शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

नवीन

नवीन वर्ष आलं की मी हे करणार, ते करणार. नवीन ठिकाणी नोकरी लागली की मी असं काम करणार. नवीन ठिकाणी फिरायला गेलं की मी अमुक अमुक बघणार. किती नवीन गोष्टी येत असतात ना आयुष्यात? नवीन म्हणजे एखादी गोष्ट एकतर पूर्ण जगासाठीच नवीन असते किंवा आपल्यासाठी नवीन असते. नवीन गोष्टींचं आकर्षण आणि अप्रूप प्रत्येकच सामान्य माणसाला असतं, असं आकर्षण वाटलं नाही तर आपण साधू-संत होऊन जाऊ.

खूप दिवस तेच तेच कपडे वापरले की ते कपडे फाटले, विरले नसले आणि मापात असले तरी नवीन खरेदी करावीशी वाटतेच. जी गोष्ट कपड्यांची तीच नेहमी वापरात असणाऱ्या इतर वस्तूंची देखील! जुनं ते सोनं असलं तरी नवं ते हवंच असतं. सारखं काय तेच तेच, असं सगळ्यांनाच वाटतं, आणि तेच माणूस असल्याचं लक्षण आहे. कोणाचं कितीही छान चाललं असलं तरी आयुष्यात नवीन काहीतरी घडावं असं सगळ्यांनाच वाटतं. 

प्रत्येक जण आपापल्या अभिरुचीप्रमाणे नवीन गोष्टींची वाट पाहत असतो. नवं पुस्तक, नवा चित्रपट, नवीन टीव्ही सिरीयल, नवं गाणं, नवा प्रवास, नवीन गॅजेट्स यांची ओढ आपल्याला असतेच. कोणाला नवीन माणसांना भेटायला आवडतं, कोणाला नवीन ठिकाणांना भेट द्यायला आवडतं, कोणाला नवनवीन खाद्यपदार्थ खायला आवडतात तर कोणाला सारखे स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर टाकायला आवडतात, शिवाय ते टाकले की नव्या कमेंट्स आणि नव्या लाईक्सच्या आपण प्रतीक्षेत असतो.

जुनं जाऊ देऊन नवीन येणं हा निसर्गाचाच नियम आहे. येणारा प्रत्येक क्षण हा नवीन असतो, आणि तो आपल्याला जगायला मिळतो हे आपलं भाग्य असतं. केशवसुत देखील म्हणतातच, "जुने जाऊ द्या मरणालागुनी". जुन्या आठवणी कितीही रम्य असल्या तरी फार काळ त्यात नाही ना रमता येत? आताचे क्षण जुने होतील तेव्हा त्यांच्या आठवणी तितक्याच रम्य असतील याची काळजी आपणच घ्यायची असते ना?

आपल्याला कितीही आवड आणि हौस असली तरी असली प्रत्येक वेळी नवीन काही मिळेलंच असं नसतं ना?  अशा वेळी सगळ्यात जास्त समाधान कशात मिळत असेल तर जुन्याच गोष्टी नव्याने गवसण्यात. जुनी माणसं, जुनी नाती, जुनेच दृष्टिकोन नव्याने सापडतात ना तेव्हा खरी नव्याची आस पूर्ण होते. कारण नवंही कधीतरी जुनं होणारच असतं ना!

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..



शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

नातं

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..

आपण जन्माला येतो तेव्हा आपल्यापाशी अगदी मर्यादीत नाती असतात. आई-बाबा, आजी-आजोबा, भावंडं, काका, मामा, आत्या, मावशी इतकंच आपलं जग असतं. मग जसजसे आपण मोठे होत जातो तसतशी या नात्यांमध्ये भर पडत जाते. मैत्रीची, प्रेमाची आणि आपुलकीची नाती जोडली जाऊ लागतात. लग्नानंतर तर बऱ्याच नात्यांची अचानक भर पडते. आणि कुटुंबात नव-नवीन सदस्यांच्या आगमनाने अनेक नाती निर्माण होतात. एखाद्याला आपण तो किंवा ती माझी अमुक अमुक आहे म्हणतो, हे 'अमुक अमुक' म्हणजे त्या नात्याचं सर्वमान्य असं नाव! 

प्रत्येकाने एकमेकांशी नात्याच्या नावाला शोभेल असं वागणं अपेक्षित असतं, पण तसं प्रत्येक वेळी जमेलच असं सांगता येत नाही. शिवाय नात्याचं नाव आणि प्रत्यक्ष ते नातं हे नेहमी एकच असेल असंही नाही. कधी आपली बहीणच आपली सगळ्यात जवळची मैत्रीण असते तर कधी एखादी जवळची मैत्रीण आपली बहीण होऊन गेलेली असते. कधी नातं नावापुरतंच असतं आणि बंध जुळलेलेच नसतात, तर कधी एकाच व्यक्तीशी आपण अनेक नात्यांनी गुंफलेले असतो. हा नात्यांचा रुमाल बनवून पाहिला तर कोणाचाच परिपूर्ण नसतो, काही ठिकाणी असतात घट्ट बंध तर काही ठिकाणी असतात विस्कळलेले टाके. 

काही लोकांशी आपण नेहमीच आत्मीयतेने वागतो, तर काहींशी जेवढ्यास तेवढे. हे काही मुद्दाम ठरवून होत नसतं. ज्या नात्याशी जसा ऋणानुबंध जुळला असेल तसं आपल्याकडून वागलं जातं. काही नात्यांमध्ये सहजपणा असतो तर काहींमध्ये अवघडलेपण असतं. या अवघडलेल्या नात्यांमध्येही आपण केवळ बांधले गेलोय म्हणून, अगदी वरवर, उगीच असायचं म्हणून असतो आणि हसायचं म्हणून हसतो एकमेकांकडे बघून, एकमेकांमध्ये एक न दिसणारा पडदा ठेवून, औपचारिकता म्हणून.

आपण जुळलेले ऋणानुबंध जपण्याचा मनापासून  प्रयत्न  करायचा. पण मुद्दाम प्रयत्न करून टिकवून ठेवावं लागत असेल तर ते नातं नसतंच, असतं ते फक्त एक दडपण. या दडपणाखाली किती काळ घालवायचा, कायमच राहायचं की ते झुगारून द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. आणि इतकं सगळं नियमांच्या चौकटीत बसवूनही काही नाती अशी उरतातच ना की काय नाव द्यावं हेच समजत नाही?  मनाला सुखावणारी, आयुष्यातल्या सगळ्या चिंता, काळज्या विसरायला लावणारी, आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करणारी, आणि जगण्याचं बळ देणारी असतात तीच खरी नाती,आणि सगळ्यांनाच हवे असतात हे बंध रेशमाचे!



सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

कोपरा

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..

पूर्वी घराच्या भिंतींमध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या कप्प्या-कोपऱ्यांना आता फार महत्त्व राहिलं नाहीये. कोपरा म्हटलं डोळ्यांपुढे येते एखादी आजिबात सहज लक्ष न जाणारी किंवा अतिशय कमी महत्त्वाची जागा. आपल्याला न लागणारी एखादी गोष्ट कोपऱ्यात पडून असते तसंच घरातली एखादी व्यक्ती रुसलेली असली की आपोआपच ती कोपऱ्यात असल्यासारखा भास होतो. काही लहानशी वस्तू सापडत नसेल तर उगीच वाटतं कोपऱ्यात पडली असेल कुठेतरी. 

घरी कोणी येणारं कोणी ठरलेली वेळ होऊन गेल्यावरही आलं नसेल तर आई म्हणायची, जा जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन बघून ये. गुंड लोक एखाद्याला धडा शिकवायला त्याला 'कोपऱ्यात' घेतात, वृत्तपत्रातही एखादी कमी महत्त्वाची बातमी किंवा निवेदनं कुठेतरी कोपऱ्यात असतात, तर एखाद्या वेबसाईटवर पण लॉगआऊट वगैरे कुठेतरी कोपऱ्यात असतं. थोडक्यात काय जिथे तुम्ही फार वेळ घालवू  नयेत अशा गोष्टी नेहमी कोपऱ्यात असतात. तर असा हा घरात बाहेर कुठेही सामावून जाणारा कोपरा. 

पण सगळेच कोपरे असे दुर्लक्षित आणि सोडून देण्यासारखे नसतात ना? तसे असते तर मनाच्या कोपऱ्यात काही खास बाबींना स्थान मिळालं नसतं. रोजची धावपळ, कर्तव्यं आणि वेळापत्रकं सोडून कधीतरीच निवांत क्षणी वर येणारे असतात ते असतात मनाचे कोपरे. प्रत्येक जणच आपल्या मनात असे हळवे कोपरे जपून असतो, ज्यांना धक्का लावण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचा स्वतःचाच असतो. इतरांना आपल्या या कोपऱ्यांबद्दल कोणीच कधीच सहज कळू देत नाही! म्हणायला तो मनाचा कोपरा असतो एवढासा, पण काय नाही सामावू शकत त्यात? कधी ते एखादं सुंदर संगीत असेल, कधी असेल एखादं सुबक चित्र, कधी असेल कोणती कलाकृती, कधी असेल एखादा प्रसंग, तर कधी असते एखादी व्यक्ती.

आपण फक्त या कोपऱ्यात डोकावायचा अवकाश, की हळूच उघडतो तो मनाचा कोपरा आणि त्यातून पटापट बाहेर येत जातात सगळ्या आठवणी, अत्तराचं झाकण उघडल्यावर हळुवार सुगंध पसरावा तशा! खरंच इतकं काय काय मावतं त्या एवढ्याशा जागेत? काळ, वेळ, मिती, वेग सगळ्यांची आकडेमोड चुकवणारा असा असतो हा मनाचा कोपरा. अगदी दोन सेकंदांसाठी का होईना हरवून जातो आपण या कोपऱ्यात आणि मग कोणीतरी भानावर आणून आपल्याला विचारतं, आपण कुठे हरवलो ते. आणि आपण काही नाही म्हणून तंद्रीतून बाहेर येऊन, कोपऱ्याला कोपऱ्यातच ठेवून परत येतो नेहमीच्या विस्तीर्ण अवकाशात!