मंगळवार, २ जून, २०१५

नाव...

एका सरळ रेषेत तिचा प्रवास चालला होता.
शांत डोहात.
स्वत:ला सावरत.
तिच्यावर अवलंबून असलेल्यांना सांभाळत.
वातावरणाशी झुंजत.

सगळं करता सरळ रेषेची कधी वळणं व्हायला लागली तिला समजलंच नाही.
बरंच अंतर काटून सहज मागे पाहिल्यावर पाण्यावर उमटलेली सगळी वळणं स्पष्ट दिसू लागली.
सुरुवात केलेला किनारा कधीच नजरेच्या टप्प्याआड गेला होता.
शेवटाचा किनारा कोणता हे ठाऊकच नव्हतं.

आता एकतर फक्त पुढे जाणं किंवा भरकटत राहणं इतकंच राहिलं होतं हाती.
कित्येक वादळांना तोंड देऊन त्राण संपलं.
प्रवाहाने जसं नेलं तशी ती वाहवत गेली, कोणताही निर्णय न घेता.
पुढे पुन्हा नवीन भोवरा गिळून टाकायला तयार होता.
पुन्हा हेलकावे सुरु.

या वेळी बुडायचंच होतं.
डावीकडे झुकलं तरी आणि उजवीकडे झुकलं तरी.
पण आता कुणीकडे हा निर्णय तीच घेणार होती.
कारण फक्त समाधान हवं होतं, स्वत:च्या मर्जीने बुडाल्याचं!!

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

हट्ट...

दर वर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्याची चाहूल लागली आणि दिवाळी चार-आठ दिवसांवर आली होती. वातावरणात सगळीकडे आनंद, उत्साह भरून राहिलेला दिसत होता. कोणाच्या घरी रंगरंगोटी, कोणाच्या घरी भांडी घासून पुसून ठेवणे तर कोणाकडे फराळाचे पदार्थ बनवण्याची कामं चालली होती. शाळांना दिवाळीची सुटी लागली होती. फटाके वाजवायला अजून सुरुवात झाली नसली तरी मधूनच पानपट्ट्या, एखादी लवंगी, टिकल्या, नागगोळ्या यांची रेलचेल चालू होती.

तिलाही दिवाळी खूप आवडायची. वय असेल सहा-सात वर्ष. आईने घासलेली भांडी सुकत ठेव, आजीने केलेल्या करंज्या, शंकरपाळ्या गरम गरम खाऊन बघ. कधी आजी प्रेमाने देणार तर कधी म्हणणार, 
"थोड्याच आहेत गं, आताच फार नको खाऊस". 
कोणी फटाके उडवत असेल तर त्यांच्याकडे कोणकोणते फटाके आहेत ते जाउन बघ हे सगळं करायला तिला फार गंमत वाटे. आणि काहीच नाही तर शाळेला सुटी म्हणून इकडून तिकडे बागड. दिवाळीच्या सुटीत बाबा पाठांतर करून घ्यायचे ते तिला फार आवडायचं. 
"या वेळी मला नवीन ड्रेस हवाय हं" हे सुटी लागताच ती बाबांना सांगायला विसरली नव्हती. बाबाही सवईप्रमाणे "घेऊ हा या वेळी नवीन कपडे" असं म्हणाले. 

असंच एक दिवस सकाळी मित्र-मैत्रिणींसोबत खेळताना एक मैत्रीण म्हणाली, 
"या वेळी मी निळ्या रंगाचा फ्रॉक घेतलाय सोनेरी किनार असलेला, आईला रोज घालायला मागते पण आईने सांगितलंय की उद्या लक्ष्मीपूजन आहे, तो ड्रेस उद्या घालायचा. मी मस्त निळा फ्रॉक घालून फटाके उडवणार उद्या!"
असंच मग प्रत्येक जण आपापल्या कपडे आणि फटाक्यांचं कौतुक सांगू लागलं आणि हिची बेचैनी वाढत चालली. घरी आल्यावर ती आईला म्हणाली "आई, मला पण उद्या नवीन ड्रेस हवाय. या वर्षी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे."
"बाबांना सांग हो आल्यावर." - आई 

ती खिडकीला डोळे लावून बाबांची वाट पाहत बसली. आतून तिच्या आवडत्या चकल्यांचा खमंग वास येउनही तिची नजर खिडकीपासून ढळली नाही. आईने कसंबसं जेवायला नेलं पण दर दोन घासांनंतर बाहेर सायकलचा आवाज आला की तिची मान दरवाज्याच्या बाजूला कलायची बाबा आहेत का ते पाहायला. दिवाळीच्या वेळी बाबांना घरी यायला जास्तच उशीर व्हायचा हे ठाऊक असूनही ती परत खिडकीपाशी जाउन बसली. चिमुकल्या डोळ्यांमध्ये झोप दाटून आली होती पण तरीही निग्रहाने डोळे उघडे ठेवून ती एकटक बाहेर बघत होती. आणि दुरून सायकलची ओळखीची घंटी वाजली. ती उत्साहाने पळतच बाहेर गेली आणि बाबांना जाऊन बिलगली. 
"बाबा, मला नवीन कपडे! या वर्षी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे.",
"आणूयात आपण उद्या, उद्या सुटी आहे मला." बाबा.
"खरंच?"
"हो अगदी खरं."
"मला मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस घ्यायचाय. मो-र-पं-खी"
"तुला हवा तसा ड्रेस घेऊ आपण."
दोन वर्षांनी तिला दिवाळीला नवीन ड्रेस मिळणार होता, तो पण आजी, आजोबा, मामा, मावशी यांनी दिलेला नव्हे, तर स्वत: बाबांबरोबर जाउन घेतलेला. उड्या मारतच ती आईने अंथरलेल्या बिछान्यात जाउन झोपली. 

सकाळी ती उठली तेव्हा बाबा घरात नव्हते. दुपारी २-३ च्या सुमारास बाबा घरी आले. ती पुन्हा, "बाबा, ड्रेस!" 
"हो आवर तुझं, आपण जाऊ ड्रेस आणायला."
आईने तिचं आवरून दिलं. बाबा आणि ती ड्रेस आणायला निघाले. जाताजाता जितके मित्रमैत्रिणी दिसतील त्यांना "मी ड्रेस आणायला चाल्लीये" हे सांगायला ती विसरली नाही.
एका आलिशान बंगल्यासमोर सायकल थांबली. बाहेर कोणत्यातरी माणसाबरोबर काहीतरी बोलून बाबांना आणि तिला आत जायला परवानगी मिळाली. 
"शेठ, चार महिने झाले काम करून देऊन, पैसे मूर्ती बसवून झाली की देईन म्हणाला होता तुम्ही."
"आरे हा रे, चार महिना झाला, वाटत पन नाय."
"मुलीला नवीन कपडे घ्यायचे होते, पैसे मिळाले असते तर… "
"ही तुझी छोकरी काय, गोड आहे पोरगी. वासू, एक बर्फी ठेव पोरीच्या हातावर." 
वासू बर्फीचा पुडा घेऊन आल्यावर एक बर्फी तिच्या आणि एक बाबांच्या हातावर ठेवली जाते. दोघेही बर्फी खाऊन घेतात, बराच वेळ शांतता. शेठ कसलीतरी पुस्तक की वही पाहत आहेत. त्यांची तंद्री मोडू नये याचा अंदाज घेत बाप पुन्हा एकदा,
"शेठजी…. "
"आरे तू थांबलाय अजून, मी पाहिलाच नाय. संध्याकाळ होत आली हाय, लक्ष्मीपूजनचे दिवशी कसा लक्ष्मीजीला बाहेर काढू? सकाळी आला असतास तरी दिले असते पैसे तुला."
एक निराश, हताश बाप लक्ष्मी जिथे लोळण घेते ते ठिकाण पाहून बाहेर पडतो. असंच तीन-चार उंबरे झिजवून होतात. प्रत्येक उंबऱ्याबाहेर पडताना बाबांना काहीतरी होतंय आणि तिला ते नकोय इतकंच समजतं तिला!

खूप फिरून आणि बाबांकडे पाहून तिचाही उत्साह एव्हाना उतरणीला लागतो. असंच एका रस्त्याने जाताना बाबांच्या ओळखीचा एक माणूस बाबांना भेटतो. बाबा काकांना "नमस्ते" म्हणायला सांगतात, ती म्हणते. दोघांचं बोलणं होतं आणि काकांबरोबर दोघे चालू लागतात. थोडं चालून जातात आणि पाहते तर काका चक्क कपड्यांच्या दुकानात! बाबा तिला ड्रेसचा रंग परत विचारतात. ती सांगते "मोरपंखी" पण त्यामध्ये कालच्यासारखा ठसका नसतो, तिचा चेहराही उतरलेला. तिला हवा अगदी त्याच रंगाचा ड्रेस मिळतो तिला, पण आता तिच्या मनाने केलेला हट्ट वेगळाच असतो. तो हा की, पुन्हा कधीच आपल्यामुळे आपल्या बाबांचा चेहरा आज दिसला तसा दिसता कामा नये ….. 

बुधवार, १८ मार्च, २०१५

लघुकोन

ज्यांचं आरोग्य चांगलं आहे अशा निरोगी व्यक्तीला अंथरुणावर पडल्यानंतर दहा मिनिटात झोप यायला पाहीजे असं म्हणतात. मला मात्र अंथरुणावर पडलं की स्वत:शी किती बोलू अन किती नको असं होऊन जातं. दिवसभर तर अनेक कामांमध्ये कसा वेळ जातो कळत नाही, मग स्वत:शी बोलायचं तरी कधी? फार ठरवून किंवा गहन असं काही बोललं जात नाही पण खूप जास्त विचार करून झाल्याशिवाय अंतर्मनातून झोपण्याची परवानगीच मिळत नाही. 

उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर कामांची priority काय असावी, अमूक एक task वेळेत पूर्ण होईल ना, बरेच दिवस झाले ब्लॉगवर काही पोस्ट नाही केलं पण लिहू तरी काय. हल्ली तर काही विषयही सुचत नाही. "बेला के फूल" ऐकावं का थोडा वेळ? नको परत छान झोप यायला लागली तर रेडीओ बंद करण्यासाठी जागं राहायचं टेन्शन! उद्या काहीही करून व्यायाम करायचाच आहे. फार दुर्लक्ष होतंय तब्येतीकडे. अंक मोजायला सुरु करावेत म्हणजे पटकन झोप येईल. एक-दोन-तीन-चार--------तीस-एकतीस

फोर-व्हीलरचा क्लास लावायला एक महिन्यानंतरची appointment मिळालीये learning licence साठी. जमेल का मला चालवायला? चालवलीच तर महिन्याचा पेट्रोलचा खर्च साधारण किती येईल? औरंगजेब वाचून पूर्ण करायचंय पण आज डोळे फारच दुखत होते. इतिहासाला खरंच काही अर्थ असतो का? इतिहास जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो म्हणतात. आज माझ्यासमोर ज्या राजकीय, सामाजिक घटना घडतात त्यादेखील इतक्या बदलून माझ्यापर्यंत पोहोचतात मग इतिहासातलं कोण बघायला गेलंय? असो जास्त विचार नाही करायचा. एक-दोन-तीन-चार--------तीस-एकतीस-बत्तीस-------त्र्याहत्तर-चौऱ्याहत्तर-पंच्याहत्तर

गुरुवारी दादा-पोता match आहे अशा प्रकारचा मेसेज आलाय एक. पण बांग्लादेश सुद्धा काही कमी नाही. ही match जिंकून नंतर पाकिस्तानशी match झाली आणि ती हरलो तर??? नको नको एकतर दोन्ही matches जिंका किंवा बांग्लादेश बरोबरच हरा. काय होईल काय माहीती पण कळेलच की येत्या आठवड्यात! एक-दोन-तीन-चार--------चव्वेचाळीस-पंचेचाळीस-सेहेचाळीस-------एकसष्ठ-बासष्ठ 

मनाच्या केंद्रबिंदूपासून एक एक कोन तयार होत जातो विचारांचा, वीस बावीस अंशापासून सुरुवात होऊन ३६० अंशांकडे हळू हळू सरकत विचारांचे असंख्य कोन तयार होतात. आणि शेवटी मग एक दोन अंशांचा लघुकोन तयार होतो तुझ्या विचारांचा. आणि मग वर्तुळ पूर्ण होतं. एक-दोन-तीन-चार--------वीस-बावीस-----एक्क्यावन्न -बारवन्न-त्रेसष्ठपन्न-चोमपन्न-पंचरपन्न-छत्तरपन्न ---------------------------------------------------------