Wednesday, 5 September 2012

गोडबोले बाई


            "पाय अस्वच्छ होऊ नयेत म्हणून जितका जपतोस तसंच मन अस्वच्छ होऊ नये म्हणूनही जप हो बाळ, मनाला नेहमी निर्मळ ठेव!" हे चौथीत असताना निबंध लिहिताना श्यामच्या आईच्या तोंडी घातलेलं वाक्य. बाईंनी ते वाचलं आणि ते वाचून त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून गेले. त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं ते फक्त कौतुक. बाई म्हणाल्या "अगं एवढीशी चौथीतली मुलगी तू, तुला हे 'जप हो बाळ' सुचलं तरी कसं?" मला खरंच माहिती नाही कसं सुचलं तेव्हा. बाई जसं बोलायच्या जशा वागायच्या त्याचीच तर कॉपी करायचो आम्ही. आमच्या सर्वांच्या लाडक्या गोडबोले बाई. 

            घर बदलल्याने चौथीत लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या "शारदा विद्या मंदिर" मध्ये प्रवेश घेतला. बाबांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नाव दिलं आणि गोडबोले बाईंच्या हाताखाली शिकण्याचं भाग्य लाभलं. सकाळी ७ ते १२ शाळा असायची. नंतर १ पर्यंत शिष्यवृत्तीचा तास असायचा आणि हा तास झाला की बाई आम्हा निवडक सहा जणांना त्यांच्या घरी घेऊन जायच्या. आपटे रस्ता ते सदाशिव पेठ पुढे बाई आणि मागे आम्ही सहा जण. जाताना अधूनमधून ऊन लागायचं तर मधूनच झाडांची सावलीही लाभायची. उन्हातून चालायला लागलो की आम्ही सगळे ढेपाळून जायचो. मग बाई म्हणायच्या उन्हातून नेहमी भरभर चालायचं म्हणजे ते जाणवत नाही, आणि सावली आली की सावकाश चालायचं. तेव्हा या वाक्याचा अर्थ फक्त चालण्यापुरताच लक्षात आला होता...

            बाईंनी एकदा कुठल्याशा वक्तृत्व स्पर्धेत माझं नाव दिलं होतं. लोकमान्य टिळकांवर भाषण लिहून दिलं होतं आणि  ते पाठ करायला सांगितलं होतं. ते पाठ झाल्यावर मी आईला ते म्हणून दाखवलं. बरं दिवसातून एकदा किंवा दोनदा म्हणून दाखवावं; तर मी सारखंच दर दहा मिनिटांनी ऐकण्यासाठी आईच्या मागे लागे. आई एकदा वैतागली आणि म्हणाली, "झालंय आता छान पाठ, आता शाळेत एकदा म्हणतेस ते पुरे आहे". तर मी आईला म्हणाले, "अगं असं कसं बाईंच्या भरवशाच्या म्हशीला टोणगा होईल ना". आईने हे ऐकलं आणि हसतच सुटली. बाई एकदा म्हणी शिकवत होत्या. म्हण होती "भरवशाच्या म्हशीला टोणगा". बाईंनी उदाहरण दिलं , "समजा मला तुम्हाला कुठल्या स्पर्धेत पाठवायचं असेल, आणि मी ठरवलं की चला कोणी नाही बक्षीस मिळवलं तरी प्राची मिळवेलच बरं का... आणि ऐन स्पर्धेच्या दिवशी प्राची पुढे स्टेजवर गेली आणि तिला अगदी पहिलंही वाक्य आठवलं नाही तर झाला ना माझ्या भरवशाच्या म्हशीला टोणगा..." तेव्हा 'भरवशाच्या', 'टोणगा' म्हणजे नक्की काय हे ही माहिती नव्हतं पण म्हण आणि अर्थ अगदी लक्षात राहिले.

            पाढे, वर्ग, अवघड गणितं हे सगळं बाईंच्या गणितातल्या युक्त्यांमुळे अगदीच सोपं होऊन गेलं. आणि ते आजतागायत उपयोगी पडतंय. "लॉजिक" म्हणजे काय, किंवा लॉजिकली विचार कसा करावा हे बाईंनी शिकवलं. कॉलेजमध्ये असताना कँपसला जेव्हा इतरांना "apti" चा अभ्यास किंवा तयारी करताना बघायचे तेव्हा फार आश्चर्य वाटायचं. असं वाटायचं की हे एकतर चौथीला scholarship ला बसले नसावेत किंवा यांना शिकवायला गोडबोले बाई तरी नसाव्यात.

            आमच्या सहा जणांपैकी मी तशी अभ्यासात साधारणच होते. एकदा बाईंच्या घरी मुख्याध्यापिका आल्या होत्या, त्यांनी बाईंना विचारलं हीच सहा मुलं का? बाईंनी प्रत्येकाबद्दल एक गुणविशेष सांगितला, त्यात दोघांना हे खूप हुशार आहेत असं सांगितलं, एकाचं गणित खूप चांगलं आहे असं सांगितलं, आणि माझ्याबद्दल सांगितलं होतं की ही मुलगी खूप जिद्दीची आहे. त्या एका वाक्यामुळे आजही काही चढउतार आले की मला प्रेरणा मिळते. त्या वर्षात आमच्या सहाजणांपैकी फक्त धनंजयला शिष्यवृत्ती मिळाली. मला नेहमी गणित आणि बुद्धिमत्तेपेक्षा मराठी अवघड जायचं आणि मराठीमुळेच शिष्यवृत्ती हुकली. तेव्हा फार मनात आलं होतं बाईंना विचारावं की तुमच्या भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला ना म्हणून, पण नाही विचारलं.

            शिष्यवृत्ती नाही मिळाली पण खडतर परिस्थितीत आजपर्यंत जे काही मिळालं ते फक्त गोडबोले बाईंमुळे. बाईंच्या बद्दल जितकं लिहीन तितकं कमीच आहे, आजही कित्येक छोट्यामोठ्या प्रसंगात त्यांची आठवण येते, की गोडबोले बाईंनी असं सांगितलं होतं. बाबा सांगत होते बाईंच्या वाड्याच्या जागी आता मोठी इमारत झालीये. वाईट वाटलं तेव्हा, आम्ही जिथे अभ्यासाला बसायचो ती खोली, तहान लागली की आत पाणी आणायला जायला आम्ही घाबरायचो ते स्वयंपाक घर, जिथे आम्ही रोज नंबर लावून आतून तांब्याभर पाणी आणायचो. ज्या दिवशी ज्याचा नंबर असेल तो एकदम शूर. बाईंचे "सर" गुरुवारी घरी असायचे, त्यांच्या दाढीमुळे आणि ते आमच्याशी कधी बोलत नसल्याने आम्ही त्यांनाही खूप घाबरायचो. बाईंनी प्रेमाने खाऊ घातलेले स्वत: बनवलेले पदार्थ, त्यातही कवठाच्या काचवड्या बाई एकदम भारी बनवत. सगळं आठवलं तेव्हा. शिक्षक म्हणण्यापेक्षा त्यांना गुरु म्हणणेच जास्त योग्य ठरेल. बाईंना भेटण्याची फार इच्छा होते आहे. पण हे सगळं मी त्यांना समोर नाही सांगू शकणार. बाईंना शतश: प्रणाम! शिक्षक असावेत तर असेच.....

20 comments:

 1. छान आठवणी. प्रत्येकाच्या मनात स्वत:च्या बालपणाबरोबर एखादातरी शिक्षक दडलेला असतोच, नाही?

  ReplyDelete
 2. सुरेख...
  गुरु हेच जास्त योग्य शिक्षकापेक्षा... क्रमिक शिक्षणाबरोबर ज्ञानार्जन हे जास्त महत्वाचे न ... आयुष्यभर ठसा उमटतो तो त्याचाच..
  सुरेख वर्णन :)

  ReplyDelete
 3. Khupach apratim lihile ahe Prachi...btw mala pan ektyalach scholarship milali hoti.. :)

  ReplyDelete
 4. >>तेव्हा या वाक्याचा अर्थ फक्त चालण्यापुरताच लक्षात आला होता.
  छान गं...खूप मस्त झालीय ही पोस्ट...काही प्रतिक्रिया सुचण्याच्या पलिकडे.

  ReplyDelete
 5. >>>बाईंना भेटण्याची फार इच्छा होते आहे. पण हे सगळं मी त्यांना समोर नाही सांगू शकणार.

  अगदी खरं गं... सुरेख उतरलीये पोस्ट..

  ReplyDelete

 6. खरंय मोहनाताई,

  प्रत्येकाचा एक तरी शिक्षक असा असतो की जो त्याचा गुरुही असतो...
  खूप धन्यवाद :)

  ReplyDelete
 7. धन्यवाद अशोकजी...

  ब्लॉगवर तुमचं हार्दिक स्वागत :)

  ReplyDelete
 8. खूप धन्यवाद भक्ती :)

  अगदी... खरं तर ज्ञानार्जनच जास्त महत्त्वाचं आहे पण हल्ली तसं ना पालकांना वाटतं ना शिक्षकांना... सगळीकडे फक्त स्पर्धा आहे...
  पण असेही काही शिक्षक असतात जे आयुष्यभराचा अमुल्य ठेवा देऊन जातात :)

  ReplyDelete
 9. धन्यवाद धनंजय :)

  तुझं नावच धनंजय आहे... मग तुलाच मिळणार scholarship :)
  पण अभिनंदन... खूप अवघड आहे scholarship वगैरे मिळवणं...

  ReplyDelete

 10. खूप धन्यवाद अपर्णाताई :)

  बाईंबद्दल आहे म्हणून असेल... कारण शिदोरीच इतकी दिली आहे त्यांनी... :)

  ReplyDelete

 11. अनेक धन्यवाद तन्वीताई :)

  अजूनही खूप आठवणी लिहायच्या राहून गेल्या असं वाटतंय...

  ReplyDelete
 12. फारा दिवसांनी काही मंद स्मित फुलवणारं वाचायला मिळालय. कधी कधी कळत नाही फुलाच कौतुक कराव का माळ्याच! :) काही संस्कारांच मूळ हे आपटे मध्ये आहे, अस उत्तर आज मिळाल आहे तर!
  पोस्ट तर अजून अजून वाचतोच आहे, तुमच इंद्रधनू फारच खुललय तीत! पोस्ट सारखच कमेंट मध्ये ही खूप लिहिण राहील आहे अस वाटतंय, मात्र आमच मराठी अजूनही कच्चच आहे!
  ता.क.: धनंजय च्या पोस्ट मध्ये जी बुद्धिमत्ता उठून दिसते तिच्या मुळी हीच स्कॉलरशिप का! :)
  अरे हो 'जिद्द', मुद्द्याला इंदिराजी कमी नाहीत, लक्षात ठेवणे. पोस्ट साठी हृदयी आनंद. इथे आमच्या गुरुंना स्मरतो! प्रिय गुरुजन, आमचा 'ता.क.'भात गोड मानून घेणे...
  अरे ता.क. बरच लांबलय, ....आवरतो!

  ReplyDelete
 13. खूप खूप धन्यवाद अभिषेक... :)
  माळ्याचंच कौतुक आहे. फुलाचं कसलं... त्यातल्या त्यात अगदीच बाभळीचं रोप नाही निपजलं हे समाधान ;)
  मराठी तर माझंही अजून कच्चच आहे.. पण जितक्या भाषा येतात त्यातल्या त्यात हीच सगळ्यात बरी येते...

  आणि >>अरे हो 'जिद्द', मुद्द्याला इंदिराजी कमी नाहीत
  आता याला काय रिप्लाय देऊ? :) हाच रिप्लाय देऊ शकते मी
  ता.क. अजूनही लांबवलं असतंत तरी काहीच हरकत नव्हती... तुम्ही सगळे वाचून इतकं कौतुक करता म्हणून तर हुरूप येतो लिहायला... :)

  बाकी >>धनंजय च्या पोस्ट मध्ये जी बुद्धिमत्ता उठून दिसते तिच्या मुळी हीच स्कॉलरशिप का!
  हे धनंजयच सांगू शकेल.. आणि स्कॉलरशिप मिळाली होती म्हटल्यावर बुद्धिमत्ता उठून दिसणारच... :)

  ReplyDelete
 14. चांगले शिक्षक मिळायला भाग्य लागतं! आणि Converse is also true!

  ReplyDelete
 15. >> चांगले शिक्षक मिळायला भाग्य लागतं! आणि Converse is also true!
  अर्धा भाग तर खरा आहे... पुढचा अर्धा अजूनही ठाऊक नाही.... :)

  ब्लॉगवर तुमचं हार्दीक स्वागत गुरुदत्तजी ....
  अनेक धन्यवाद :)

  ReplyDelete
 16. i also mis my school days...... and my favorite teacher Mrs. gorivale....keep writing

  ReplyDelete
 17. खूप धन्यवाद मेरा कुछ सामान .. :)
  ब्लॉगवर तुमचं हार्दीक स्वागत…

  ReplyDelete