गुरुवार, १६ जुलै, २०२६

अस्तित्व


एखाद्याचं अस्तित्व आपल्याला मुखत्वे त्याच्या दिसण्यामुळे कळून येतं. डोळ्यांचा मुख्य सहभाग असतो. एखादी अदृश्य गोष्ट अस्तित्वात आहे हे मान्य करणं अवघडच जातं. तरी काही गोष्टी अशा असतात की त्या न दिसूनही त्यांचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं. ध्वनी-कान, सुगंध-नाक, हवा-त्वचा, आणि चव-रसना या डोळे आणि इतर पंचेंद्रियांना जे जे काही जाणवेल ते सगळं अस्तित्वात असतंच. एखादी व्यक्तीचा आवाज येतो, काही गोष्टींचा ठराविक वास येतो त्याने ती गोष्ट जवळपास असेल असे वाटते, कोणी मागून पाठीवर थाप मारली की कोणीतरी आहे हा संदेश मेंदूला जातो. आणि पदार्थांच्या अस्तित्वाला चव असेल तरच अर्थ आहे. 

आपल्या अस्तित्वाची लोकांनी दखल घ्यावी असं सर्वांनाच वाटतं. ऑफिसमध्ये दोन सहकर्मचारी एकमेकांसमोर आले की एकमेकांना हाय-हॅलो करतात, वरिष्ठांना अभिवादन करतात. ही त्यांनी एकमेकांच्या अस्तित्वाची घेतलेली दखल असते. आपल्या कुटुंबात आपल्या अस्तित्वाची सगळेच दखल घेतात. शाळा कॉलेजात ठराविक मित्र-मंडळी दखल घेतात, जर तुम्ही खूप हुशार किंवा काही स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेचं नाव उंचावणाऱ्यांपैकी असाल तर थोडे अजून सहाध्यायी आणि शिक्षकही तुमची दखल घेतात. आणि जर तुम्ही कोणी सेलेब्रिटी झालात तर अनोळखी ठिकाणी जाऊनही जास्तीत जास्त लोक तुमची दखल घेतात. कधी कधी माणसाला हे अति अस्तित्व पण नकोसं होतं, मग ते निर्जन किंवा अनोळखी ठिकाणी जाणं पसंत करतात.

अस् म्हणजे असणे, अस्ति म्हणजे आहे, आणि त्व हा त्याला लागलेला प्रत्यय. एखाद्या गोष्टीची उपस्थिती किंवा फक्त असणे. पण त्या काही गोष्टींच्या आणि काही व्यक्तींच्या नुसत्या असण्याने एखाद्याच्या आयुष्यात खूप फरक पडत असतो. तू आहेस ही भावनाच खूप सुखद असते. कधी कधी काही गोष्टींना आणि माणसांना आपण इतकं गृहीत धरलेलं असतं की त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला दखलही नसते. किंवा आपल्याला काही जणांनी इतकं गृहीत धरलेलं असतं की काहींना आपल्या अस्तित्वाची जाणीव नसते.

एखादी घरातली व्यक्ती मृत पावली तरी त्यांच्या वस्तूंमधून किंवा नेहमी उठण्याबसण्याच्या जागांवरून त्यांचं अस्तित्व नंतरही बराच काळ आपल्याला जाणवत राहतं. एखादा असा गोतावळाही असतो की आपल्या अस्तित्वाची तिथे कोणी दखल घेत नाही, मग हळू हळू आपणच आपलं अस्तित्व तिथून कमी करू लागतो. पण ही खरं तर पळवाट आहे. जिथे आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही तिथून अस्तित्व कमी करण्यापेक्षा त्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणं जास्त जिद्दीचं ठरेल.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा