रविवार, २६ जुलै, २०२६

मर्यादा

कोणत्याही गोष्टीला एखादी सीमा असते, आणि ती ओलांडू नये असा शिष्टाचार आहे. तर हे जे कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात करणे असते ती त्या गोष्टीची मर्यादा असते. खाण्याची मर्यादा, बोलण्याची मर्यादा, पोषाखातली मर्यादा, वागण्याची मर्यादा, नात्यांमध्ये अपेक्षित असलेली मर्यादा, एक सुसंकृत माणूस म्हणून अशा अनेक मर्यादा आपण पाळणे अपेक्षित असते. तेच एखादी व्यक्ती सुसंस्कृत नसेल तर त्याच्याकडून आपण मर्यादांची अपेक्षा करत नाही. उलट समजून घेतो की अमुक अपरिहार्यतेमुळे ही व्यक्ती अशीच वागेल, तर आपणच सावध रहावे हे बरे.

जसजसे जग वृद्धत्वाकडे झुकत आहे, माणसाची प्रगती होत चालली आहे, आणि जगाचा वेग वाढला आहे, तसतशी मर्यादा मात्र कमी कमी होत चालली आहे. पूर्वी व्यसनेच न करणे ही मर्यादा होती. आता प्रमाणात व्यसने करावीत ही मर्यादा आहे. पूर्वी मोठ्यांना उलट बोलणे मर्यादाभंग समजले जाई. आता कोणत्याही बाबीचा मोठ्यांनाही जाब विचारणे मर्यादेत मानले जाऊ लागले आहे. पूर्वी असं मानत असतील कदाचित की मोठे अनुभवावरून सांगतात तर आपल्या भल्याचे असेल, आणि बऱ्याचदा ते तसे असायचे देखील.

आता माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध असल्याने वयाने लहान व्यक्तीदेखील मुबलक प्रमाणात ज्ञानी असतात. पण तांत्रिक ज्ञान वेगळे आणि आयुष्य कोळून प्यायल्याने भावनिकदृष्ट्या काय योग्य असेल याचे ज्ञान वेगळे. जेव्हा एखादा भावनिक निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तिथे अनुभवी माणसाच्या सल्ल्याची गरज असते, तंत्रज्ञानाची नाही. पण काही गोष्टीत आपल्याला मोठ्यांपेक्षा जास्त समजते म्हणून मोठ्यांना काहीच समजत नाही असे नसते. फक्त एका क्षेत्राची तुलना आयुष्यभराच्या अनुभवाशी, आणि सारासार विचार करण्याची बुद्धी जी अनुभवाने प्राप्त झाली आहे तिच्याशी होऊ शकत नाही.

सोशल मीडियामुळे आणि ओटीटी मुळे तारुण्याच्या बहरात असलेल्या मुलांना तेच जग वाटतं पण तसं नसतं. मग मर्यादा ओलांडली गेली की कधीकधी नसती लचांडेही मागे लागू शकतात. सोशल मीडियामुळे अभिव्यक्ती इतकी सोपी झाली आहे की एखाद्याला एखादी अपमानास्पद गोष्ट समोर बोलण्याचे धाडस एखादी व्यक्ती करू शकणार नाही तीच ते सहज लिहून जाते. वयाचा वगैरेही विचार राहत नाही. वादविवाद साधे न राहता हमरीतुमरी आणि शिवीगाळ भाषेवर घसरतात. हेच आपण समोरासमोर असतो तर एखाद्याला पटकन असे बोललो असतो का हा विचार कोणीच करत नाही. आणि हे केवळ प्रतिसादाची मर्यादा न संभाळल्याने होते.

पोषाखातली मर्यादा फक्त स्त्रीच्या बाबतीतच बदलत चालली आहे. पुरुषांचे पोशाख वर्षानुवर्षे बदलत चालले तरी त्यामध्ये ज्या भागात जितके अंग झाकले जाईल असे पोशाख असत त्या भागांमध्ये तेवढेच कपडे अजूनही घातले जातात. धोतराऐवजी पँट आली असेल, अर्ध्या लुंगीऐवजी बर्मुडा आली असेल. गंजीच्या जागी शर्ट असेल पण कापडाची लांबीरुंदी कमी झालेली नाही. पण स्त्रिया कपड्यांना कात्री लावण्याच्या नवनवीन मर्यादा पार करताना दिसतात अर्थातच कोणी काय घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

खाण्याच्या मर्यादा सोडल्या की वेगवेगळे आजार मागे लागतात, आणि ही वैयक्तिक समस्या असल्याने ती मर्यादा देखील ज्याची त्यानेच ठरवायची असते. नात्यांशी प्रामाणिक राहणे, मोठ्यांशी आदराने वागणे या काही कौटुंबिक मर्यादा आहेत तर उघड्यावर रस्त्यावर न थुंकणे, लघुशंका न करणे, वाहतूक शिस्त पाळणे या काही सामाजिक मर्यादा आहेत. पण हल्ली मर्यादा सांभाळणे ही जबाबदारीची किंवा अभिमानाची गोष्ट राहिली नसून ते एक बंधन वाटते. बोलू नये ते बोलणे, वागू नये तसे वागणे या स्वैराचाराला मात्र स्वातंत्र्य किंवा आधुनिकता समजले जाते.      

प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणतात कारण त्यांनी मानव देह धारण करून त्या रूपामध्ये एक सर्वोत्तम मुलगा, पती आणि राजा म्हणून सर्व मर्यादांचे पालन केले. आपण म्हणतो एखाद्या माणसाच्या बोलावरून त्यांनी सीतामातेला वनवासी धाडायला नको होते, पण जनरेट्यापुढे सत्ता किती हतबल असते हे आपण पाहतोच आहोत. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा