मोह आणि लोभ हे एकच वाटू शकतात पण तसे नाही. मोह हा क्षणिक देखील असू शकतो पण लोभ हा स्वभावाचाच एक भाग बनून जातो. मोहासाठी एक क्षण पुरतो म्हणतात, पण तो एकच क्षण इतका भयानक असू शकतो की आयुष्यभराचं नुकसान करू शकतो. रस्त्यावर पडलेली मौल्यवान वस्तू उचलावी की उचलू नये, उचलली तर कोणाची आहे शोधून ज्याची त्याला परत द्यावी की आपल्याजवळच ठेवण्याचा मोह बाळगावा. यामध्ये मोह सारासार विवेकबुद्धीवर भारी पडू शकतो.
मोह एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या क्षणी एखाद्या प्रकारे वागण्याचाच असेल असं नाही. मोह हा नात्यांचादेखील असतो. कधीकधी आपल्या मोहपाशाने आपण आपल्या जवळच्या लोकांना मोकळं न सोडल्याने त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. वस्तू, वास्तू आणि माणसे यांपैकी कशाचाच मोह नाही असा निर्मोही माणूस सापडणे कठीण आहे. काहींना खाण्यावर नियंत्रण राहत नाही. आवडीचा पदार्थ समोर आला आणि पथ्यामुळे तो वर्ज्य असेल तरी तो खाण्याचा मोह बऱ्याच लोकांना आवरता येत नाही. त्यामुळेच काटेकोर पथ्य पाळणारी माणसे फार कमी दिसतात.
जर मनाचा निग्रह मोठा असेल तर माणूस मोहाला दूर सारू शकतो. मोह न होण्यामागे नैतिकता तर क्षणाची असते पण मनाचा निग्रह फार कठोर असावा लागतो. नाहीतर खरेदीला गेलं आणि काही घ्यायचं नसेल, आवश्यकता नसेल तरी आवडलं म्हणून घेणं, चटपटीत पदार्थ दिसले की त्यावर ताव मारणे या गोष्टींचा मोह आवरता आवरत नाही. मार्केटिंगवाले आपल्याला मोहात अडकवण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत असतात. व्यसनाधीन माणसाला रोज मनाचा निश्चय करूनही रोज व्यसनाचा मोह होतो. व्यसन हे मोहाचं चक्र आहे अशा चक्रातून बाहेर पडता न आल्यास मोह हा माणसाचा मोठा शत्रू होऊन जातो.
मोहापायी जमवलेल्या वस्तुंनी घरही अपुरं पडायला लागतं. एखादी वस्तू खूप जुनी झाली तरी त्याचाही मोह आपल्याला सुटत नाही, काहींमध्ये आपल्या आठवणी लपलेल्या असतात, तर काही येतील उपयोगी या मोहाने जमवून ठेवलेल्या असतात. कुठे चार दिवस बाहेर गेलो की बदल म्हणून बरे वाटते आणि परत मनाला घराची ओढ लागते, हा आपल्याला आपल्या घराबद्दल असलेला मोह असतो, त्या घरातल्या माणसांबद्दल असलेला मोह असतो. हौसेने प्राणी पाळले तर त्यांचाही लळा लागतो. हा कोणाचा लळा लागणेही मोहच आहे. थोड्या प्रमाणात मोह असणे वाईट नाही, पण मोहाने माणूस अंध होणे चुकीचे आहे. कोणतीही गोष्ट त्याज्य करायची वेळ आली तर तिचा मोह पटकन सोडता आला पाहिजे.
मोहवून टाकणाऱ्या अनेक गोष्टी अनेक प्रलोभने आपल्या सतत समोर येत असतात, पण क्षणभरच मोहरून जाऊन मोहामध्ये न अडकता स्वतःला त्या मोहजालातून वेळीच बाहेर काढणे ज्याला जमते तोच मोहावर विजय मिळवू शकतो. रामायणातही मोहाचा उत्तम वापर करून घेतलेला आहे, कैकेयीला पुत्रमोह आणि सीतामातेला सुवर्णमृगाचा मोह झाला नसता तर रामायण ना घडते!
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा