गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०११

पीएमटी

          पीएमटीच्या नावाने पुण्यातल्या लाखो लोकांपैकी कोणी ना कोणी रोजच शिव्या घालत असतो. पण परवा एकाच दिवसात २-३ प्रसंग असे घडले की मलाही पीएमटीला शिव्या देण्याची मनापासून इच्छा झाली. माझ्या हापिसाच्या प्रवासात मला जाताना दोन आणि येताना दोन अशा चार बस बदलण्याचा योग येतो. त्या दिवशी हापिसातून घरी परतत असतना बराच उशीर झाला होता. एका थांब्यावर बस ड्रायव्हरने बस संथ केली पण न थांबवताच पुढे नेली. त्या थांब्यावर एक अंध जोडपं उभं होतं. त्यांनी बसपर्यंत येऊन कोणती बस आहे हे विचारेपर्यंत बस पुढे निघालीसुद्धा. मान्य केलं ड्रायव्हरने त्यांना पाहिलं नसेल, पण कंडक्टरला तर ते दिसत होते, त्यानेही सिंगल बेल मारण्याचे कष्ट घेतले नाहीत. आणि माझी चूक, मी कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असल्याने त्यांनी इतक्या दुरून कोणत्या ठिकाणाचे नाव घेतले ते इतरांप्रमाणेच मलाही ऐकू आले नाही. आणि समजा कोणाला ऐकू आलेही असते आणि त्याने त्यांच्यासाठी थांबण्याची विनंती केली असती तरी ड्रायव्हर गाडी थोडीच थांबवणार होता?

           दुसरा प्रसंग, गाडी मनपावरून कोथरूडला निघालेली. पूर्ण रिकामी बस. रात्रीचे १० वाजलेले. बस लागल्याचे प्रवाशांना आधी सांगितलेच गेले नाही. जेव्हा बस हळूहळू पुढे निघाली तेव्हा कोणीतरी विचारल्यावर  तिथल्या  कंडक्टरने सांगितले कोथरूड आहे. झाले, बसथांब्यावरील सगळी गर्दी बसच्या मागे धावू लागली. अबालवृद्ध आपापल्या वेगाने बसकडे धाव घेत होते. म्हातारेकोतारे तीन पायांनी त्यांना जमेल तसे बसकडे धावू लागले. दुर्दैवाने त्यांच्यातही एक अंध प्रवासी होता. जे बसपर्यंत पोहोचले त्यांनी बसवर थापा मारून ती वाजवून बस थांबवण्याची विंनती केली पण व्यर्थ. जे बसपर्यंत पोहोचू शकले नाहीत ते संताप व्यक्त करीत परत थांब्याकडे आले. सर्वात वाईट त्या अंध मुलाचं वाटला. बस नक्की कुठे आहे, थांबलेली आहे की पुढे जातेय, त्याला कुठपर्यंत पुढे जायचं, काहीच माहिती नव्हतं. पुढील बस अर्ध्या तासाने.

             आणि तिसरा प्रसंग. त्या दिवशी मला हवी असणारी बस पुणे स्टेशन वरून निघते, मध्ये मनपाला तिचा थांबा आहे. ती बस दहा वाजून दहा मिनिटांनी भर पावसात मनपाला आली. बसवरील पाटी कोरी, नीट  पाहिल्यावर लक्षात आलं ती वेगळ्याच जागी लावलीये. हे सगळं पाहून बसला हात करेपर्यंत बस थांब्याच्या दहा फूट दुरून सुसाट वेगाने निघून गेली. इतक्या रात्री पुन्हा स्टेशनवरून पुढील बस कधी येणार याची काहीच कल्पना नाही.

            बस वेळेवर न येणे, रिकामी असूनही न थांबवणे; आणि पुढच्या बसला खचाखच गर्दी असणे, सुट्टे पैसे परत न करणे, त्याबद्दल मागणी केल्यास "सुट्टे जवळ ठेवायला काय होतं" म्हणून अंगावर खेकसणे, एखाद्या बसला टीसी आहे हे माहिती असल्यावर मुद्दाम सर्वांची तिकिटे न काढता जागेवरच बसून राहणे, बस बंद पडणे, महिलांच्या सीटवर महिलांना कधीच जागा न मिळणे या बाबी आता पुणेकरांना नवीन नाहीत. उगीच नाही पुण्यात दुचाकींची गर्दी वाढते आहे. पुण्यात स्वत:चे वाहन नसणार्यांना प्रवास करणे म्हणजे खरंच अवघड परिस्थिती आहे. मान्य आहे त्यांचीही काही बाजू असेल पण कोणीतरी या ड्रायव्हर  कंडक्टर लोकांना सौजन्य शिकवा रे.....

१२ टिप्पण्या:

  1. शर्यत असते सगळीकड़े, हे असच चालत, वाईट वाटत :(

    उत्तर द्याहटवा
  2. काय बोलणार! बेस्ट हि जरा तरी बेस्ट आहे...

    उत्तर द्याहटवा
  3. same paristhiti BEST madhye sudhha aahe....

    ghari jatana ...best cha prawas nakosa watao..bus ardhatas depo madhye muddamun thambwun thewanar...pan sodnar nahi..

    aaramshir tambakhu- chuna malun...yenar...
    mahanun me nehami chalatach ghari jato..:(

    उत्तर द्याहटवा
  4. खरंच मंदार फार वाईट वाटतं. ते लोक दुसऱ्यांचा आजीबात विचारच कसा करत नाहीत?

    उत्तर द्याहटवा
  5. होय अभिषेक, आणि मुंबईत बेस्टशिवाय लोकल हाही एक उत्तम पर्याय आहे, इकडे तसं नाही ना... :(

    उत्तर द्याहटवा
  6. @striker.... काय करणार, १०-१५ मिनिटांच्या अंतरासाठी तर चाललेलाच बरं असाच वाटतं. बरेच जण बसची वाट पाहून पाहून चालत निघतात. एखाद्या मार्गावर तासाला ३-४ बस ठरलेल्या असतील, तर रोज त्यातली १ हमखास "फेल" असते.

    उत्तर द्याहटवा
  7. शहरातील तोटे आहेत सर्व, पण प्रत्येकाला शहरच पाहिजे...
    गांधींच्या नावावर मत खाणाऱ्या आणि मत देणाऱ्या सर्वांची इच्छा सफल होत आहे ... गांधी गेले स्वर्गा-नरकात निघून

    उत्तर द्याहटवा
  8. असं काही नाही अभिषेक, खेड्यात सरकारी माणसे अरेरावी करत नाहीत का? तिथे तर फसवणं जास्त सोपं आहे.
    बाकी
    >>गांधींच्या नावावर मत खाणाऱ्या आणि मत देणाऱ्या सर्वांची इच्छा सफल होत आहे
    सहमत...

    उत्तर द्याहटवा
  9. खरोखर अशक्य....

    धन्यवाद मंदारजी... ब्लॉगवर स्वागत....

    उत्तर द्याहटवा
  10. हे पुन्हा एकदा वाचलं. कारण मला माझी गाडी ऑफिसला नेण्याचा आता कंटाळा आला आहे पण सोयीचा बसचा पर्याय नाही!! :(
    बस दिन गया बात गयी!!!

    उत्तर द्याहटवा
  11. बस प्रवासासाठी शुभेच्छा मंदारजी..... :)

    उत्तर द्याहटवा