "जात" कधी आड येत नाही. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर टोकाचे जातीभेद सध्या फारसे कुठे दिसत नाहीत. काही अपवाद असतात, पण निदान पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी शाळेत, कार्यालयात सर्व जाती-धर्मांचे लोक मैत्रीपूर्वक एकत्र दिसतात. पण याचा अर्थ असा होतो का की आपल्या देशातून जातीभेद नष्ट झाले आहेत?
               
              जात नष्ट होईल अशी परिस्थितीच आपल्या देशात नाही तर ती नष्ट कशी होईल? मुलाला शाळेत प्रवेश घेताना फॉर्म भरायचा तर त्यावर जात-पोटजात असते. ती पुढे दर वर्षी प्रगती-पुस्तकावरही मिरवली जाते. वर्गात दर वर्षी "ओपन" कोण, "ओबीसी" कोण, "एसटी", "एनटी" कोण? हे जाहीररीत्या विचारले जाते. कोणतेही सरकारी कागदपत्र असो, त्यावर "जात" अनिवार्य असते. जोपर्यंत सरकारकडून रिझर्वेशन पद्धत बंद होणार नाही, आणि सरकारी वा कोणत्याही "फॉर्म"वर जात विचारणे बंद होणार नाही, तोपर्यंत या देशातून जात नष्ट होणार नाही. सर्वांना जर समान दर्जा हवा तर रिझर्वेशन सुद्धा आर्थिक निकषांवर हवे. अन्यथा  ज्यांची ना टक्केवारी चांगली, ना आर्थिक परिस्थिती खराब अशा कोणाला योग्यता नसताना प्रवेश मिळतो, पण "ओपन" या एका कारणामुळे उच्च जातीयाला तो मिळत नाही, तेव्हा तेढ निर्माण होणे सहाजिक आहे.

                कौटुंबिक स्तरावर पाहायचे झाले तर जात म्हणजे लग्न जमवताना सर्वात महत्त्वाचा निकष असतो. कितीही उच्च विचार असले, इतरांबद्दल कळवळा असला तरी अपत्याचे लग्न जमवताना मात्र येथे जातीचे पाहिजे. कोणी स्वत:चा जोडीदार स्वत: निवडला असेल तरी घरून पहिला प्रश्न येतो "आपल्यातली"/"आपल्यातला" आहे का? याचे मुख्य कारण असे मानले की प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या असतात, तरी प्रश्न असा उरतो की आपल्याकडे मुळात प्रत्येकासाठी वेगळ्या चालीरीती का आहेत? आणि दुसरा प्रश्न, हल्ली अशा काही चालीरीती उरल्या आहेत का? आणि समजा एखाद्याला दुसऱ्याच्या चालीरीती माहिती नसतील, तर त्या शिकायला असा कितीसा वेळ लागणार आहे?

                  अशा प्रकारे जातीव्यवस्था ना सरकारी पातळीवर संपुष्टात येऊ शकते ना वैयक्तिक पातळीवर. वेद सांगतात वर्ण कर्माने ठरतो, जन्माने नव्हे. पण हे लक्षात न घेता जात जन्मानेच ठरवली जाते, कर्माने नव्हे. आपल्या देशाची आणि धर्माची शोकांतिका म्हणजे आपले ग्रंथ काय सांगतात यापेक्षा प्रचलित काय आहे तेच ग्राह्य धरले जाते, आणि कर्माने जात मानण्यापेक्षा जन्माने मानणे हाही अगदी हाडामासात मुरलेला प्रचलित प्रकार आहे, जो सध्या तरी नष्ट होणे संभव दिसत नाही.

बुधवार, २५ एप्रिल, २०१२

संस्कार?

           
            शेजारच्या काकू रविवारी आईशी गप्पा मारायला आल्या होत्या. त्यांना गप्पांना काही विषयच लागत नाही. आणि सगळेच विषय संपले तर अमक्याच्या घरी असं असं झालं, याचं त्याच्याशी भांडण झालं, या एखाद्याच्या घरातल्या अगदी वैयक्तिक गोष्टीही त्यांना माहिती असतात. असंच बोलता बोलता त्यांनी सांगितलं की "त्या कल्पनाची मुलगी आहे ना, तिने अमक्या अमक्या जातीच्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं. तसेही तिच्यावर काही संस्कार आहेत असं कधी वाटतच नव्हतं."
तेव्हा मनात आलं, संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

            पूर्वी म्हणत मुलीच्या जातीने शांत असावं, चार लोकात मोठ्याने हसू नये, अशी मुलगी असली की तिच्यावर चांगले संस्कार आहेत, पण एखादी अशी असली आणि तिचा स्वभावच चांगला नसेल तर फक्त वरवरच्या वागण्याला संस्कार म्हणायचं का? पळून जाऊन किंवा घरच्यांविरुद्ध लग्न केलं तर संस्कार नसतात का? ती जर आयुष्यभर सुखी राहणार असेल तर काय बिघडलंय?

            एखादा मुलगा व्यसनाधीन असेल पण कोणाच्याही मदतीला कधीही धाऊन जाणार असेल तर त्याच्यावर संस्कार आहेत की नाहीत? संस्कार म्हणजे फक्त बाह्यवर्तन, प्रत्येक गोष्टीचं अवडंबर की माणुसकी म्हणजे संस्कार? की माणुसकी हा संस्कारातला फक्त एक प्रकार?

            खोटं बोलू नये हा संस्कार, पण प्रत्येकाला आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खोटं बोलावंच लागतं, मग काय उपयोग या संस्काराचा? मोठ्यांचा आदर करावा, पण ती व्यक्ती आदर करण्यालायक नसेलच तर? अंगी नम्रपणा असावा, पण नम्र लोकांना भित्रे समजतात आजकाल! अरेला कारे बोलला नाही तर कसा तग धरेल? मग आधी उद्धटपणा करायचा आणि जर आयुष्यात काही चांगलं नाव कमावलं, प्रसिद्धी मिळाली तर नंतर नम्र व्हायचं? अजून कितीतरी गोष्टी ज्या आपल्यावर लहानपणापासून बिंबवल्या जातात, पण प्रत्यक्ष जगात तसं वागून चालतच नाही. चाणक्याने सांगितलंय, "सरळ झाडे आधी कापली जातात".

            संस्कार आपल्याला "माणूस" बनवतात. आणि आपल्यातला माणूस आपल्याला माहिती असेल तर इतरांनी आपल्या संस्कारांबद्दल काहीही बोलो, काय फरक पडतोय!


बुधवार, ११ एप्रिल, २०१२

खूप बोर होतं तेव्हा...

हल्ली उन्हाळ्यात दुपारी जेवल्यानंतर जाम म्हणजे जाम झोप येते. मग ऑफिसमध्ये असो वा घरी. असंच त्या दिवशी पण खूप झोप येत होती. प्रचंड फ्रीक्वेन्सीने जांभया येत होत्या. पण आम्हाला वाटलं आम्हाला बोरच होतंय. १०-१२ जांभया दोघींच्याही झाल्यावर मग शेवटी संवाद सुरु केला.

ती : मला खूप झोप येतेय.  |-)

मी: मला पण खूप झोप येतेय, कारण आधी मीच जांभई दिली ना...  :-P

ती: झोपेचा आणि जांभईचा  काही संबंध नसतो, जांभई ऑक्सिजन कमी पडल्याने येते. :s 

मी: मग तुला कशावरून झोप आलीये, तुलाही  ऑक्सिजन कमी पडत असेल.  :-\

ती: नाही मला झोप आलीये, तुला ऑक्सिजन कमी पडतोय. :-) 

मी: हम्म, बॉसला सांगायला पाहिजे, तुमच्या हापिसात ऑक्सिजन कमी पडतोय. इथे वर ऑक्सिजन मास्क्स ठेवा, जो ऑक्सिजन कमी पडला की खाली येईल, मग जांभया नाही येणार. :D

ती: गुड आयडिया, किंवा मग इथे छोट्या छोट्या रोपांच्या कुंड्या ठेवायला पाहिजेत टेबलच्या आजूबाजूला. म्हणजे पुरेसा ऑक्सिजन मिळेल. :-o

अजून एक जण तेवढ्यात आमचा "संवाद" ऐकायला आली होती, ती हसायलाच लागली अचानक. आणि म्हणे कुंडी म्हणजे काय माहितीये न... आम्ही : हो हो माहितीये, तुला तर तेच आठवतं कधीपण... ती लगेच गेली (आमच्यासारखी रिकामटेकडी नव्हती बहुतेक)

मी: हा पण कुंडीची आयडिया भारी आहे. मग आपण बाबा रामदेव सांगतात तसा प्राणायाम करून रोपाच्या जवळ जाऊन फक्त ऑक्सिजन घेऊ आणि कार्बन डाय  ऑक्साइड एका पिशवीत भरून बॉसच्या केबिनमध्ये सोडून येऊ...  :-#

दोघी: खी खी खी   :D  :D  :D

चला चहा आला... आता भरपूर ऑक्सिजन मिळेल....  8o|   <:o)

------------------------------------------

(कोण म्हणतंय तुम्हाला बोर झालं होतं तर आम्हाला कशाला बोर केलंस ते? मला बोर होत असताना सर्वांना ते वाटण्याचा मला पूर्ण हक्क आहे :-P  )

बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२

फसवणूक...


            माझ्या आजीला मागे अर्धांगवायूचा झटका आला होता तेव्हाची गोष्ट. साधारण २०००-२००१ मधली. डॉक्टर-दवाखाना तर चालूच होता, पण 'इतर'ही उपाय सांगणारे बरेच जण होते. त्या सर्वांना फक्त हो-हो म्हणायचं इतकंच आमचं काम होतं. इतर काहीही न करण्याची इतकी खबरदारी घेऊन सुद्धा एक घटना घडली ती पुढीलप्रमाणे.

            साधारण दुपारच्या वेळी एक इसम घरी आला. तो म्हणाला रविवार पेठेत तुमचे नातेवाईक राहतात ना(नावही बरोबर सांगितलं), त्यांनी मला पाठवलं आहे. मी डॉक्टर आहे. तुमच्या आजींना अर्धांगवायू झालेला आहे, माझ्याकडे आयुर्वेदिक औषध आहे. त्याच्याकडे एका बाटलीत एक काळसर दिसणारं औषध होतं. ते औषध तव्यावर अंड्याच्या बल्कबरोबर गरम करून पायाला लावायचं. एक लिटरची बाटली असेल, एका बाटलीचे हजार रुपये. म्हटलं तर मोठी रक्कम, म्हटलं तर इतके पैसे औषधावर खर्च होतच आहेत, त्यात हजार रुपये काय?

            त्यानंतर आम्ही त्याला काही प्रश्न विचारले 

            आम्ही: तुम्ही कोणत्या प्रकारचे डॉक्टर आहात?
            तो:   मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे.
(कपडे बरे घातले होते, पण बोलण्यावरून आणि एकंदरच डॉक्टर वगैरे वाटत नव्हता)
           आम्ही: तुमच्याकडे डॉक्टर असल्याचं काही प्रमाणपत्र?
           तो:    मी कोल्हापूरहून आलेलो आहे. आमचा हा पिढीजात व्यवसाय आहे. 
           आम्ही: तुम्ही डॉक्टर आहात तर असे घरोघर का फिरता?
           तो:   सांगितलं ना हा पिढीजात व्यवसाय आहे. मी हे समाजसेवा म्हणून करतो.
           आम्ही: तरीही हजार रुपये द्यायचे म्हटल्यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा?
           तो:   (त्याची डाळ शिजत नाही हे पाहून रागाने) मला त्या (रविवार पेठेतील) वहिनींनी सांगितलं म्हणून मी इतक्या लांब आलो, रुग्णसेवा आमच्या रक्तात आहे. कोणीही आजारात खितपत पडू नये असं आम्हाला वाटतं........ (बरंच काही बोलला आणि...) पण एकंदरच त्याची बोलण्याची पद्धत कन्विन्सिंग होती. 

               आजीला एव्हाना एकदा घेऊन पाहायला काय हरकत आहे असं वाटलं आणि ती हट्टच धरून बसली. ती म्हणू लागली नुसतं लावायचं तर आहे पायाला, घेऊन बघुयात, कधी देव कोणाच्या रुपात येईल सांगता येत नाही (यांच्या काहीही जुन्या समजुती) कशाने बरं वाटेल आपल्याला काय माहिती. आजीच्या हट्टाखातर ते घेतलं. आणि त्याचा पुढे काहीही उपयोग नव्हता हे वेगळं सांगायलाच नको. महिन्याने हा कोर्स झाल्यावर पुन्हा दुसरा कोर्स सुरु करू असं तो म्हणाला होता . एक महिना झाला, आजी नियमाने औषध लावत होती, त्या निमित्ताने आमच्या घरात पहिल्यांदाच अंड आलं होतं. फरक तर काहीच नव्हता. तो परत ना महिन्याने आला  ना दोन तीन महिन्यांनी. तेव्हा आजीला आमचं म्हणणं पटलं.        

            अशा फसवणुकीच्या कित्येक घटना आपल्या आजूबाजूला रोज घडत असतात. चोरी होणे हा ही फसवणुकीचाच प्रकार, फक्त तिथे आपण हजर नसताना फसवणूक झालेली असते. पण आपण हजर असताना झालेली फसवणूक खूप उद्विग्नता देते. मग मनात येतं आपण असे वागलोच का? आपली बुद्धी इतकी भ्रष्ट कशी झाली? सगळं कळत असूनही मी काही केलं का नाही? मला कोणीतरी 'मूर्ख' बनवलं?, असं झालंच कसं वगैरे वगैरे... फसलो गेल्यानंतर नक्की काय वाटतं हे खरं तर सांगता नाही येणार. दु:ख होतं, राग येतो, उद्विग्नता येते, चिडचिड होते, पण काहीच उपयोग नसतो.

            तिने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, पण तो एका क्षणाचाही विचार न करता तिला सोडून गेला. दुसऱ्या एका त्याला असंच कोण्या तिने दुसऱ्याशीच लग्न करून 'फसवलं'. जगात कोणत्याही दु:खापेक्षा फसवणुकीचं दु:ख सर्वात मोठं आहे. या दु:खानंतर जी असहाय्यतेची भावना मनात निर्माण होते ती सर्वात जास्त दु:खदायक आहे. प्रेमात फसवलं जाण्यावर तर फार नियंत्रण ठेवता येण्यासारखं नाही, कारण प्रेमात पडणाऱ्यांचे डोळे बंदच नसतात तर ते आंधळेच झालेले असतात. पण इतर वेळी डोळे उघडे ठेवून वावरलो तर बऱ्याच फसवणुकीच्या घटना टाळता येतील.         



गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

विस्मरण...

         काका, माझे पणजोबा माझी सर्वात आवडती अन लाडकी व्यक्ती. ते माझे आदर्श, मार्गदर्शक, मित्र सर्वच काही होते. त्यांचं वय बरंच होतं तरीही त्यांनी तब्येत चांगली ठेवली होती. पण पिकलं पान कधीतरी गळणारच! मी दहावीत असताना ते गेले. तेव्हा वाटलं मी आता कोणाशी इतकं बोलणार. माझे लाड कोण करणार, मला समजावून कोण सांगणार? खूप खूप रडू आलं. काकांची आठवण आली की रडू यायचं. पण हळूहळू ते कमी होत गेलं. अजूनही आठवण येते पण आता परिस्थिती स्वीकारली गेली आहे.

        मानवी मनाला विस्मरण हे मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे. एखाद्या दु:खद घटनेची तीव्रता, त्यामुळे होणारा मानसिक त्रास हा कालौघात आपोआप कमी होत जातो, अगदी कितीही मोठा आघात असला तरीही. 
"काळ" हे सर्वात मोठं औषध आहे म्हणतात ते खरंच. हे विस्मरणाचं  वरदान माणसाला मिळालं नसतं तर जगातली किती दु:ख घेऊन त्याला गोंजारत बसावं लागलं असतं. खरं तर जे शरीराचं तेच मनाचं! नंतरही कधीतरी झालेल्या घटना आठवतात पण जखमा जुन्या झाल्याने त्यांची खूण फक्त उरते क्वचित कधी एखादी कोच पडते वा टाक्यांचे व्रण राहतात, पण वेदना कधीच नाहीशा झालेल्या असतात. जे लोक आत्महत्या वगैरे करतात ते तर मला अगदीच आततायी वाटतात. स्वत:ला थोडा वेळ दिला की अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही जी विसरली जाणार नाही, किंवा जिच्यावर इलाज मिळणार नाही.

         आपल्यापासून दूर जाणाऱ्या माणसांना आपण म्हणतो तू मला विसरशील. किती खरं असतं ते! शाळेमध्ये, होस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये कायम बरोबर असणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराला किंवा एखाद्या खास मित्र मैत्रिणीलाही त्यांच्यापासून दूर गेल्यावर आपण विसरून जातो. विसरतो म्हणण्यापेक्षा तेव्हा जसं रोजच ते आपल्याला गप्पा मारण्यासाठी हवे असायचे तसे आता नसले तरी चालतात. सुरुवातीला आपण त्यांना दर आठवड्याला फोन करतो, नंतर महिन्यातून एकदा, नंतर तर असंच जमलं तर. आणि त्याहीनंतर नाहीच जमत बऱ्याचदा. विस्मरणच होतं आपल्याला त्यांचं.

        कोणाशी झालेलं भांडण असो, परीक्षेत नापास होणं असो, कोणी कधी विनाकारण केलेला अपमान असो, कोणामुळे होणारा त्रास असो, प्रेमभंग असो की कोणाचा मृत्यू असो यातील एकही गोष्ट अशी नाही की जी आयुष्यभर सल देईल, थोडं स्वत:ला सावरलं तर "विस्मरण" ही मात्रा तिचं काम चोख बजावते. माणसाने जसं काही गोष्टी लक्षात ठेवायला शिकलं पाहिजे तसंच काही गोष्टी प्रयत्नपूर्वक विसरायलाही शिकलंच पाहिजे. एक मात्र आहे की विस्मरण होण्यासाठी काही काळ जावा लागतो. आज घडलेली गोष्ट उद्या तर लगेच विसरता येत नाही, पण काही काळाने का होईना ती येते हेच खूप झालं. तोपर्यंत मनाला कसं समजवायचं ते ज्याचं त्याने ठरवायचं!