बुधवार, १८ मार्च, २०१५

लघुकोन

ज्यांचं आरोग्य चांगलं आहे अशा निरोगी व्यक्तीला अंथरुणावर पडल्यानंतर दहा मिनिटात झोप यायला पाहीजे असं म्हणतात. मला मात्र अंथरुणावर पडलं की स्वत:शी किती बोलू अन किती नको असं होऊन जातं. दिवसभर तर अनेक कामांमध्ये कसा वेळ जातो कळत नाही, मग स्वत:शी बोलायचं तरी कधी? फार ठरवून किंवा गहन असं काही बोललं जात नाही पण खूप जास्त विचार करून झाल्याशिवाय अंतर्मनातून झोपण्याची परवानगीच मिळत नाही. 

उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर कामांची priority काय असावी, अमूक एक task वेळेत पूर्ण होईल ना, बरेच दिवस झाले ब्लॉगवर काही पोस्ट नाही केलं पण लिहू तरी काय. हल्ली तर काही विषयही सुचत नाही. "बेला के फूल" ऐकावं का थोडा वेळ? नको परत छान झोप यायला लागली तर रेडीओ बंद करण्यासाठी जागं राहायचं टेन्शन! उद्या काहीही करून व्यायाम करायचाच आहे. फार दुर्लक्ष होतंय तब्येतीकडे. अंक मोजायला सुरु करावेत म्हणजे पटकन झोप येईल. एक-दोन-तीन-चार--------तीस-एकतीस

फोर-व्हीलरचा क्लास लावायला एक महिन्यानंतरची appointment मिळालीये learning licence साठी. जमेल का मला चालवायला? चालवलीच तर महिन्याचा पेट्रोलचा खर्च साधारण किती येईल? औरंगजेब वाचून पूर्ण करायचंय पण आज डोळे फारच दुखत होते. इतिहासाला खरंच काही अर्थ असतो का? इतिहास जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो म्हणतात. आज माझ्यासमोर ज्या राजकीय, सामाजिक घटना घडतात त्यादेखील इतक्या बदलून माझ्यापर्यंत पोहोचतात मग इतिहासातलं कोण बघायला गेलंय? असो जास्त विचार नाही करायचा. एक-दोन-तीन-चार--------तीस-एकतीस-बत्तीस-------त्र्याहत्तर-चौऱ्याहत्तर-पंच्याहत्तर

गुरुवारी दादा-पोता match आहे अशा प्रकारचा मेसेज आलाय एक. पण बांग्लादेश सुद्धा काही कमी नाही. ही match जिंकून नंतर पाकिस्तानशी match झाली आणि ती हरलो तर??? नको नको एकतर दोन्ही matches जिंका किंवा बांग्लादेश बरोबरच हरा. काय होईल काय माहीती पण कळेलच की येत्या आठवड्यात! एक-दोन-तीन-चार--------चव्वेचाळीस-पंचेचाळीस-सेहेचाळीस-------एकसष्ठ-बासष्ठ 

मनाच्या केंद्रबिंदूपासून एक एक कोन तयार होत जातो विचारांचा, वीस बावीस अंशापासून सुरुवात होऊन ३६० अंशांकडे हळू हळू सरकत विचारांचे असंख्य कोन तयार होतात. आणि शेवटी मग एक दोन अंशांचा लघुकोन तयार होतो तुझ्या विचारांचा. आणि मग वर्तुळ पूर्ण होतं. एक-दोन-तीन-चार--------वीस-बावीस-----एक्क्यावन्न -बारवन्न-त्रेसष्ठपन्न-चोमपन्न-पंचरपन्न-छत्तरपन्न ---------------------------------------------------------

८ टिप्पण्या:

  1. जास्त विचार नाही करायचा याबद्दलच आपण जास्त विचार करत राहतो :-).

    उत्तर द्याहटवा
  2. mast!! kadhi kadhi same condition aste mazihi. dokyat vicharancha bhadimar asto ani kay mahit kadhi zop lagun jate!

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी खरं मोहनाताई :)
    प्रतिक्रियेबद्दल आभार…

    उत्तर द्याहटवा
  4. अद्वैत, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  5. जास्त विचार नाही करायचा याबद्दलच आपण जास्त विचार करत राहतो ++++++++++++++

    chan post :)

    उत्तर द्याहटवा
  6. खूप धन्यवाद अपर्णाताई, तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांमुळे खूप प्रोत्साहन मिळतं :)

    उत्तर द्याहटवा
  7. मी आपल्या ब्लॉगला यापुर्वी अनेकवेळा दिली आहे. अभिप्राय सुद्धा दिले आहेत. आपण छान लिहिता. फेबु हा आपला लेख वास्तवतेला धरून आहे. याच विषयावरील माझे लेख खालील लिंकवर जाऊन नक्की पहावेत. http://maymrathi.blogspot.in/search?q=%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95

    उत्तर द्याहटवा
  8. खूप धन्यवाद विजयजी, आपण दिलेले लेख नक्कीच वाचेन...

    उत्तर द्याहटवा