शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

षड्रिपु-मद

माणसाला चांगल्या गोष्टींचा अभिमान असणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्या अभिमानाचा उन्माद झाला किंवा अहंकार झाला की तो मद असतो. माणसाकडे सत्ता असेल तर तो मदांध होणे खूप सोपे असते. एकदा एखाद्याला समजलं की काही ना काही कारणाने कोणी त्याचा विरोध करू शकत नाही की अशा माणसाला मद उत्पन्न होतो. मग इतरांशी वागताना सारासार विचार राहत नाही. ज्यांना गरज असेल त्यांची आणखी पिळवणूक करण्याची वृत्ती निर्माण होते.

धन-संपत्ती-सत्ता प्राप्त होऊनही ज्यांना मद उत्पन्न होत नाही त्यांच्यावर खरोखर चांगले संस्कार प्राप्त झालेले असतात. कधीकधी काहीजण उन्मत्तपणा उघड दाखवतात तरी काहींना मंद असतो पण ते आपली प्रतिमा एवढी संपत्ती-सत्ता असूनही आमचे पाय मातीचेच आहेत अशी करण्यात यशस्वी झालेले असतात. उघड काही दाखवण्यापेक्षा सत्तेचा छुपा वापर करणे त्यांना साधलेले असते. अशा वेळी माणसाची प्रतिमा मालिन होत नाही पण चुकून असलेली सत्ता गेली तर त्यांच्या मदाचा पूर्ण निचरा होतो. 

जर आपण शून्यातून उभे राहिलेले असू तर आज आपल्याकडे संपत्ती आहे म्हणून मदोन्मत्त होऊ नये. जरी आपण आपल्या बळावर ते कमावलेलं असलं तरी कालच्या पायावर हा आज उभा आहे हे कायम लक्षात असू द्यावे. आज आपल्याकडे सर्व काही आहे म्हणून अहंकार करू नये. मला माझ्या संपत्तीचा अहंकार असेल, तर जगात माझ्यापेक्षा श्रीमंत लोकही असतील, आज नसतील तर उद्या निर्माण होतील. आज माझ्याकडे सत्ता असेल तर उद्या कदाचित नसेल. आज मला ज्ञानी असल्याचा अहंकार असेल तर चांगदेवांना मुक्ताई भेटायला वेळ लागत नाही. सौंदर्याचा अहंकार असेल तर उद्या वृद्धत्व येणार आहे हे विसरू नये. 

मदोन्मत्त माणसाला काम-क्रोध-लोभ-मोह आणि मत्सर हे इतर षड्रिपु आपोआप येऊन मिळतात. यातला एक एक शत्रूच इतका घातक आहे की अहंकाराने हे सगळे शत्रू आपल्या ठायी जमा झाले तर माणसाची काय अवस्था होईल याची कल्पनाच न केलेले बरे. रावण हा सर्वज्ञ असूनही मदोन्मत्त झाल्यामुळे त्याला काम पूर्ण करण्यासाठी इतरांच्या स्त्रीया पळविण्याची दुर्बुद्धी झाली, सर्व देवांवर विजय मिळवण्याचा लोभ निर्माण झाला, प्रभू श्रीरामांनी आव्हान दिले असता क्रोध उत्पन्न झाला, सीतामातेला स्वतःजवळच ठेवण्याचा मोह झाला आणि श्रीरामांबद्दल एक योद्धा म्हणून मत्सर निर्माण होऊन त्यातच त्याचा नायनाट झाला. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा