आपल्याकडून नकळत असं होत असते की आपल्याला असं वाटतं की अमुक माणसाची मला अजिबात गरज नाही, असली तर त्यालाच असेल. म्हणून आपण अशा लोकांशी नकळतपणे का होईना थोडं अधिकारवाणीने वागतो. मी म्हणजे कोणीतरी भारी आणि तुम्ही नेहमी माझंच ऐकलं पाहिजे असा आपला आविर्भाव असतो. पण गरज त्यालाच म्हणत असावेत जी पडली कीच आपल्याला त्याचं महत्त्व समजतं. कोणत्या गरजेला आपल्याला कोण उपयोगी पडेल याचे आपण अंदाज सुद्धा बांधू शकत नाही.
आपल्या अवतीभवती अशीही माणसे असतील जे आपल्याबद्दल असं समजत असतील की यांचा मला काय उपयोग, पडली तर यांनाच माझी गरज पडेल. विशेषतः अनेक नातेवाईकांमध्ये एखाद्याची परिस्थिती थोडी निम्न असेल अशा वेळी तर इतर सगळे त्यांना गृहीतच धरतात. अमुक व्यक्ती वयस्कर आहे तर तिलाच माझी गरज लागणार, अमुक कमी आर्थिक स्तरातील असेल तरी त्यालाच माझी गरज पडेल. असे बऱ्याच जणांचे गैरसमज असतात. पण प्रत्येकच गरज फक्त पैशाने भागेल अशी नसते ना. म्हणून तर 'गरजवंताला अक्कल नसते' आणि 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' अशा म्हणींचा उगम झाला असावा.
विचार करा एखाद्या व्यक्तीचा आपल्याकडून अपमान झाला असेल, किंवा आपल्याला कधी कोणी खूप अद्वातद्वा बोललं असेल आणि उद्या आपल्याला त्यांचीच किंवा आपल्या अपमानकर्त्याला आपली गरज पडली तर नाक घासत जावेच लागणार. गरज अहंकाराला दूर ठेवण्याचे काम करते. आणि हे जगच असं बनलंय की कितीही पैसा असला तरी माणसाला माणसाची गरज पडतेच. जर कोणाला वाटत असेल माझ्याकडे खूप ऐश्वर्य आहे म्हणून मला कोणाची गरज नाही किंवा मी कोणाला कसंही वागवेन तर असे अहंकार उतरायला वेळ लागत नाही.
लहानपणी आपण गोष्ट शिकलेली असते ती अशी की जंगलाचा राजा सिंह एकदा झाडाखाली झोपलेला असतो आणि झंवर खेळत असलेला उंदीर त्याच्या अंगावर पडतो. सिंह झोप मोडली म्हणून खूप रागावतो, आणि त्या उंदराला मारून टाकण्याच्या तयारीमध्ये असतो. पण उंदीर गयावया करतो म्हणून सिंह त्याला सोडून देतो. काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो तेव्हा हाच उंदीर ते जाळं कुरतडून सिंहाची सुटका करतो. किती छान छान गोष्टी आपण ऐकलेल्या असतात पण प्रत्यक्ष आयुष्यात वागताना त्याचे मतितार्थ मात्र विसरून गेलेलो असतो.
आणि फक्त एखाद्याची गरज कधीतरी पडू शकते असा स्वार्थी विचार ठेवून सगळ्यांशी खोटं गोड वागण्यापेक्षा नेहमीच सगळ्यांशी हेवेदावे, कटुता किंवा काही पूर्वग्रह असतील ते सगळं बाजूला ठेवून चांगलं वागायला काय हरकत आहे.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा