अमुक शाखेतच शिक्षण घेणे, अमुक वयातच लग्न करणे, अमुक वयात मनासारखं घर घेऊन ते मनाप्रमाणे सजवणे, अमुक वयात आणि अमुक आर्थिक परिस्थितीमध्ये असताना मुलांना जन्म देणे, मुलांचे संगोपन ठराविक प्लॅनिंगनेच करणे, हे फारच कमी लोकांना जमत असणार. पहिली सुरुवातच करिअर पासून होते. काही जणांना कितीही मोठं होऊनही आपला कल नक्की कुठे आहे तेच समजत नाही. मग वेगळंच शिक्षण घेऊन आयुष्यभर मनाविरुद्ध काम करत बसणं वाट्यास येतं.
कोणाकोणाला मनासारखा जोडीदार मिळत नाही, मग पुढच्या प्लॅनिंगऐवजी घटस्फोट वगैरे गोष्टींमध्ये पडणं किंवा आहे ते सहन करणं अशा गोष्टी कोणाच्याच नियोजनामध्ये नसतात. इच्छा असूनही सर्वांनाच ठराविक वयात किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये मूल होईलच असं सांगता येत नाही. न सांगता येणारी आजारपणं, ज्येष्ठांचे वेगळे प्रश्न हे सगळं हाताळण्यामध्ये नियोजन कुठे ना कुठे कोलमडतेच. पण तेच एखादा सण-समारंभ साजरा करणे असेल तर त्याचं नियोजन करूनच आपण ते तडीस नेऊ शकतो. अशा वेळी मात्र नियोजन न करण्याने सगळा गलथान कारभार होऊन जाऊ शकतो.
सणा-समारंभाचं नियोजन करणे आणि पूर्ण आयुष्याचं नियोजन करणे यात खूपच फरक आहे. समारंभ वगैरे आपल्याला एका दिवशी पूर्णत्वास न्यायचा असतो त्यामुळे तो दिवस येईपर्यंत आपण उत्साहाने प्लॅनिंग करून ते पारही पाडतो. पण समारंभाचा जसा शेवटचा दिवस किंवा साजरा होण्याचा दिवस आपल्याला माहिती असतो तसं आयुष्याचं नसते ना. त्यामुळे आयुष्याचे छोटे छोटे भाग बनवून छोटं छोटं प्लॅनिंग पार पाडणं केव्हाही उत्तम!
आयुष्याच्या बाबतीत मला तर नेहमी असं वाटतं की नियोजन करून त्याप्रमाणेच वागणाऱ्या लोकांमध्ये नशिबाचाच भाग जास्त असावा. त्यामुळेच वूडी ऍलन चा हा सुविचार माझ्या खूपच जवळचा आहे.
“If you want to make God laugh, tell Him about your plans.”
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा