"अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं"
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं"
असं भोंडल्याच्या गाण्यांमध्ये लहानपणी म्हणताना मजा यायची. कोणत्याही विवाहित स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर. भले आजकाल शेजारी का माहेर असेना पण माहेर ते माहेर. तसं तर आता कोंडून मारणारी सासरे क्वचितच कुठे असतील. पण तरीही मुलीचा खूप दिवस माहेरी जायला मिळालं नाही की कोंडमारा होतोच. माहेरचं कौतुक करताना कोणतीही मुलगी कधीच थकत नाही. एवढंच का पण माहेरची उणीदुणी असतील तर ती झाकून ठेवते आणि कौतुक मात्र वारेमाप करते.
पूर्वीच्या काळी मुलीला माहेरी जायचं म्हटलं तर माहेराशी निगडित सणांची वाट बघावी लागायची. खूप महिन्यांनी आणि कधी कधी तर खूप वर्षांनी माहेरी जायला मिळायचं. शारीरिक मानसिक सगळे कष्ट सहन करून बिचारी दमून थकून जायची. आता शारीरिक छळ वगैरे नसला तरी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मानसिक थकवा येतोच. सासरी सगळे प्रेमाने वागणारे सगळे असतील तरी माहेरची माया आणि ओढ वेगळीच असते. सासरी भरपूर ऐश्वर्य असेल आणि माहेरी गरीबी असेल तरी त्याही मुलीला माहेर हवंच असतं.
पूर्वी माहेरी जाणाऱ्या मुलीला अनेक भाऊ भावजयाही असत. आईचे लाड तर वेगळेच पण त्यांच्याकडूनही कोडकौतुक होत असे. हल्ली बऱ्याच मुलींना भाऊ नसतो, अशा काही मुलींना सासरी सगळं सांभाळून माहेरही लक्ष द्यावं लागतं तरीसुद्धा ती अतिरिक्त जबाबदारी न मानता त्या ते आनंदाने करतात. लहानपणापासून आपण जिथे राहीलो त्या घराशी आणि जागेशीही आपली भावनिक जवळीक असते. शेजारीपाजारी देखील प्रेमाने विचारणारी माणसे असतात. पण खऱ्या अर्थाने जोवर आई माहेरी असते तोवरच माहेर हे महेर वाटतं.
लहानपणी आई तिच्या माहेरी जायची म्हणजेच आपण आपल्या आजोळी जायचो ती मजादेखील वेगळीच असायची, आईच्या लाडांमुळे तिच्याबरोबर आपलेही लाड व्हायचे. पण माहेरी आलो आता राहा निवांत असं कोणतीच मुलगी करत नाही. तेव्हा आईला माहेरी गेली तरी आजीची काळजी घेताना पाहिलं, आता माहेरी जाऊन नुसताच आराम करण्यापेक्षा आईला काय हवं नको ते बघताना एका ठराविक वयानंतर माहेरी जाऊनही आई आजीची काळजी घ्यायची ते आपसूकच आठवतं.
सासरी जरी सगळं छान असेल पण त्यात एक व्यावहारिकपणा दिसतोच, आपल्याला स्त्रियांना तो जाणवतो. मग व्यवहारांची, कर्तव्याची लोढणी सोडून मायेची फुंकर मिळवण्यासाठी मुलगी माहेरी जाण्यासाठी आसुसलेली असते. माहेर म्हणजे औपचारिकता सोडून आपलेपणाने केलेली विचारपूस, स्नेहाचा वाहणारा झरा. माहेर या शब्दातच किती जिव्हाळा, माया, प्रेम, काळजी आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माहेरासाठी आसुसलेल्यांसाठी आपल्यालाही कोणाचं माहेर होऊन राहता आलं तर ते किती छान असेल.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा